बदललेली सामरिक समीकरणे

शशिकांत पित्रे, मेजर जनरल (निवृत्त)
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

पाकिस्तानकडून सरहद्दीवर मोठ्या प्रमाणात गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा सुरू असला तरी त्या देशाला आपली यापूर्वीची रणनीती चालू ठेवणे परवडणारे नाही. बदललेली सामरिक समीकरणे लक्षात घ्यावीच लागतील.

पाकिस्तानकडून सरहद्दीवर मोठ्या प्रमाणात गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा सुरू असला तरी त्या देशाला आपली यापूर्वीची रणनीती चालू ठेवणे परवडणारे नाही. बदललेली सामरिक समीकरणे लक्षात घ्यावीच लागतील.

गेल्या सप्टेंबरनंतर भारत-पाकिस्तानचे लष्करी आणि राजनैतिक संबंध दिवसेंदिवस अधिकाधिक ढासळत चालले आहेत. त्याचबरोबर पाकिस्तानातील सरकार आणि सैन्य यांच्यामधील अंतर्गत तणावामुळे त्यांचे अनुबंधही रसातळाला जात आहेत. दोन शरीफांमध्ये प्रच्छन्न सुंदोपसुंदी चालू आहे. या साऱ्याचे परिणाम दोन्ही देशांमधील सीमारेषेवर दृग्गोचर होताना दिसताहेत. दोन्ही बाजूंनी तोफमारा आणि गोळीबाराचे सत्र अव्याहतपणे सुरू आहे. भारतीय जवानाचे शरीर छिन्नविछिन्न करण्याच्या दहशतवाद्यांच्या अमानुषतेला भारताने पाकिस्तानी रेंजर्सच्या सीमेवरील चौक्‍या उद्‌ध्वस्त करून सडेतोड उत्तर दिले आहे. पाकिस्तानी सेनाप्रमुख राहील शरीफ यांच्या निवृत्तीला केवळ एक पंधरवडाच बाकी आहे. त्यांच्या वारसदाराची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडते का नाही, हे एक कोडेच आहे. परिस्थिती स्फोटक आहे हे नाकारता येणार नाही. परंतु, या सगळ्या घटनांकडे पाहताना, त्यांचे विश्‍लेषण करताना बदललेले संदर्भ ध्यानात घ्यावे लागतील.पाकिस्तानला कुठलेही आततायी पाऊल उचलण्यापूर्वी  दहा वेळा विचार करावा लागेल. हे घडले ते सर्जिकल स्ट्राइकमुळे. 

१९ सप्टेंबरला पाकिस्तानप्रणीत अझहर मसूद या कुप्रसिद्ध दहशतवाद्याच्या जैशे मोहंमद या संघटनेने उरीच्या लष्करी तळावर केलेला हल्ला, हे पाकिस्तानच्या आयएसआयचे काही पहिले कृष्णकृत्य नव्हते. भारताच्या सरकारचा डळमळीतपणा त्यांच्या अंगवळणी पडला होता. भारतीय राज्यकर्ते ताबारेषा ओलांडण्याचे धाडस कधीच करणार नाहीत, याची त्यांना खात्री होती. त्यामुळे ताबारेषेजवळील ‘लौन्चिंग पॅड’वर दहशतवाद्यांच्या हालचाली निर्वेध चालू राहिल्या. या दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रे केवळ घुसखोरीच्या निर्धारित दिवशीच देण्याचा आयएसआयचा रिवाज होता. त्यामुळे निःशस्त्र भाडोत्र्यांचा हा ‘जमाव’ कोणतीही तमा न बाळगता ताबारेषेच्या सान्निध्यात नेहमीप्रमाणे वावरत होता. नेमकी हीच हलगर्जी पाकिस्तानी लष्कराच्या अंगलट आली. भारत आपला इशारा खरा करणार याची पाकिस्तानला तसूभरही कल्पना नव्हती. त्यात भर टाकायची म्हणूनच की काय, पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी ‘भारताने हल्ला केला तर आम्ही अण्वस्त्राचा वापर करू’ अशी पोकळ धमकी दिली. वास्तविक अण्वस्त्रे ही शस्त्रास्त्रे नव्हेत तर केवळ एक प्रतिरोधशक्ती आहे.

त्यानंतर घडला तो सर्वज्ञात इतिहास. यशस्वी सर्जिकल स्ट्राइकचे सहा प्रमुख घटक : अचूक इंटेलिजन्स, सर्वंकष योजना, विस्मय व शाठ्य या दोन युद्धतत्त्वांचा कल्पक अंतर्भाव, विशेष प्रशिक्षित सैनिकांचा सहभाग, काटेकोर समन्वय आणि कमीत कमी वेळात कारवाई संपवून स्वप्रदेशात परती. या आघातानंतर भारत आणि पाकिस्तानच्या सामरिक समीकरणात लक्षणीय स्थित्यंतर घडून आले यात संदेह नाही.

