शेक्‍सपीअरचा वाढदिवस!  (ढिंग टांग!) 

dhing tang
dhing tang

मध्यरात्री अचानक 
दारावर टकटक झाली, 
म्हणून छातीवरले पुस्तक 
बाजूला करून उघडले, तर... 
दारात आपला तो हा 
...शेक्‍सपीअर उभा!! 

घरात शिरून किंचाळला : 
ओह, पुट ऑफ द लाइट्‌स, 
पुट ऑफ द लाइट्‌स! 
विझवा येथील प्रत्येक दिवा, 
दिव्यांच्या वाती... 
टाका ती तावदाने, 
आणि लावा तेथे काळा कागद 
जारी करा प्रकाशाच्या किरणांवर 
सक्‍त मनाई हुकूम, प्रवेशबंदीचा. 

शांतपणे म्हटले त्याला 
बार्ड, आज इकडे कुठे? 
आणि इतक्‍या अपरात्री? 
घरचे सगळे बरे आहेत ना? 
फोन का नाही केलास, वगैरे. 
तर खुर्चीत बसून त्याने 
अंगठा तोंडाशी नेऊन 
मागितले थोडके पाणी. 
घटाघटा पिऊन 
थोडा दम खाऊन 
म्हणाला शेवटी 
आजची रात्र काढतो इथंच, 
कदाचित उर्वरित दिवसही. 
पहा, हे दैवाचे कसले 
विकार विलसित, 
ज्याने फोडल्या दशदिशांत 
शब्दांच्या नळे-चंद्रज्योती, 
आणि उजळून टाकले आभाळ, 
उजेडाचे शतसूर्य आणून ठेवले 
जगताच्या क्षितीजावर, 
त्यालाच आज दडून राहावे 
लागते आहे...एखाद्या दिवाभीताप्रमाणे. 

किंचित हसून, उमजून 
म्हटले त्याला- 
बाय द वे, बार्ड, 
हॅपी बर्थ डे! 
आज तुझी जयंती ना? 
त्यावर चकित होऊन तो म्हणाला, 
पुण्यतिथीला तुमच्यात 
जयंती म्हणतात का रे? 
आज मी मेलो तो दिवस, 
तो तुम्ही जन्मदिवस म्हणता? 

म्हटले- 
ज्याअर्थी सरकारी कागदपत्रांनुसार, 
तुझा जन्म आज झाला असून 
व पुढील दोन दिवसांनी तुझा 
बाप्तिस्मा झाल्याची चर्चमध्ये 
नोंद असून, तसेच 
अवघे जग आजच तुझा 
वाढदिवस साजरा करत आहे, 
त्याअर्थी आज तुझा बर्थ डेच! 
त्यावर डाव्या तळहातावर 
उजव्या हाताची मूठ आपटत 
वकिली बाण्याने तो उद्‌गारला : 
लॉर्ड, आजच्या तारखेलाच 
दु:खद निधन झाल्याची 
सरकारी दस्तावेजातच नोंद असून 
माझ्या दफनविधीचे वर्णनही 
मध्ययुगीन बखरीत नमूद आहे. 
सबब, सदर दिन हा माझा 
मृत्यूदिनच ग्राह्य धरुन 
तद्‌नुसार ही पुण्यतिथी मानावी, 
ही मायबाप कोर्टासमोर प्रार्थना आहे... 

रात्रभर चालला वितंडवाद. 
युक्‍तिवाद. दावे-प्रतिदावे. 
ज्युलियस सीझर, हॅम्लेट, 
ऑथेल्लो, डेस्डेमोना, 
ऑफिलिया...कित्येक 
व्यक्‍तिरेखांना उभे केले 
साक्षीदाराच्या पिंजऱ्यात. 

साऱ्यांचे म्हणणे एकच पडले की, 
संशयित इसम आजवर मेलेलाच नसल्याने, 
सदर तारीख ही त्याची जयंतीच मानावी. 

गदगदून म्हटले बार्डला मग- 
दोस्ता, तुला मरण नाही... 
कारण तुला कसं मारायचं 
हेच कुणाला ठाव नाही 

हे ऐकून मात्र बार्ड 
पुतळ्यासारखा स्तब्ध झाला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com