देशाचे मनोबल उंचावणारी कारवाई

देशाचे मनोबल उंचावणारी कारवाई
देशाचे मनोबल उंचावणारी कारवाई

लष्कराने अतिशय नेमकेपणाने आणि योजनाबद्धरीत्या कारवाई केली. पाकिस्तानी नेते आणि लष्कराला हादरा देणारी आणि गोंधळात टाकणारी ही कृती होती. हा आक्रमक पवित्रा आणि त्यामागे उभी राहिलेली राजकीय इच्छाशक्ती देशाचे मनोबल उंचावणारी आहे.

गुरुवारची दुपार. अनेक न्यूज चॅनेल्सनी अचानक कधीनव्हे ते एक "खरीखुरी‘ ब्रेकिंग न्यूज दाखवायला सुरवात केली. एक-दोन नव्हे, तर एकाचवेळी तब्बल सात वेळा ताबारेषा पार करत पाकिस्तानवर भारतीय लष्कराने केलेल्या तडाखेबंद कारवाईची होती ही बातमी ! मध्यरात्री घडवून आणलेल्या या लष्करी हल्ल्याची माहिती भारतीय लष्करी कारवाई विभागाचे महासंचालक लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग (डीजीएमओ) यांनी दिली.

जम्मू आणि काश्‍मीरच्या दिशेने ताबारेषेपलीकडे काही अतिरेकी एकत्र दबा धरून बसल्याची आणि त्यांच्याकडून भारतावर होऊ घातलेल्या संभाव्य हल्ल्याची माहिती भारतीय लष्कराच्या हाती त्यांच्या गुप्तचर यंत्रणांमार्फत आली होती. ही माहिती हाती येताच भारतीय लष्कराने आपल्या सामर्थ्याची चुणूक दाखवत आणि थेट नियंत्रणरेषेपार धडक मारत ही सशस्त्र कारवाई केली आणि दबा धरून बसलेल्या अतिरेक्‍यांचा खात्मा करत आपल्या सैन्याची तुकडी भारतीय लष्करी तळावर सकाळ होण्याच्या आत सुरक्षितपणे पोचलीदेखील ! ही कारवाई झाल्यानंतर पाकिस्तानच्या डीजीएमओंना भारताने केलेल्या या कारवाईबद्दल कळविण्यातही आले.

भारताकडून अशाकाही स्वरूपात एकापाठोपाठ एक नियंत्रणरेषेबाहेर हल्ले केले जातील, याची तिळमात्रही कल्पना नसल्यामुळे या धडक कारवाईने पाकिस्तानी नेतृत्वाला हा हादराच होता. ते पूर्णपणे गोंधळून गेले. "असे काही घडलेच नाही‘, असे सांगण्यापासून ते "आम्ही मूँहतोड जबाब देऊ‘, असे सांगण्यापर्यंत वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या गेल्या त्या या संभ्रमामुळेच.

18 सप्टेंबरच्या युरी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराकडून अशा प्रकारचा नियंत्रित हल्ला (सर्जिकल स्ट्राइक) प्रत्युत्तरादाखल केला जाईल, अशी शक्‍यता होतीच. त्याच दिशेने ते प्रत्यक्षात घडलेदेखील. "सर्जिकल स्ट्राइक‘, अर्थात नियंत्रित स्वरूपाचा लष्करी हल्ला, म्हणजे प्रत्येक परिस्थितीची अचूक माहिती हाताशी ठेवत, पूर्ण तयारीनिशी आणि तंतोतंत पद्धतीने केला जाणारा हल्ला ! अतिशय आक्रमक अशा कमांडोजचा समावेश असणाऱ्या इन्फन्ट्री बटालियनचे विशेष सैन्य अशा हल्ल्यासाठी आवश्‍यक असते. अनेक दिवसांच्या अचूक माहितीसंकलनातून आणि शत्रूराष्ट्राविषयीच्या बारीकसारीक निरीक्षणांच्या आधारे असे हल्ले घडवता येऊ शकतात. प्रसंगी त्यासाठी चालकरहित विमाने वापरून लक्ष्य निश्‍चित केले जाते. त्याद्वारे महत्त्वाची माहिती गोळा केली जाते. उच्चकोटीचे आणि खडतर प्रशिक्षण यासाठी गरजेचे असते. रात्री-अपरात्री शत्रूच्या प्रदेशात कुणालाही काकणभरही आपल्या अस्तित्वाची जाणीव न होऊ देता "लक्ष्या‘वर थेट हल्ला चढविणे आणि कमीत कमी वेळेत मोहीम फत्ते करून परत येणे, हे सर्जिकल स्ट्राइकचे व्यवच्छेदक लक्षण म्हणायला हवे. महत्त्वाचे म्हणजे, हल्ला घडवून आणल्यानंतर आपल्या स्थानी सुरक्षित पोचणे, हे या प्रकारच्या हल्ल्यांतील सर्वांत मोठे आव्हान असते. आपल्या सैनिकांनी तेच यशस्वीपणे पेलले...

