काँग्रेसचे हॉपिंग

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

राजकारणात प्रसंगी दुय्यम भूमिकाही घ्यावी लागते, याचे भान ठेवून काँग्रेसने समाजवादी पक्षाबरोबर आघाडी केली आहे. हा निर्णय योग्य असला तरी संघटनाबांधणीसाठी किती प्रयत्न होतात, हे महत्त्वाचे ठरेल.

राजकारणात प्रसंगी दुय्यम भूमिकाही घ्यावी लागते, याचे भान ठेवून काँग्रेसने समाजवादी पक्षाबरोबर आघाडी केली आहे. हा निर्णय योग्य असला तरी संघटनाबांधणीसाठी किती प्रयत्न होतात, हे महत्त्वाचे ठरेल.

उत्तर प्रदेशात ‘नेताजी’ आणि ‘बेटाजी’ यांच्यातील दंगल निवडणूक आयोगाने निकाली सोडवली, तेव्हाच आता काँग्रेस ‘उत्तर प्रदेश केसरी’ हा किताब पिताश्रींकडून हिसकावून घेणाऱ्या अखिलेश यांच्याबरोबर हातमिळवणी करणार, हे स्पष्ट झाले होते. मात्र, राजकारणाच्या पटावर कोणतीही प्यादी सरळ जात नाहीत, ती उंटाप्रमाणे तिरकसच चालतात, याची प्रचिती गेल्या चार दिवसांत आली आणि अखेर ही होऊ घातलेली आघाडी तुटता तुटता बचावली आहे! यात श्रेय अखिलेश यांच्याइतकेच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल यांच्यामागे नेपथ्यात उभे राहून डाव टाकणाऱ्या प्रियांका गांधी यांचेही आहे. आता अखिलेश यांची समाजवादी पार्टी विधानसभेच्या एकूण ४०३ जागांपैकी २९८ जागा लढवणार असून, काँग्रेसच्या वाट्याला १०५ जागा आल्या आहेत. हे आकड्यांचे गणित सुटले असले, तरी प्रत्यक्षात मतदारसंघ निवडताना तणातणी होणारच; तसेच रुसव्याफुगव्यांनाही ऊत येईल. तरीही हे दोन सर्वसाधारणपणे एकच ‘मतपेढी’ असलेले पक्ष एकत्र आल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणाला काही प्रमाणात चाप बसू शकेल, असे म्हणता येते. उत्तर प्रदेशात २७ वर्षांच्या राजकीय वनवासानंतर काँग्रेसला शहाणपण सुचले आहे. कोणत्याही राज्यात दुय्यम भूमिका घेणे काँग्रेसला कमीपणाचे वाटत आले आहे. राज्यातून पुढे येणारे नेतृत्व; मग ते स्वपक्षातील असो वा अन्य पक्षातील, त्याची उपेक्षा केली जात असे. आता काळानुसार त्या पक्षाला बदलावे लागते आहे. अर्थातच, काँग्रेसने ही आघाडी केली, यास बिहार निवडणुकीची पार्श्‍वभूमी आहे. अवघ्या काही वर्षांपूर्वीपर्यंत देशात सर्वव्यापी समजल्या जाणाऱ्या या पक्षाची २०१४ मधील लोकसभा निवडणूक आणि त्यानंतरच्या काही विधानसभांमध्ये दारुण पीछेहाट झाली. त्यामुळेच बिहारमध्ये दुय्यम नव्हे, तर तिय्यम भूमिका घेऊन काँग्रेसने नितीश कुमार तसेच लालूप्रसाद यादव यांच्याबरोबर आघाडी केली होती. त्यात आलेल्या यशामुळेच काँग्रेसने हा उत्तर प्रदेशातील आघाडीचा निर्णय घेतला आहे.

