पराभवातही जिंकणारी बाजीगर दीपा (नाममुद्रा)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 ऑगस्ट 2016

रिओ ऑलिंपिक स्पर्धेत भारतीयांची होणारी "शोभा‘ हिरमोड करणारी ठरत आहे; परंतु पराभवातही ताठ मान ठेवण्याचा आणि भविष्याचा "दीप‘ लावण्याचा पराक्रम कालपरवापर्यंत जिचे नाव कोणालाही माहित नव्हते त्या त्रिपुराच्या दीपा कर्माकरने केला. ऑलिंपिक आता समारोपाकडे झुकलेली असताना भारताची पाटी अजून कोरीच आहे. त्यामुळे आता तमाम भारतीयांचा संयम ढळू लागला आहे. यापेक्षा पदकाची अपेक्षा करणेच त्यांनी सोडून दिले आहे. अपयशाच्या काळोखात एक दिवा निश्‍चितच सर्व काही उजळून टाकेल, असा विश्‍वास कोठे तरी आशा कायम ठेऊन होता. केवळ क्रीडाप्रेमीच नव्हे, तर सव्वाशे कोटी भारतीय दीपाच्या अंतिम सामन्यावर डोळे लावून होते.

रिओ ऑलिंपिक स्पर्धेत भारतीयांची होणारी "शोभा‘ हिरमोड करणारी ठरत आहे; परंतु पराभवातही ताठ मान ठेवण्याचा आणि भविष्याचा "दीप‘ लावण्याचा पराक्रम कालपरवापर्यंत जिचे नाव कोणालाही माहित नव्हते त्या त्रिपुराच्या दीपा कर्माकरने केला. ऑलिंपिक आता समारोपाकडे झुकलेली असताना भारताची पाटी अजून कोरीच आहे. त्यामुळे आता तमाम भारतीयांचा संयम ढळू लागला आहे. यापेक्षा पदकाची अपेक्षा करणेच त्यांनी सोडून दिले आहे. अपयशाच्या काळोखात एक दिवा निश्‍चितच सर्व काही उजळून टाकेल, असा विश्‍वास कोठे तरी आशा कायम ठेऊन होता. केवळ क्रीडाप्रेमीच नव्हे, तर सव्वाशे कोटी भारतीय दीपाच्या अंतिम सामन्यावर डोळे लावून होते. तिचे पदक हुकले असले, तरी जिवाची बाजी लावून तिने दिलेले सर्वस्व पाहून धन्य झाल्याची भावना सर्वांच्या मनात होती. ऑलिंपिकच्या महासागरात पहिल्यांदाच उतरल्यानंतर अविस्मरणीय भरारी घेणाऱ्या दीपाचे पदकाचे लक्ष्य थोडक्‍यात हुकले. एरवी अशा हुकलेल्या अपयशाची रुखरुख अस्वस्थ करणारी असते; पण दीपाला अख्खा देश शाबासकी देत होता. गळ्यात पदक नसले म्हणून काय झाले, आमच्यासाठी तू सुवर्णकन्याच आहेस, अशी भावना प्रत्येकाच्या मनात होती. पराभवातही जिंकणाऱ्याला बाजीगर का म्हणतात? हे दीपाच्या एकूणच प्रवास आणि कामगिरीबाबत म्हणता येईल.

कलात्मक जिम्नॅस्टिकमधील व्हॉल्ट हा प्रकार पाहायला नयनरम्य असला, तरी त्यात एखादी चूक झाली तर जीवानिशी जाण्याची भीती असते. आतापर्यंत या खेळात परदेशी खेळाडूंना पाहून आश्‍चर्य आणि अप्रुप वाटणाऱ्या भारतीयांसाठी जेव्हा आपल्या देशातील आणि तीही त्रिपुरासारख्या शहरातून आलेली मुलगी, विश्‍वविख्यात खेळाडूंच्या तोडीस तोड लवचिकपणा दाखवते, तीच मोठी कामगिरी ठरते. भारताच्या ऑलिंपिक इतिहासात पहिल्यांदा जिम्नॅस्टिकमध्ये स्थान मिळणाऱ्या दीपाला जेव्हा या खेळाची आवड निर्माण झाली आणि फ्लोवरवर पाय ठेवण्याची इच्छा झाली, तेव्हा पाय सपाट असल्याचे सांगून तिला बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. येथूनच आपल्या क्रीडा संस्कृतीच्या विचारधारणेतील कोतेपणा दिसून येतो. ही कीड काढून टाकली जात नाही, तोपर्यंत पदकांची अपेक्षा करणेच चुकीचे आहे.