पुनश्‍च हरि ॐ ? (ढिंग टांग)

पुनश्‍च हरि ॐ ? (ढिंग टांग)

‘‘बोला, बोला ना...गप्प का झालात? दातखीळ बसली? मनात असेल ते बोला, मनात नसेल तेही बोला!!,’’ गर्रकन वळोन राजे गर्जले. राजियांच्या डोळ्यांत अंगार फुलला होता. डोईचा तुरा हिंदकळला. सह्याद्री आंदोळिला. खलबतखान्यात अष्टप्रधान मंडळ बसले होते. अर्ध्या रात्री राजियांचा सांगावा आला की असाल तसे या! जेवत असाल, तर जेवून निघा! झोपला असाल, तर झोप पूर्ण झाल्यावर या! पत्ते खेळत असाल, तर डाव जिंकून या!

राजियांचा सांगावा येताक्षणी नवनिर्माणाचे शिलेदार टाकोटाक निघाले आणि गडावर पोचले. फारा दिवसांनी खलबतखान्यात मसलत रंगणार होती. सर्वांच्या मनात उत्साह शिगोशीग भरलेला. पण...

राजियांच्या गर्जनेने अवघा परिसर दुमदुमला. कृष्णकुंजगडाच्या पायथ्याशी वसलेल्या शिवाजीपार्कात हलचल जाहली. पार्कात गुटरगूं करणारी पाखरे अस्मानात उडाली. वळचणीतून बाहेर आलेल्या चुकार पाली चुकचुकत पुन्हा वळचणीत गेल्या. अस्मानात वळवाचा पाऊस घेऊन आलेले चोरटे ढग होते, तेही भराभरा पांगले. ऐन भरतीच्या समयी समुद्रास ओहोटीची ओढ लागली. 

‘‘आपल्या कार्यकर्त्यांच्या तक्रारी आहेत, राजे!,’’ किंचित खाकरत बाळाजीपंत अमात्य म्हणाले.

‘‘कसल्या तक्रारी अं...कसल्या तक्रारी?,’’ राजे खवळले. सात्विक संतापाने उसळत म्हणाले, ‘‘इथे मराठी मनसुबा देखतडोळां बुडताना दिसतो आहे! गनिम शिरजोर जाहलेला, आप्तांनी तर तैनाती फौजांचा तनखा स्वीकारलेला!! आपल्याच लोकांनी असा घरभेदीपणा केला, तर मराठी रयतेनं कुणाकडे पाहायचं? असल्या भयानक परिस्थिती कामाला लागावयाचे सोडोन, तक्रारींचे पाढे वाचता? शरम वाटली पाह्यजे!!’’

बाळाजीपंत अमात्यांनी मान खाली घातली. सरखेल नितिनाजी सरदेसायांनी बसल्या बसल्या जीन्सच्या खिशातून रुमाल काढण्याचा क्षीण यत्न केला.-सोडून दिला! (जिज्ञासूंसाठी खुलासा : बसलेल्या पोझिशनमध्ये जीन्सच्या खिशातून रुमाल काढून बघावा! अपनेआप घाम फुटतो!! असो!!) तोफखानावाले अविनाशाजी अभ्यंकरांनी तर चांगला राजापुरी पंचाच काढला!! एरव्हीही सतत आगीशी खेळ केल्याने त्यांस घामेघूम व्हावे लागते. येथे तर साक्षात वडवानलाशी गाठ!!

‘‘सवंगड्यांनो, तुमच्यास संगतीनं आम्ही महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा बेलभंडार उचलला. तुमच्याच संगतीनं मराठी माणसाच्या हितासाठी चार सामाजिक कार्ये तडीस नेली. महाराष्ट्र नावाची ही फुलबाग हमेशा फुलांनी डवरलेली असावी, भ्रमर-फुलपाखरांनी येथे गुंजारव करावा, ऐसी मनीषा. पण हे काय होवोन बसले?,’’ राजे कष्टी झाले.

‘‘असा दिल खट्टा करू नका, राजे. आपल्या शुद्ध हेतूची प्रत्यक्ष साक्ष आजही त्या नाशिकक्षेत्री उभी आहे. नाशकात-,’’ बाळाजीपंतांचे दिलाशाचे वाक्‍य पुरे होवो शकले नाही.

‘‘नाव काढू नका त्या नाशकाचं!! च्यामारी, ह्यांच्यासाठी काहीही करा, पण...पण...,’’ संतापाने थरथरणाऱ्या राजियांच्या तोंडून शब्द फुटेना. मग तो झेलावा कैसा? राजियांच्या ओठांची भेदक हालचाल झाली. पण ते शब्द तसे झेलण्यासारखे नव्हते. असो.

‘‘पायदळ हतबल, तोफखान्यात दारूगोळा नाही, घोडदळ फरार!! अशा परिस्थितीत कसे होणार महाराष्ट्राचे? ह्या रयतेचे काय करायचे? आपल्या सैन्यात नवी जान कशी फुंकावी? अरे बोला, बोला ना? गप्प का बसलात? दातखीळ बसली? मनात असेल ते बोला, मनात नसेल तेही बोला!!,’’ राजियांनी सवंगड्यांना खुले आवाहन केले. बराच काळ शांतता पसरली. सरखेल नितिनाजींनी पुन्हा एकवार जीन्सच्या खिशातील रुमाल काढण्याचा अपेशी यत्न केला. तोफखानावाले अविनाशाजींनी राजापुरी पंचा बोळा करून मानेवर फिरवला. बाळाजीपंत अमात्य मात्र किंचित खाकरून म्हणाले : ‘‘नव्याने व्यंग्यचित्र काढायला घ्या, राजे! 

पुनश्‍च हरि ॐ करू!!’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com