नोबेलची मागणी! (ढिंग टांग!)

ब्रिटीश नंदी
शुक्रवार, 17 जून 2016

प्रति, 

श्री. रा. रा. देवेंद्रनाना फडणवीस, 

मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य. 

सहावा मजला, मंत्रालय 

मुंबई-1. 

(तातडीचे आणि महत्त्वाचे) 

विषय : शांतीचा नोबल प्राइज मिळावा, ह्यासाठी शिफारस करणेबाबत. 

प्रति, 

श्री. रा. रा. देवेंद्रनाना फडणवीस, 

मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य. 

सहावा मजला, मंत्रालय 

मुंबई-1. 

(तातडीचे आणि महत्त्वाचे) 

विषय : शांतीचा नोबल प्राइज मिळावा, ह्यासाठी शिफारस करणेबाबत. 

सही करनार नामे बबन बिन छगन झोंबरे-पाटील, राहनार लातुर उमर अबतक छप्पण्ण, कदकाठी 5 फू दोन इं जाहीर करितो की सदर निवेदण मी होशोहवासमध्ये नशापाणी न करिता लिहले असे. निवेदण करन्यास कारन का की मी एक साधासुधा शिंपल मानूस असून व मला नोबेल पुरस्काराची अत्यंत गरज असून व माझ्या घरात आजवर कोनालाही नोबेल पुरस्कार मिळाला नसून व माझ्या घरची परिस्थिती गरीबीची असून आमच्यावर अन्याय झाला आहे. तो अन्याय दूर करावा ही विज्ञापणा. 

नोबेल प्राइजसाठी जाम मेहनत करावी लागती व शोध लावावा लागतो, असे मला सांगन्यात आले. पन हे धाधांत व कंप्लीट खोटे आहे, हे मला नंतर कळाले. काही लोकांन्ला काहीही न करन्यासाठीही शांतीचा नोबेल प्राइज भेटतो, हे खरे आहे का? तशे अशेल तर त्या द्रीष्टीने मी ह्या बक्षिसाला एकदम पात्र आहे. 

आयुक्षात मी काहीही केलेले नाही. शांतीत जगलो. माझ्या पत्नीचे णावही सौ. शांताबाई असेच आहे. आमच्या गावातला झुंबर सायकल मार्टच्या ‘पान्या‘ जाम डोकेबाज गडी. लातुरातली पहिली गिअरवाली सायकल त्याणे तयार केली. त्याचे णाव झुंबर असले तरी त्याला पान्या बोलतात कारन त्याच्या हातात हमेशा नटबोल्ट पिळायचा पाना असतो. तो म्हनाला की ‘‘बबनभाई, आपल्याला शांतीचा नोबेल भेटायला काहीच प्राब्लेम येयाला नाय पायजे. मी डायमानोबिगर चालनारा सायकलचा दिवा सोधून काडायच्या खटपटीत आहे. जमलं तर दोघान्ला बी नोबेल एकाच लॉटमधे भेटून जाईल. ऍप्लिकेशन करून ठिवली पाह्यजे.‘‘ 

झुंबरला नोबेल भेटले नाही तरी काही हरकत नाही. डोक्‍याने चांगला असला म्हनून काय झाले? तसा स्वोभावाने महा**** आहे! भाड्याच्या सायकलीचे तासाला धा रुपये घेतो. पन पंधरा मिंटे लेट झाला तर डायरेक वीस रुपये मागतो. असा पैसा पैसा करत मरनाऱ्याला कोन नोबेल दील? 

पन आपल्याला नोबेल प्राइज भेटावे ही माझी शाळेपासून विच्छा होती. सातवीला असतानी ‘मला नोबेल प्राइज भेटले तर...‘ असा णिबंध मी लिहला होता. पन तो वाचून मोरेमास्तराने ‘हे घे नोबेल सुक्‍काळीच्या‘ असे म्हनत फोकाने बडव बडव बडवले. मोरेमास्तराने दिलेला नोबेल प्राइज घेऊन धा दिवस उभ्याने हिंडत होतो. 

साहेब, नोबेल प्राइजसाठी आपन माझी शिफारस करावीच. नोबेलबरुबर धा लाख रुपये भेटतात असेही मला कळले आहे. बक्षिसाचे धा लाख भेटले तर रोज मिनरल वॉटरनी आंघुळ करीन, असे आश्‍वासन मी देतो. आमच्या लातुरात पान्याची बोंब आहे, हे आपल्याला म्हाईत आहेच. आमच्या घरी पन पान्याचा प्रॉब्लेम आहे. पन मी ‘शांतीत जगा, मारामाऱ्या करू नका. मिरजेहून पुढची गाडी आली की आंगुळी करा!‘ असा शांतीचा संदेश आमच्या गल्लीत दिला. जोवर पाऊस पडत नाही, तोवर आपन आंगुळ करनार नाही व बाल्डीभर पान्याची बचत करु अशी झाहीर प्रतिज्ञा केली. सांगन्यास अभिमाण वाटतो की आजच्या तारखेपरेंत (पाऊस न पडल्याने) आपली प्रतिज्ञा अभंग आहे. केवढे मोठे काम आहे की नाही? समाजात मानसाने असे महोब्बतीने राहिले पाहिजे. 

लौकरात लौकर शांतीचे नोबेल देन्याची व्यवस्था करावी, ही पुन्हा एकदा रिक्‍वेष्ट करुण थांबतो. आपला नोबेलाभिलाषी बबन झोंबरे-पाटील. 

ता. क. : आपल्या राज्यात लोक बेल (जामीन) मागतात, मी नोबेल मागतो आहे, याची तरी जानीव ठेवावी! येत्या दोण महिण्यात नोबेल नाही भेटले तर मंत्रालयासमोर आमरन उपोशन करीन! सांगून ठिवतो!! बझोपा.