‘कमळ’पत्रे! (ढिंग टांग)

‘कमळ’पत्रे! (ढिंग टांग)

(तारीख : २६ जानेवारी २०१७)

सौ. कमळाबाई हीस,
गेल्या ऑक्‍टोबरापासून तुझी लक्षणे बरी दिसत नाहीत. एका घरात राहून घरचे वासे मोजतेस? बाई आहेस का कोण? चालती हो माझ्या घरातून!! यापुढे तुझा माझा संबंध संपला! संपला!! संपला!! पंचवीस वर्षं तुझ्याबरोबर राहून सडलो!! असा एकही दिवस गेला नाही, की तुला शिव्याशाप दिले नाहीत; पण आता हा आमचा खरोखरचा जय महाराष्ट्र!! तुझे काळे तोंड पाहण्याची इच्छा नाही. तुझा कधीही नसलेला. उ. ठा.
* * *

(तारीख : १४ फेब्रुवारी २०१७)
ती. उधोजीसाएब यांशी दाशी कमळाबाईचा शिर्सास्टांग नमस्कार. 

तुमच्या सांगण्यावरून मी माहेरी निघूण आले. त्या दिवशी कित्ती बोल्लात मला. अजून आठवले, तर अंगावर काटा येतो व डोळ्यात पाणी एते. पुर्षाचे ऱ्हिदय दगडाचे असते, हेच खरे. आज व्हालेंटाइन डे!! दर व्हालेंटाइन डे रोजी तुम्ही (एका गुडघ्यावर बसूण) मला गुलाब देत होता. औंदा गुलाब नाही; पण मीच तुम्हाला कमळ पाठवत्ये आहे. वास घेऊ नए!! कमळाचा वास घेईत नाहीत. बाकी इकडील सर्व ठीक. प्रक्रुतीस जपावे. अजूणही आपलीच. कमळाबाई.
* * *

(तारीख : १८ फेब्रुवारी २०१७)
कमळे-

पुन्हा पत्र पाठवशील तर याद राख!! कमळाचे फूल पाठवून आम्हाला खिजवत्येस? असली छप्पन कमळे आली आणि गेली!! आता तुझी-माझी भेट रणांगणातच. हा उधोजी एक घाव, दोन तुकडे करणारा आहे, हे आता तरी कळले ना? नाही तुझा बॅंड वाजवला तर नावाचा उधोजी नाही. पत्र पाठवू नको. फोनबिन करू नको. मराठी येत नसेल तर इंग्लिशमध्ये सांगू?- तू मला मेलीस!!
 उधोजी.

* ** 

(तारीख : २३ फेब्रुवारी २०१७)
श्रीमान उधोजीसाएब यांशी,

 दाशी कमळाबाईचा सास्टांग नमस्कार. कळविण्यास आत्यंत आनंद होतो, की इकडील सर्व सुखरूप आहे. एताना मी दुधाचे भांडे फडताळात ठेविण्यास विसरली. ते गरम करून आत ठेविणे. पिऊ नए. पाव लिटरच्च आहे. पेपरवाल्याला पेपर टाकू नको हे सांगायला विसरली. तुम्हाला काय करायचे आहेत येवढे पेपर? बंद करणेस सांगणे. डाळ-तांदूळ मांडणीत उजव्या कोपऱ्यात तिसरा व दुसरा डबा आहे. खिचडी टाकून खावी. हाटिलात खाऊ नए. तुम्हाला बाधते. गेल्या टायमाला मी म्हाहेरी गेली असता तुम्ही हाटेलीत बिर्याणी खाल्ली होती, आठवते का? तीन दिवस लिंबू सरबतावर काढावे लागले होते, आठवा. तसेच रोज रोज पाटणकर काढा घ्यावा. तब्बेत चांगली ऱ्हाहाते.
एथे मस्त चालले आहे. रोज तूपभात खात्ये. आणखी सडायचे नसेल तर कधीही मिस कॉल द्या. एईन. तुमचीच.
 कमळा.
ता. क. : ‘तू मला मेलीस’ हे वाक्‍य विंग्रेजीत ‘यू डाइड मी!’ असे होत्ये. असो.
* * *

(२४ फेब्रुवारी २०१७)
प्रिय कमळे, काल सायंकाळी सिद्धिविनायकाला गेलो होतो. मन दुखत्ये आहे. तुला फोन ट्राय करत होतो. मोजून दहा मिस कॉल दिले. उचलला नाहीस. तब्बेत बरी आहे ना? कळव. शेवटी तुझाच. उधोजी.
ता. क. : डाळ-तांदळाचे डबे सापडले; पण त्यात डाळ नाही, नि तांदूळही नाही. तू घेऊन गेलीस का? माणसाने किती दिवस वडापावावर राहायचे? असो. तरीही 
तुझाच. 
उधोजी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com