लक्षणावर उपाय, विकाराचे काय?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 सप्टेंबर 2016

महाराष्ट्रासह देशातील कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, पश्‍चिम बंगाल या प्रमुख राज्यांमधील नागरिक डेंगी आणि चिकुनगुनियाच्या तापाने फणफणले आहेत. एडिस इजिप्ती या डासांपासून संसर्ग होणाऱ्या या कीटकजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. देशभरात जानेवारीपासून आतापर्यंत 40 हजार रुग्णांना डेंगी झाला असून, त्यात 78 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. लक्षणांच्या आधारावर उपचार, हाच या आजारावर रामबाण उपाय असल्याने ताप कमी करण्यासाठी वापरण्यात येणारे पॅरासिटेमॉल हे औषध अशावेळी उपयुक्‍त ठरते.

महाराष्ट्रासह देशातील कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, पश्‍चिम बंगाल या प्रमुख राज्यांमधील नागरिक डेंगी आणि चिकुनगुनियाच्या तापाने फणफणले आहेत. एडिस इजिप्ती या डासांपासून संसर्ग होणाऱ्या या कीटकजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. देशभरात जानेवारीपासून आतापर्यंत 40 हजार रुग्णांना डेंगी झाला असून, त्यात 78 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. लक्षणांच्या आधारावर उपचार, हाच या आजारावर रामबाण उपाय असल्याने ताप कमी करण्यासाठी वापरण्यात येणारे पॅरासिटेमॉल हे औषध अशावेळी उपयुक्‍त ठरते. त्यामुळेच देशभरात डेंगी आणि चिकुनगुनियामुळे पॅरासिटेमॉल आणि ते एकत्र करून दिल्या जाणाऱ्या या औषधाची मागणी वाढली आहे. "नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऍथॉरिटी'ने (एनपीपीए) पॅरासिटेमॉलची किंमत 35 टक्‍क्‍यांनी कमी करण्याचा निर्णय घेऊन रुग्णांना निश्‍चितच दिलासा मिळेल. मात्र हा एक आनुषंगिक उपाय आहे, हे लक्षात घ्यायला हवे. चिकुनगुनियाच्या 17 हजार रुग्णांची नोंद राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमात (एनव्हीबीडीसीपी) करण्यात आली आहे. देशात सर्वाधिक चिकुनगुनिया कर्नाटकमध्ये असून, महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात आढळलेल्या एक हजार 24 रुग्णांपैकी 95 टक्के चिकुनगुनियाचे रुग्ण पुणे शहरातील आहेत. ताप, थंडी, अंग, सांधेदुखी अशी या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. मात्र, कीटकजन्य रोगांचा इतक्‍या मोठ्या प्रमाणात उद्रेक होणे, हेच सरकारी यंत्रणांचे मोठे अपयश आहे. त्यामुळे पॅरासिटेमॉलच्या किमती कमी करण्याचे पाऊल योग्य असले तरी खरे आव्हान हे प्रतिबंधात्मक उपायांचे आहे. लक्षण नाहीसे झाले म्हणजे रोग गेला असे नाही, हे जसे खरे आहे, तसेच औषधांच्या किमती कमी करून कीटकजन्य आजारांची मूळ समस्या हटणार नाही.
देशात या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने मेमध्येच दिला होता. स्वच्छ पाण्यावर पैदास होणारे एडिस इजिप्तीसारखे डास वाढणार असल्याचे स्पष्ट चित्र त्या वेळी दिसत होते. त्या वेळी डासांचा प्रतिबंध करण्यासाठी सर्वंकष उपाययोजना करायला हव्या होत्या. त्याबाबत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या; प्रत्यक्षात मात्र कोणतेच पाऊल उचलले गेले नाही. त्यामुळे तापाने फणफणाऱ्यांची संख्या देशभर वाढताना दिसत आहे.