ताबारेषेपलीकडे असणाऱ्या काही ठराविक जागा अशा आहेत, की जेथे दहशतवादी दबा धरून बसलेले असतात. पाकिस्तानी लष्कर ठाण्यांच्या जवळपासच हे अतिरेक्‍यांचे तात्पुरते तळ तयार केलेले असतात. गुरुवारी जे झाले, तेव्हा अशीच परिस्थिती होती. त्यामुळे या दहशतवादी तळांवरून भारतात हल्ले होण्याआधीच त्यांना नेस्तनाबूत करणे हे अत्यावश्‍यक होते... आणि आपण त्यासाठीच ही कारवाई घडवून आणली.

ज्या पद्धतीने भारतीय लष्कराने या कारवाईची योजना आखली ती केवळ कौतुकास्पद होती. नियंत्रण रेषेपार एकाचवेळी सात जोरदार हल्ले चढविणे आणि त्यात अतिरेकीच नव्हे, तर पाकिस्तानी लष्कराचीही पळताभुई थोडी करत त्यांचा खात्मा घडवून आणणे, यातून आपल्या लष्कराने कसून केलेली तयारी, त्यांचे चोख प्रशिक्षण, दुर्दम्य महत्त्वाकांक्षा आणि अर्थातच आपल्या नेतृत्वकौशल्याचेही दर्शन घडवले आहे.

या कारवाईनंतर भारताकडून आता पुन्हा याच स्वरूपाचे हल्ले केले जाणार नसल्याचे डीजीएमओकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे आता पुन्हा काही कुरापत काढल्यास त्याची जबाबदारी पाकिस्तानवरच असेल, असा संदेशही यातून गेला आहे.

आता खरी पंचाईत पाकिस्तानची झाली आहे. या सगळ्यानंतर आता त्यांनी जर जशास तसे उत्तर द्यायचे ठरविलेच, तर त्यातून भारताने पाकिस्तानी लष्कराला धोबीपछाड दिल्याचे पाकिस्तानने अप्रत्यक्षपणे मान्य केल्यासारखेच होईल. आणि असे जर घडले, तर त्यातून पाकिस्तानी लष्कराची अब्रू जाईल. याआधी ओसामा बिन लादेन याचा खात्मा करण्यासाठी अमेरिकेचे सैन्यही पाकिस्तानात असेच मध्यरात्री घुसले होते आणि कुणाला काही कळण्याच्या आत त्यांनी आपली कारवाई फत्ते केली होती. या प्रकरणामुळे पाकिस्तानी लष्कराच्या "क्षमतां‘बाबत प्रश्‍नचिन्ह उभे राहिलेच होते, अशातच आता भारताने केलेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तानी लष्कराच्या कमकुवत असण्यावर शिक्कामोर्तबच होणार हे नक्की... तर दुसरीकडे जर प्रत्युत्तर म्हणून लगोलग काही केले नाही, तरीही पाकिस्तानची व त्यांच्या लष्कराची पंचाईतच आहे. कारण एवढे होऊनही काहीच केले नाही, असा आरोपही होऊ शकतो. इकडे आड तिकडे विहीर अशी त्यांची अवस्था भारताने करून सोडली आहे.

भारतीय जनता पक्ष; विशेषतः नरेंद्र मोदी कायमच पाकिस्तानबाबत कठोर आणि कणखर भूमिकेची मागणी करत आले आहेत. पण त्यांच्या सत्ताकाळातच पठाणकोट आणि उरी येथे पाकिस्तानकडून लष्करी तळांवर हल्ले झाल्यामुळे जनमत प्रक्षुब्ध तर झालेच, पण मोदींच्या प्रतिमेविषयीदेखील प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले. कालच्या कारवाईने मोदींची ती प्रतिमा पुनःस्थापित झाली. गेल्या अडीच वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत मोदींनी घेतलेला हा सर्वांत अवघड निर्णय होता.

या कारवाईमुळे संघर्ष चिघळला, पाकिस्तानने काही कुरापत काढली, तर सरकार आणि लष्कर परिस्थिती कशी हाताळते, यावर बरेच काही अवलंबून आहे. संभाव्य परिणामांचा विचार करून सरहद्दीवर भारताने सुरक्षेचे उपाय योजले आहेत. पाकिस्तानकडून सीमेपलीकडून तोफगोळ्यांचा मारा होऊ शकतो. पाकिस्तानी सैन्याचे एखादे विशेष दल हल्ला चढवू शकते किंवा दहशतवाद्यांचाच वापर करून घातपाती कारवायाही संभवतात. त्यामुळेच पुढील काळात भारताला अत्यंत सावध राहावे लागणार आहे. मर्यादित संघर्षाच्या पलीकडे तो चिघळणे आणि त्याचे सर्वंकष युद्धात रूपांतर होण्याची परिस्थिती सध्यातरी नाही. मात्र या परिस्थितीवर सातत्याने नजर ठेवणे अत्यावश्‍यक आहे.

भारताच्या या आक्रमक कारवाईच्या दरम्यान लष्करी दल आणि मोदी सरकार यांच्यामागे सारे राष्ट्र उभे असल्याचा जो प्रत्यय येत आहे, तो निश्‍चितच देशाचे मनोबल व नीतिधैर्य वाढविणारा आहे, यात शंका नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com