पुढे काय? (ढिंग टांग)

पुढे काय? (ढिंग टांग)

स्थळ - मातोश्री, वांदरे. वेळ - युद्धानंतरची शांतता! 
प्रसंग - हुश्‍श!! पात्रे - आपल्या सर्वांचे लाडके उधोजीसाहेब आणि प्रिन्स विक्रमादित्य.
...............................
विक्रमादित्य - हाय देअर बॅब्स...आत येऊ?
उधोजीसाहेब - (तत्काळ) नको!
विक्रमादित्य - (निषेधाचा सूर लावत) बट व्हाय? आखिर क्‍यों? पण का? 
उधोजीसाहेब - (उश्‍या, पांघरुणं नीट मांडत) कारण हेच... की मी दमलोय!
विक्रमादित्य - व्हाय डोंट यू हॅव बोर्नव्हिटा? 
उधोजीसाहेब - (संयमाने) तूच पी!! आणि झोपायला जा!! गेले महिनाभर नुसता राबतोय मी... वाघासारखा! सकाळ, दुपार, संध्याकाळ नुसती भाषणं!!.. येवढी मोठी निवडणूक झाली, दमायला नाही का रे होत तुम्हाला?
विक्रमादित्य - (उत्साहाने फसफसत) कमॉन!! त्यात दमण्यासारखं काय आहे? झोपता काय... स्सामील व्हा!! आता तयारी विजयोत्सवाची!! काळ येऊन ठेपला... वेळ येऊन ठेपली... काही तासांतच मतमोजणी होऊन आपल्या विजयाची फायनल तुतारी वाजेल!! वी मस्ट सेलिब्रेट!!
उधोजीसाहेब - खरंच होईल ना रे विजय आपला?
विक्रमादित्य - (आश्‍चर्यचकित होत) म्हंजे काय? तुम्हीच मोदी अंकलना इनव्हाइट केलंय ना?
उधोजीसाहेब - (खजील होत) केलंय...पण-
विक्रमादित्य - (खुशालत) रिसेप्शन इव्हन बिफोर म्यारेज!! हाहा!! तुमची पण कमालच आहे!! मघाशी फडणवीसकाकांचा फोन आला होता!!
उधोजीसाहेब - (दचकून) काय म्हणाले ते?
विक्रमादित्य - (डोकं खाजवत) ते म्हणाले, की ‘तुम्ही आम्हाला बोलावत नसलात, तरी आम्ही तुम्हाला तेवीस तारखेला बोलावणार आहो!! हा माझा शब्द आहे!’
उधोजीसाहेब - (दातओठ खात) असं म्हणाले ते? बघतोच आता त्यांना!!
विक्रमादित्य - (थंडपणाने) डोण्ट वरी! मी त्यांना ‘तेवीस तारखेला संध्याकाळी आमच्या घरी या,’ असं कळवूनसुद्धा टाकलं!! पण ते म्हणाले, ‘तुम्हीच या! तेवीस तारखेला गुरुवार आहे. खिमा आणि कोळंबी चालणार नाही!!’ 
उधोजीसाहेब - (खचलेल्या आवाजात) तू झोपायला गेलास तर उद्या मी तुला एक क्‍याडबरी देईन! खरंच दमलोय रे!! भाषणं करून करून पाय दुखताहेत!!
विक्रमादित्य - (समजूतदारपणाने) फुटबॉल खेळून खेळून माझाही घसा दुखतोय!! पण मी कंप्लेंट करतोय का? बाय द वे, माझी फुटबॉलवाली जाहिरात पाहिलीत ना? लोकांना जाम आवडली... ‘असं फुटबॉलचं मैदान इंडियात नेमकं कुठं आहे,’ असं विचारत होते लोक!! हाहा!!
उधोजीसाहेब - (घाईघाईने) तू झोपायला जा बरं!! (निश्‍चयाचा महामेरू...) ह्या निवडणुकीनंतर मी एक फायनल निर्णय घेतलाय!
विक्रमादित्य - (उत्सुकतेने) कुठला बॅब्स?
उधोजीसाहेब - कळेलच तेवीस तारखेला!! 
विक्रमादित्य - (शंका येऊन)...आपण सेलिब्रेशन नक्‍की करायचंय ना?
उधोजीसाहेब - (क्षणभर विचार करत) अलबत!! हे काय विचारणं झालं? शेवटी विजय आपलाच होणार आहे!! त्या पारदर्शकवाल्यांना पारदर्शक विजय मिळेल!! बघतोच आता एकेकाला!! 
विक्रमादित्य - (कमरेवर हात ठेवून) मग ‘खरंच विजय मिळेल ना रे,’ असं का विचारलंत? 
उधोजीसाहेब - (समंजसपणाने) माणसानं कुठल्याही परिस्थितीला तयार असलं पाहिजे, इतकंच!
विक्रमादित्य - (बुचकळ्यात पडून) म्हंजे?
उधोजीसाहेब - मी एक फायनल निर्णय घेतलाय! तेवीस तारखेला सेलिब्रेशन झालं तर लग्गेच क्‍यामेरा उचलायचा आणि वाघांचे फोटो काढायला ताडोबाच्या जंगलात जायचं! आणि नाही झालं तर...
विक्रमादित्य - ...तर काय?
उधोजीसाहेब - (शांतपणाने) तर लग्गेच क्‍यामेरा उचलून परदेशी जंगलात जायचं! जय महाराष्ट्र.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com