कृपा कहां अटकी है? (ढिंग टांग)

कृपा कहां अटकी है? (ढिंग टांग)

सांगावयास अत्यंत हर्ष होतो, की आणखी एका ऐतिहासिक प्रसंगाचे आम्ही एकमेव साक्षीदार ठरलो आहो. महाराष्ट्रसेवक नंबर वन ऊर्फ प्रतिनरेंद्र ऊर्फ मुंबईकेसरी श्रीमान नानासाहेब फडणवीस ह्यांनी साक्षात प्रधानसेवक नंबर वन ऊर्फ प्रतिपरमेश्‍वर ऊर्फ भारतकेसरी श्रीमान पूज्य नमोजीबाबा ह्यांचे पवित्र दर्शन घेतले, तेव्हा (इन्शाल्ला) आम्ही तेथे जातीने हजर होतो. ही ऐतिहासिक भेट फाल्गुनातील द्वितीयेस राजधानी न्यू डेल्हीमधल्या ‘७, लोककल्याण मार्ग’ येथे सूर्य कासराभर वर आल्यावर कासराभराने झाली. कासरा मा. फडणवीसनाना ह्यांच्या हातात होता व आम्ही नेहमीप्रमाणे त्यांच्या दोन पावले पुढे चालत होतो. तर ते एक असो.

मुंबईतील महापौरपदाचे सर्वसाधारणपणाने कसे करावे? हा खरा सवाल होता. पू. नमोजीबाबा ह्यांच्या कमल दरबारात तोडगा हमखास मिळेल, असे नानासाहेबांचे मत पडले. आमचेही मत काहीसे तसेच होते. तर ते एक असो.

वाचकहो, आपणां सर्वांस हे ठाऊकच असेल, की मुंबईचा महापौर ही सध्या पत्त्यांच्या बंगल्यातील किल्वर दुर्री ठरली आहे. किल्वर दुर्री हा पत्ता तसा कंडम असला तरी तळात उजवीकडून तिसरा असल्याने तो निघाल्यास पुरा बंगला अनधिकृत इमारतीप्रमाणे कोसळतो. तद्वत काहीसे झाले आहे. तर ते एक असो.

‘‘शतप्रतिशत प्रणाम,’’ अधोवदनाने समोरील खरपुडलेल्या पायांकडे पाहात आम्ही विनम्रपणे झोंकून दिले. प्रधानसेवकाच्या पायाला किती भोवऱ्या अं? असा खजील करणारा विचार आमच्या मनात डोकावत असतानाच महाराष्ट्रसेवक फडणवीसनानांनी दुसऱ्याच चरणकमळांवर स्वत:स लोटून दिलेले आम्ही पाहिले. आमचे पाय चुकले होते, हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलेच असेल!!

‘‘सतप्रतिसत आसीर्वाद बेटा... कसा काय च्यालला हाय?’’ अस्खलित मराठीत नमोजीबाबांनी भक्‍ताची चौकशी केली.

‘‘चोक्‍कस!’’ भक्‍त म्हणाला.

‘‘शुं प्रोब्लम छे?’’ नमोजीबाबांनी वेळ न दवडता विषयाला हात घातला. 

‘‘बाबाजी, ब्यांयशी सीट जीतने के बाद हमारे दोस्त उधोजीसाहब का दिल खट्टा हो गया है. दोन वेळा भेटायला गेलो, पण दोन्ही वेळा त्यांनी तोंडावर दार हापटले!! नाक सुजले आहे... ऐसा क्‍यूं हो रहा है, स्वामी? कृपा कहां अटकी है?’’ नानासाहेबांनी गळा काढला होता. आम्ही सावरून बसलो. नमोजीबाबांच्या दरबारात असल्या तोडग्यांची कमतरता नसते. 

‘‘हं...शिर्डी गए थे? कब गए थे?’’ नमोजीबाबांनी विचारले. भक्‍त गोंधळला. त्याने डोके खाजवले.

‘‘शेगाव चालेल?’’ नानासाहेब ऊर्फ भक्‍ताची पडेल आवाजात पृच्छा.

‘‘मातोश्री गए थे? कब गए थे?’’ नमोजीबाबांनी लागोपाठ दुसरा सवाल टाकला. 

‘‘गेल्या पावसाळ्यात एकदा कोळंबी आणि पापलेट खायला म्हणून-,’’ भक्‍ताने स्मरणशक्‍तीला ताण देऊन सांगायला सुरवात केली, पण त्यांचे वाक्‍य पूर्ण होऊ शकले नाही.

‘‘तमे एक काम करो... बटाकानी सुखी साक बनावीने फ्रीज मां रखजो. पछी बीजा दिन आ साकनु बटाका वडा बनावीने ‘मातोस्री’ जावीने भोग चढावी दो! सांभळ्यो?’’ नमोजीबाबांनी तोडगा सुचवला. नानासाहेब साफ गोंधळले. गोंधळले की ते खांदे उडवतात. तसे त्यांनी तीन वेळा उडवले.

...बटाट्याची भाजी बनवून फ्रीजमध्ये ठेवावी. दुसऱ्या दिवशी त्याचे बटाटेवडे करून ‘मातोश्री’वर डबा घेऊन जावे, हा तोडगा भन्नाट होता. पण त्याने मुंबईच्या महापौरपदाचे सर्वसाधारणपणाने कसे करावे, हा प्रश्‍न कसा सुटणार? हा नवा प्रश्‍न नानासाहेबांना पडला.

वाचकहो, येथे आम्ही कामी आलो!! पूज्य नमोजीबाबांच्या अगम्य तोडग्याचा अर्थ आम्ही नानासाहेबांना एक्‍सप्लेन केला आणि ते खूश झाले. 

‘‘नानासाहेब, बटाटावडा दिला की ‘मातोश्री’ आपुलकीने विर्घळणार आणि शिळा आहे, असं सांगितलं की उचकटणार... एका वड्यात दोन कामं!! काय कळलं?’’ आम्ही म्हणालो.

‘‘द्या टाळी!’’ असे म्हणून फडणवीसनानांनी आपला घोडा अडीच घरे पुढे काढला. 

तर ते एक असो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com