प्रश्‍नांचे माहात्म्य

प्रश्‍नांचे माहात्म्य

रोजच्या जगण्यात अनेक प्रश्‍न आपल्याला भंडावून सोडत असतात. अगदी ‘आज कपडे कुठले घालावेत’ या प्रश्‍नापासून ‘कसं होणार या जगाचं’ या प्रश्‍नापर्यंत प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर मिळतेच असे नाही. कधी आपण प्रश्‍नांचा पाठपुरावा करत नाही, तर कधी प्रयत्न करूनही उत्तर मिळतच नाही. उत्तरे मिळाली तरी नवे प्रश्‍न पडणे थांबत नाही. काही वेळा प्रश्‍नांच्या भोवऱ्यात सापडून भोवंडून जायला होते आणि वाटते का हे असे प्रश्‍न छळतात आपल्याला? (पुन्हा प्रश्‍न)!

पण विचार करून पाहा. आपल्याला प्रश्‍नच पडत नसते तर? एखाद्या दगडाला, लाकडाला किंवा या कागदाला, पेनाला प्रश्‍न पडूच शकत नाहीत. कारण, ते निर्जीव आहेत. सजीवांची गोष्ट वेगळी. त्यांना गरजा असतात. त्या गरजांची जाणीव असते. गरजा भागवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. उत्क्रांतीच्या शिडीवर जो सजीव जितका वर, तितक्‍या त्याच्या गरजा जास्त आणि जास्त गुंतागुंतीच्याही. आपण या शिडीच्या सर्वांत वरच्या पायरीवर असल्यामुळे आपल्या गरजा फक्त शारीरिकच नव्हे, तर मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक, नैतिक अशा अनेक प्रकारच्या असतात. त्यामुळे या सर्व पातळ्यांशी निगडित प्रश्‍न आपल्याला पडत राहतात. त्या प्रश्‍नांच्या संदर्भातच आपलं वैयक्तिक आणि सामाजिक जीवन घडत राहतं.

हे प्रश्‍न आपल्याला पडलेच नसते, त्यांची उत्तरे मिळवण्याचा खटाटोप आपण केलाच नसता, तर आपण आणि एखादा लाकडाचा ओंडका किंवा किडा-मुंगी किंवा अगदी उत्क्रांतीच्या प्रक्रियेतला आपला सख्खा शेजारी- माकड, यामध्ये आणि आपल्यात काहीच महत्त्वाचा फरक उरला नसता. आपणही नैसर्गिक वासना, प्रेरणांच्या पातळीवर जगलो असतो आणि ‘संस्कृती’ नावाचे काही निर्माणच झाले नसते. आपल्या पुराणकथा, धर्म, तत्त्वज्ञान, विज्ञान या सगळ्यांच्या मुळाशी काय असेल, तर ते मनुष्य नावाच्या प्राण्याला पडणारे प्रश्‍नच!

त्यामुळेच प्रश्‍न आपल्याला कितीही त्रस्त करून सोडत असले, तरी प्रश्‍नाचे महत्त्व समजून घ्यायला हवे. माणसाला जिज्ञासेचे, कुतूहलाचे जे वरदान लाभले आहे, तेच प्रश्‍नाच्या रूपात व्यक्त होत असते. त्यामुळेच प्रश्‍न कोणी, कधी, कुठे, किती आणि कसे विचारायचे यासंबंधीच्या नियमाचा जाच नसलेले लहान मूल सतत प्रश्‍न विचारत असते. उत्तरे जाणून घ्यायला उत्सुक असते. (वाढत्या वयात, जिज्ञासा क्षीण होते किंवा तिच्यावर निरनिराळी बंधने येतात.) प्रश्‍न विचारायला बंदी करणे हे माणसाच्या मूळ जिज्ञासेला गुदमरून टाकते. मग विचारही खुंटतो आणि जिथे विचार खुंटतो, तिथे मनुष्यप्राण्यात ते मनुष्यत्व दुबळे होऊन त्याचे प्राणी असणे ठळक होत जाते.

माणूस म्हणून जगायचे असेल, तर जिज्ञासा शाबूत ठेवायला हवी. न बिचकता, न घाबरता प्रश्‍न विचारायला हवेत. स्वतःबद्दल, समाजाबद्दल, सगळ्या जगाबद्दल आणि या सगळ्यांमधल्या संबंधांबद्दलही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com