सुमारे सहा महिन्यांपूर्वी या निवडणुकांचे डिंडीम वाजू लागले, तेव्हा काँग्रेसची मजल थेट मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून शीला दीक्षित यांचे नाव जाहीर करण्यापर्यंत गेली होती! आपले राज्य येणार, अशा भ्रमात तेव्हा काँग्रेसचे मुखंड होते काय न कळे? मात्र, अखिलेश यांना आमदार तसेच जनता यांचा असलेला अभूतपूर्व पाठिंबा बघता, शीला दीक्षित यांनी तातडीने माघार घेतली आणि समझोत्याचा मार्ग खऱ्या अर्थाने खुला झाला. अर्थात, त्यामागे बिहार निवडणुकीत नितीश कुमार यांचे ‘स्ट्रॅटजिस्ट’ म्हणून काम करणारे प्रशांत किशोर यांचाही मोठा वाटा जसा आहे, त्याचबरोबर प्रियांका गांधी यांचाही. त्यामुळेच समाजवादी पार्टीशी होत असलेल्या आघाडीवर शिक्‍कामोर्तब झाल्यावर काँग्रेसने केलेल्या ‘ट्विट’मध्ये राहुल नव्हे, तर प्रियांका यांचा उल्लेख आहे! ही निवडणूक हे प्रियांका यांचे राजकीय पटावरील पहिले पाऊल आहे काय, अशीही चर्चा सुरू झाली आहे. पुढच्या लोकसभा निवडणुकांना आता जेमतेम दोन- सव्वादोन वर्षे उरली आहेत.

गेल्या लोकसभेत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार निर्विवाद बहुमत मिळवून सत्तेवर आले ते केवळ उत्तर प्रदेशने निवडून दिलेल्या ८० पैकी ७१ अशा दणदणीत खासदारांच्या जोरावर! शिवाय, अपना दल या भाजपच्या मित्रपक्षाचेही दोन खासदार दिमतीला होतेच. समाजवादी पार्टी, तसेच काँग्रेस यांचे केवळ ‘घराण्या’तील खासदार तेव्हा निवडून येऊ शकले होते! तरीही समाजवादी पार्टीने २२ टक्‍के मते घेतली होतीच! काँग्रेसच्या मतांत मात्र तेव्हा जवळपास १४ टक्‍क्‍यांची घट होऊन, ती अवघ्या साडेसात टक्‍क्‍यांवर आली होती. या पार्श्‍वभूमीवर आता या दोन पक्षांच्या आघाडीला ४२ टक्‍के मते मिळवणारा भाजप, तसेच १९ टक्‍के मते मिळवणारी मायावती यांची ‘बहुजन समाज पार्टी’ यांचा सामना करायचा आहे. 

हा सामना सोपा अर्थातच नाही. भाजपच्या हाती केंद्रातील सत्ता आहे आणि त्या जोरावर नरेंद्र मोदी कशी भरमसाट आश्‍वासने देऊ शकतात, त्याची प्रचिती बिहारच्या निवडणुकीत आलीच आहे. तरीही समाजवादी पार्टीची यादव- मुस्लिम मतपेढी आता काँग्रेसशी झालेल्या हातमिळवणीमुळे अधिक विस्तारू शकते आणि त्यात काँग्रेसच्या पारंपरिक ब्राह्मण मतांची भर पडू शकते. मुख्य मुद्दा हा काँग्रेसला आलेल्या वास्तवाच्या भानाचा आहे,

त्यामुळेच भविष्यावर नजर ठेवून, सोनिया- राहुल तसेच प्रियांका आणि त्यांचे सल्लागार यांनी ही आघाडी केली आहे. या आघाडीला यश मिळाल्यास संपूर्ण देशाचेच राजकारण बदलू शकते आणि अखिलेश यांची प्रतिमा अधिकच ‘लार्जर दॅन लाइफ’ होऊ शकते. नेमकी हीच प्रतिमा राहुल यांच्या महत्त्वाकांक्षांमध्ये अडसरही मग ठरू शकते, याचेही भान काँग्रेसला ही आघाडी करताना असेलच! तरीही तूर्त भागीदारीत का होईना, सत्तेवर स्वार होण्याच्या आशेने पक्षाने ‘सायकल’चे हॉपिंग सुरू केले आहे.

Web Title: congress hopping