मंत्रालयाच्या फुटपाथवर...! (ढिंग टांग!)

मंत्रालयाच्या फुटपाथवर...! (ढिंग टांग!)

चुकला फकीर मशिदीत सापडायचा, या उक्‍तीनुसार आम्हाला शोधायचे तर खुशाल मंत्रालयाच्या परिसरात शोधावे! सांपडू!! पायजेल तर आधी (आम्हाला) फोन करून मग शोध शोध शोधावे! हमखास सांपडू!! मंत्रालयातूनच "यावे‘ असा आम्हालाच फोन आणवलात, तर प्रश्‍नच मिटला! मग तर काय, शतप्रतिशत सांपडू!!! आहो, पत्रकारितेचे असिधाराव्रत घेतलेले जे की आम्ही मंत्रालय सोडोन जाणार तरी कुठे? जेथे साऱ्या बातम्यांची मंत्रणा होत्ये, ते पवित्र स्थळ म्हंजे मंत्रालय. अगदी आइतवारीदेखील मंत्रालयालगतच्या कठड्यावर आम्ही अगत्याने आढळतो, ते काही उगाच नव्हे. असो.

अशीच एक खवट संध्याकाळ! स्थळ : अर्थातच मंत्रालयासमोरील बागीच्यालगतचा कठडा.

""मुंबैत जागेची फार चणचण आहे...नै?,‘‘ शेंगदाण्याच्या पुडीतील शेवटून दुसरा शेंगदाणा खौट लागेल की काय, ह्या भीतीने निरखत आम्ही शेजारील पांथस्थास विचारले. गेला अर्धा कलाक तो इसम आमच्या शेंगदाणासेवनाच्या कार्यक्रमाकडे आवंढे गिळीत पाहत बसला होता. मुंबईत कोणत्याही अजनबी गृहस्थाशी बोलताना जागेची चणचण हा विषय काढावा. गप्पा हमखास रंगतात.

""चूक,‘‘ त्याने उत्तर दिले.

""माणसे कशी इथे किडामुंगीसारखी राहतात...नै?,‘‘ शेंगदाणा खावा की खावो नये, ह्या शेक्‍स्पीअरियन सवालात आमच्या मनाला खुदाई खिन्नता आलेली, त्यात मानवी जीवनमानाच्या खालावलेल्या पातळीची भर पडली होती. वास्तविक मुंबईत माणसे किडामुंगीसारखी राहतात, ह्यात काही बातमी नाही; पण आपले ठोकून बोलावयाचे!

""चूक,‘‘ त्याने पुन्हा उत्तर दिले.

""क्‍येवढी ही गर्दी...नै?,‘‘ अखेर मनाचा हिय्या करून आम्ही तो शेंगदाणा स्वमुखाच्या दिशेने फेंकला. भरून आलेल्या आभाळाच्या पार्श्‍वभूमीवर येकाद्या क्षेपणास्त्राप्रमाणे आकाशगामी होत, त्या अवकाशस्थ वस्तूने प्याराबोलाचा मार्ग अचूक धरत गुरुत्वाकर्षणाचे नियम पाळून आमच्या स्वमुखविवराकडे मोहरा वळवला. वाचकहो, हा क्षण अतिनिर्णायक असतो. शेंगदाण्याचे उड्डाण यशस्वी होणार की सपशेल अयशस्वी, हे ह्या क्षणावर अवलंबून असत्ये. पांथस्थानेही नकळत "आ‘ करून दुसरे विवर उघडे करून ठेविले होते...

""आऽऽआऽऽऽ...हात्तिच्या!,‘‘ पांथस्थ हळहळला. शेंगदाणा आमच्या विवरात गडप झाला होता.

""ज्याला मुंबईत जागा मिळाली, त्याचा बेडापार झाला!,‘‘ आम्ही. आता एकच अखेरचा शेंगदाणा उरला होता. तो संपला की पुडी संपली. इल्ले!

""ही बंगल्यांची रांग कोणाची हो?,‘‘ रस्त्यापलीकडच्या घरांकडे बोट दाखवत पांथस्थाने सहज पृच्छिले.

""असतील कोणी मंत्री-संत्री! आपल्याला काय त्याचे?,‘‘ आम्ही उडवाउडवीचे उत्तर दिले.

""काय भाडं पडत आसंल हिते?,‘‘ पांथस्थ भलता चिकट होता.

"" भाडं? फार गरम पडतं राव!,‘‘ आम्ही.

"" मी तं ठरवलाय! ऱ्हायलो तर मलबार हिलवर, नाय तर नाय!,‘‘ मघापर्यंत आमच्या शेंगदाण्याच्या पुडीकडे आशाळभूत नजरेने पाहणारा तो पांथस्थ बेमूर्वतखोरपणे म्हणाला.

""मलबार हिल?‘‘ आम्ही च्याटंच्याट! मुंबईचा फुटपाथदेखील कसली कसली स्वप्ने बघायला लावतो.

""मलबार हिलवर गर्दी नाही राहत... निवांत आयुष्य! तुमचं ते किडामुंगीछाप लाइफ हवंय कोणाला?,‘‘ पुढ्यातील वाहत्या रस्त्यावरच्या किडामुंग्यांकडे तुच्छतेने पाहत पांथस्थ अशा काही आवाजीत हे वाक्‍य म्हणाला, की गेली चार टर्मा गडी इलेक्‍शने जिंकून मलबार हिल्लचा पर्मनंट रेसिडंट झाला आहे.

""त्याला बारकीशी अट आहे, राजे हो! ट्रेन-बशीला लोंबकळणाऱ्यांचे ते काम नोहे!,‘‘ आम्ही समजूत घालत म्हणालो. माणसाने ज्ञान वाटावे, म्हंजे ते वाढते!

""कसली अट? अटबिट अपनेकू मालूम नै!,‘‘ पांथस्थ पेटला होता.

""मलबार हिलवर ऱ्हायला जायचं तर त्याला मंत्री व्हावं लागतं!,‘‘ आम्ही अखेर शेवटचा शेंगदाणा उचलत निकराने म्हणालो.

""मग कोण म्हणतं आम्ही मंत्री नाही? कालच मागल्या बाजूला आम्ही शपथ घेतली की!,‘‘ पांथस्थाने केलेला गौप्यस्फोट आणि शेवटला शेंगदाणा खवट निघणे हे एकाच वेळी घडले!

आमच्या चिमटलेल्या तोंडाकडे पाहत तो खोल आवाजात म्हणाला, ""मंत्री होऊनही घर मिळेना मुंबईत! ह्याला काय अर्थ ऱ्हायला?‘‘
असो.

-ब्रिटिश नंदी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com