मुत्सद्देगिरीची दोन वर्षे!

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

मुख्यमंत्री फडणवीस यांनी गेल्या दोन वर्षांत मोठ्या तडफेने काम केले. मुत्सद्देगिरीने राजकीय आघाडीवरही यश मिळविले. पण मराठा, तसेच दलित मोर्चांमुळे निर्माण झालेली अस्वस्थता दूर करून, त्यावर तोडगा काढण्याचे मोठे आव्हान आता त्यांच्यापुढे आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यंदाची दिवाळी अतीव आनंदाची गेली असणार, यात शंका नाही! दोन वर्षांपूर्वी आजच्याच तारखेला त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तेव्हा त्यांच्या पाठीशी विधानसभेत बहुमत नव्हते, शिवाय वरुणराजाच्या अवकृपेमुळे राज्यावर दुष्काळाची छाया होती. विधानसभेतील बहुमत हे त्यांना शिवसेनेने विरोधी बाकांवरून उठून थेट सत्ताधारी बाकांवर जाऊन बसण्याचा निर्णय घेतल्यामुळे अलगद प्राप्त झाले, तर यंदा वरुणराजाने भरभरून वर्षाव केल्यामुळे "शेते पिकून पिवळी झाली नसली,' तरी राज्यभरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न संपुष्टात आला आहे. शिवाय, एकनाथ खडसे यांच्यासारख्या बहुजन समाजातील नेत्याला गैरव्यवहारांच्या आरोपांवरून मंत्रिमंडळातून बाहेर जाणे भाग पडल्यामुळे कारभार करतानाही त्यांना मोकळीक मिळाली. दुसरीकडे निवडणुकीतील दारुण पराभवामुळे कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस हतबल झाले आहेत. त्यामुळे फडणवीस यांना मैदान मोकळे न होते, तरच नवल! तेव्हा त्यांची यंदाची दिवाळी आनंदात साजरी होणे स्वाभाविक आहे. मात्र, पुढच्या वर्षीची दिवाळीही इतकीच आनंददायी असेल काय, हाच प्रश्‍न आज पाडव्याच्या मुहूर्तावर फडणवीस यांच्या मनात घोळत असणार.

फडणवीस यांनी गेल्या दोन वर्षांत मोठ्या तडफेने काम केले, यात शंकाच नाही. मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यावर त्यांच्यापुढील मोठे आव्हान हे राज्यातील तहानलेल्या जनतेला दोन घोट पाणी देण्याचे जसे होते, त्याचबरोबर पुढच्या काळासाठी पाण्याची बेगमी करण्याचेही होते. त्यांनी मोठ्या उत्साहाने राबवलेली "जलयुक्‍त शिवार योजना' त्यांच्या पदरात भरभरून पाणी देऊन गेली. "मेक इन महाराष्ट्र'च्या माध्यमातून आठ लाख कोटींचे सामंजस्य करार करून त्यांनी इतिहास घडवला. त्याच वेळी "ईबीसी' सवलतीची उत्पन्नमर्यादा सहा लाखांवर नेऊन, त्यांनी विरोधकांना शह देण्याचीही मुत्सद्देगिरी दाखवली! मात्र, या अशा निर्णयामुळे राज्यांत सध्या मराठा क्रांती मोर्चांनी उभे केलेले तुफान शमेल काय, हा कळीचा प्रश्‍न आहे. त्याचबरोबर दलित व अन्य घटकांचेही मोर्चे सुरू झाले आहेत. त्यामुळे एकंदरीतच संपूर्ण समाजात निर्माण झालेली अस्वस्थता, हे त्यांच्यापुढील आगामी वर्षांतील सर्वांत मोठे आव्हान आहे. शिवाय, या आव्हानास तोंड देण्याची जबाबदारी ही संपूर्ण सरकारवर नव्हे, तर फडणवीस यांच्या एकट्यावर आली आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे या सरकारचा खऱ्या अर्थाने "यूएसपी'- युनिक सेलिंग पॉइंट- हा फडणवीस यांची स्वच्छ प्रतिमाच आहे. आज तरी सरकार म्हटले की, फडणवीस यांचाच चेहरा पुढे येतो; मग विनोद तावडे असोत की पंकजा मुंडे असोत की चंद्रकांतदादा पाटील असोत. बाकी सारेच सहकारी पाठीमागे उभे राहिलेले दिसू शकतात. अर्थात, हे आपोआप घडलेले नाही. त्यास फडणवीस यांची नियोजनबद्ध मुत्सद्देगिरी, तसेच त्यांना असलेला नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा भक्‍कम पाठिंबाही कारणीभूत आहेच. फडणवीस यांचे हेच व्यक्‍तिगत पातळीवरील यश असले, तरी सरकार म्हणून हे दीर्घकाळात अडचणीचेही ठरू शकते.

राजकीय आघाडीवर दणकेबाज कामगिरी असलेल्या या सरकारची आर्थिक आघाडीवरची कामगिरी मात्र तितकी साजरी करण्यासारखी नाही. मोदी यांच्याप्रमाणेच फडणवीस विकासाच्या मुद्द्यावर निवडून आले होते आणि टोलमुक्‍तीपासून अनेक आश्‍वासने भाजपने प्रचारात दिली होती. पैकी टोलमुक्‍तीचा प्रश्‍न अद्याप सुटलेला नाही, त्याचबरोबर "एलबीटी'च्या घोळातूनही सरकार बाहेर पडू शकलेले नाही. आदिवासी भागातील कुपोषित बालकांचा प्रश्‍न सोडवण्यासही सरकार अपयशी ठरले आहे. सर्वांत कळीचे प्रश्न आहेत ते शेतीच्या आघाडीवर. शेतकऱ्यांसाठी निवडणुकीत केलेल्या घोषणा आणि अंमलबजावणी यात प्रचंड अंतर पडले आहे. हा वर्ग अस्वस्थ आहे. हे सारे "पाप' गेली दोन वर्षे भाजप कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या माथ्यावर टाकून, फडणवीस सरकार आपले हात झटकून घेत होते. मात्र, फडणवीस यांनाच आता यातून मार्ग काढावा लागणार आहे. फडणवीस यांचे गेल्या दोन वर्षांतील सर्वांत मोठे यश हे अर्थातच राजकीय आहे. पक्षांतर्गत विरोधाचा सहज बीमोड करतानाच, त्यांनी सत्तेत सहभागी होऊनही विरोधी बाणा ठेवणाऱ्या शिवसेनेला नामोहरम केले आहे. कधी अंगावर घेत, तर कधी चुचकारत फडणवीस यांनी शिवसेनेला युतीच्या चक्रव्यूहात पुरते गुंतवून टाकले आहे. मात्र, मराठा, तसेच दलित मोर्चांमुळे समाजात निर्माण झालेली अस्वस्थता लवकरात लवकर दूर करून, त्या संबंधात कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे मोठे आव्हान आता फडणवीस यांच्यापुढे आहे. नागपूरच्या होमपीचवरच त्यांच्या निवासस्थानी विधिमंडळ अधिवेशनाचा मुहूर्त साधून मराठा क्रांती मोर्चा येऊ घातला आहे. त्याला ते कसे सामोरे जातात, यावर फडणवीस यांची आगामी दिवाळी कशी जाणार ते ठरणार आहे. दोन वर्षे सरताना सरकारने आता झडझडून कामाला लागण्याची वेळ आली आहे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com