उडता महाराष्ट्र! (ढिंग टांग!)

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 जून 2016

र्वप्रथम आम्ही आमच्या (लाखो लाखो) वाचकांना वैधानिक इशारा देऊ इच्छितो की खालील मजकूर वाचणे आरोग्यास अपायकारक असून, त्याने क्‍यान्सरपेक्षाही भयंकर बीमारी जडू शकत्ये. यह मजकूर आपको बीमार...बहोत बीमार कर सकता है! कां की संपूर्ण मजकूर हा एका घातक, अंमली आणि जीवघेण्या पदार्थासंदर्भात लिहिलेला असल्याने तो वाचता वाचताच एखादे माणूस तुर्यावस्थेत जाण्याची शक्‍यता आहे. ह्या अंमली पदार्थाने उभ्या महाराष्ट्रातील तरुणाईस कंप्लीट मुके केले आहे. अंमली पदार्थाहून अधिक अंमली असलेला हा पदार्थ कोणता?

र्वप्रथम आम्ही आमच्या (लाखो लाखो) वाचकांना वैधानिक इशारा देऊ इच्छितो की खालील मजकूर वाचणे आरोग्यास अपायकारक असून, त्याने क्‍यान्सरपेक्षाही भयंकर बीमारी जडू शकत्ये. यह मजकूर आपको बीमार...बहोत बीमार कर सकता है! कां की संपूर्ण मजकूर हा एका घातक, अंमली आणि जीवघेण्या पदार्थासंदर्भात लिहिलेला असल्याने तो वाचता वाचताच एखादे माणूस तुर्यावस्थेत जाण्याची शक्‍यता आहे. ह्या अंमली पदार्थाने उभ्या महाराष्ट्रातील तरुणाईस कंप्लीट मुके केले आहे. अंमली पदार्थाहून अधिक अंमली असलेला हा पदार्थ कोणता? असा प्रश्‍न तुम्हाला पडला असेल, तर घ्या हे उत्तर : गाय छाप...गाय छाप...गाय छाप...गाय छाऽऽऽप...गाय छाप!! खोटे वाटते? मग घ्या रिस्क आणि वाचा पुढील मजकूर...आमचे काय जाते?

वाचकहो, आपणांस हे ठाऊक आहेच की सांप्रतकाळी पंजाब प्रांतात अंमली पदार्थांचे इतके काही पेव फुटले आहे की त्यावर ‘उडता पंजाब‘ हा चित्रपट काढण्यावांचून काही तरणोपायच उरला नव्हता. अंमली पदार्थाची तस्करी, खरेदी-विक्री एवं सेवनाला बंदी आहे, हे ठाऊक असूनदेखील पंजाबातील काही तस्करांनी ड्रग विकून पैसा केला. ‘इलेक्‍शनमध्ये आम्हाला मत दिलेत, तर हे पैसे परत मिळवून ड्रगग्रस्तांच्या ब्यांक अकौंटमध्ये टाकू,‘ असे आश्‍वासन पंजाबाचे तारणहार आणि पंजाबी तरुणाईची धडकन जे की श्रीमान राहुलजी गांधीजी ह्यांनी दिले आहे. परदेशातला काळा पैसा परत आणून पंधरा लाख जन्तेच्या खात्यात जमा करणाऱ्या नमोजींच्या जंटलमन प्रामिसपेक्षा हे प्रामिस फार्फार महत्त्वाचे आहे. कारण ते साक्षात राहुलजींनी दिले आहे. असो. 

सदर ‘उडता पंजाब‘ चित्रपटात जागजाग उडत्या शिव्या शिंपडल्या आहेत, असा रिपोर्ट आमच्याकडे आला आहे. पण आयची कटकट...आम्ही त्या दिशेने जाणार नाय! शिवी हे मायबोलीच्या गळ्यातील मंगळसूत्र असते. शिव्या नसत्या, तर भाषाच नसती! त्या दृष्टीने पंजाबी भाषा बहुत समृद्ध आहे, हे आम्हाला ठाऊक आहेच, पण आयच्या गावाऽऽऽत...मराठी माणसाला त्याचे काय कौतुक? मरो!! 

तूर्त आम्हाला महाराष्ट्राची चिंता लागून राहिलेली आहे. कां की, ‘गाय छाप‘ अंमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या महाराष्ट्राच्या तरुणाईकडे कोणाचेही अद्याप लक्ष गेलेले नाही. ते पाहा, नाक्‍या नाक्‍यावर मुकेपणाने उभे असलेले ते मराठी तरुण!! बिचाऱ्यांना धड बोलताही येत नाही. काही ‘करून दाखवण्याची‘ त्यांची ऊर्मीच जणू निघून गेली आहे. तंबाखूच्या विळख्यात अडकलेल्या ह्या तरुणांचा आवाजच जणू हरपला आहे. काही खाणे नको, पिणे नको, कुणाशी बोलणे नको!! साधे कुणी दहावी पास झाल्याचे पेढे द्यायला जावे, तर ‘नंतर नंतर‘ असे ते खुणेनेच सांगत आहेत!! इतकेच नव्हे, तर ज्या महाभागाकडे जाऊन तंबाखू मागावी, तो पानवालादेखील त्या माणूस वळखून (न बोलता) मावा मळून देतो. (आमच्या) पुण्यात तर रिक्षावाल्यास ‘शनिपाराजवळ सोड!‘ हे सांगणे गिऱ्हाईकाला जड जातेच, परंतु बिचाऱ्या रिक्षावाल्यासदेखील नुसती मान डोलावण्याखेरीज काही करता येत नाही!! माणसा-माणसातील संवादच जणू तुटला आहे. ही सरळसरळ मुस्कटदाबी आहे. अभिव्यक्‍तीस्वातंत्र्यावर गदा आहे! मुख्य म्हंजे मराठी तरुणाईला व्यसनांध नव्हे, तर व्यसनमूक करण्याचा हा शत्रूराष्ट्राचा मोठा डाव आहे. वाचकहो, हे सारे एका ‘गाय छाप‘ पोटी घडत्ये आहे...पण...पण...पण...पण... 

अवघा महाराष्ट्र ह्या जीवघेण्या विळख्यातून सोडविण्यास कोणीही हरीचा लाल पुढे येत नाही. ‘गाय छाप‘चा धंदा करणाऱ्यांना वठणीवर आणून आमच्या ब्यांक अकौंटमध्ये जनधन भरणारा दिलदार नेता सांपडत नाही. मराठी अस्मितेचे स्फुल्लिंग पेटवणारे असंख्य चित्रपट आले, पण खरा सवाल आहे तो आमच्यावर ‘उडता महाराष्ट्र‘ हा चित्रपट कोण काढील हा!! 

बोला, काढाल चित्रपट? किमान बघाल तरी? असो. 

डिस्क्‍लेमर : आम्ही आधीच वैधानिक इशारा दिला होता की नका वाचू हा मजकूर!!

Web Title: dhing tang