पहिले म्हणजे १९७२च्या सिमला करारानुसार ताबारेषा न ओलांडण्याचे भारताचे एकतर्फी सौजन्य संपुष्टात आले. पाकिस्तानने १९८९ पासून सीमापार दहशतवादाचा राष्ट्रीय धोरणात समावेश करून भारताला हजार जखमांनी विद्ध करण्याचा सपाटा लावला होता. नैतिकतेच्या तत्त्वावर भारताने आपले दोन्ही हात जणू काय मागे बांधून ठेवल्यामुळे पाकिस्तानला रान मोकळे झाले होते. या पुढे मात्र सहनशीलतेचा अंत झाल्यास ताबारेषा ओलांडून पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये हल्ले चढवण्यास भारतीय लष्कर मागे-पुढे पाहणार नाही. 

दुसरा बदल म्हणजे पाकिस्तानप्रणीत दहशतवाद्यांच्या कोणत्याही खोडसाळपणाला तत्काळ कडवे प्रत्युत्तर दिले जाईल, हा संदेश परिणामकारकरीत्या पोचवण्यात भारतीय लष्कर यशस्वी झाले. २९/ ३० ऑक्‍टोबरला याचे त्यांना पुनश्‍च प्रत्यंतर आले. २८ तारखेला माच्छिल भागात काही दहशतवाद्यांनी केलेल्या घुसखोरीदरम्यान ठार झालेल्या एका भारतीय जवानाचे शरीर त्यांनी छिन्नभिन्न केले. या अमानुष कृत्याला योग्य प्रायश्‍चित दिले जाईल, अशी घोषणा लागलीच केली गेली. दुसऱ्याच दिवशी भारतीय लष्कराने जबरदस्त तोफमाऱ्याकरवी पाकिस्तानच्या चार चौक्‍या पूर्णपणे उद्‌ध्वस्त केल्या. कोणत्याही अघोरी कृत्याची प्रमाणाबाहेर किंमत चुकती करावी लागेल, हा संदेश पाठवला गेला आहे. पाकिस्तानच्या प्रत्येक खोडसाळपणाला ‘ईट का जवाब पत्थर’ या प्रमाणात असेल याची दखल पाकिस्तानला घेणे आवश्‍यक आहे. तिसरा आणि सर्वांत दूरगामी बदल म्हणजे पाकिस्तानच्या अण्वस्त्रवापराच्या धमकीचा ‘भ्रमाचा भोपळा’ एकदाचा फुटला आहे. भारताच्या आक्रमणामुळे जेव्हा पाकिस्तानचे अस्तित्वच धोक्‍यात येईल किंवा त्याचे तुकडे पडण्याची शक्‍यता निर्माण होईल, त्या वेळीच तो अण्वस्त्रवापराचा विचार करेल. तो आहे पाकिस्तानचा ‘अण्वस्त्र उंबरठा’ (न्यूक्‍लिअर थ्रेशोल्ड). जोपर्यंत ती परिस्थिती येऊन ठेपत नाही, तोपर्यंत हे ‘ब्लॅकमेल’ या पुढे पाकिस्तान उठता-बसता वापरू शकणार नाही.

१९४७, १९६५  आणि १९७१ मधील तीन पारंपरिक युद्धात पाकिस्तानी सैन्याचा पराभव झाला होता. त्यानंतर मात्र पाकिस्तानने एका अभिनव रणनीतीचा अवलंब केला. एका बाजूला भारताविरुद्ध परिणामकारक छुपे युद्ध आणि दुसऱ्या बाजूला अण्वस्त्रवापराची धमकी यांच्या कावेबाज मिश्रणाने भारताची काही पटीने वरचढ पारंपरिक शस्त्रशक्ती वापरणे पाकिस्तानने अशक्‍य करून सोडले. या पुढे मात्र भारतीय सैन्यदले पाकिस्तानचा अण्वस्त्र उंबरठा ओलांडला जाणार नाही, याची दक्षता घेऊन पारंपरिक मर्यादित युद्धाचा पर्याय अनुसरू शकतील. त्यामुळे गेल्या तीन दशकांतील पाकिस्तानची सामरिक नीती आता कालबाह्य झाली आहे. भारत-पाकिस्तानमधील सामरिक समीकरणातील हा आहे सर्जिकल स्ट्राइकपश्‍चात झालेला महत्त्वाचा बदल.

Web Title: Changed the strategic equation