संघर्षयात्रा - एक बसप्रवास (ढिंग टांग)

संघर्षयात्रा - एक बसप्रवास (ढिंग टांग)

आम्हाला बस लागते. इथे लागते म्हणजे गरज पडत्ये, असे नव्हे. बोट लागावी, तशी लागत्ये. अगदी अलिबागेस जावयाचे म्हटले, तरी आम्ही आलेपाकाच्या वड्या लेंग्याच्या खिश्‍यात चवडी चवडीने ठेवतो; पण महाराष्ट्रातील रंजल्या गांजल्या शेतकऱ्यांसाठी असा बसप्रवास करणे आम्हाला भागच होते. नतद्रष्ट सरकारने शंभर भूलथापा देऊन हवी तितकी मते गोळा केली आणि आरामात मुंबईत बसले! हा सरळसरळ विश्‍वासघात आहे. इतका आरडाओरडा करूनही हे सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नसेल, तर आम्ही विरोधकांनी संघर्षयात्रा काढणे गरजेचेच होते. त्यासाठी आम्हाला बस लागली. इथे बस लागणे म्हणजे गरज पडणे असा घ्यायचा. 

सदर संघर्षयात्रा बसचे आम्ही कंडक्‍टर होतो, हे आम्ही सर्वप्रथम अभिमानाने नमूद करू. नागपूर येथून ही बस सुटली. सुटली म्हंजे अक्षरश: सुटली!! वास्तविक शेतकऱ्यांप्रमाणेच आपणही बैलगाडीने जावे, अशी कल्पना कोणीतरी लढवली होती. अखेर बसने चंद्रपूर साइडला जायचे, असे ठरले. आता ट्रॅव्हल कंपनीकडे नॉनएसी बसच नव्हती, त्याला आम्ही काय करणार? ‘या बसचा एसी काढून टाक, किमान चांगल्यातली चांगली खटारा निवडून दे,’ असे ट्रावल कंपनीच्या मालकाला आम्ही सांगून पाहिले; पण काही उपयोग झाला नाही. अखेर एसी बसमधून निघालो...

बसमध्ये दरवाज्याच्या बाजूच्या व्हीआयपी शिटांवर पू. बाबाजी चव्हाणसाहेब आणि डब्बल पू. दादाजी बारामतीकरसाहेब बसले होते. त्यांच्या पलीकडे मा. पू. अशोक्रावजी बसले होते. वास्तविक पू. दादाजींच्या बाजूची शीट आमच्यासाठी रिकामी ठेवली होती. कारण ती शीट कंडक्‍टरसाठी रिझर्व असते; पण पू. बाबाजी सवयीने पटकन त्या सिटेवर येऊन बसले. आपण आता सीएम नाही, हे बऱ्याच वेळा त्यांच्या लक्षातच येत नाही. असो. आम्ही ग्यांगवेत उभे राहिलो. 

...अडीच वर्षांनंतर दोघे बाजू बाजूला बसलेले. ‘क्‍याबिनेट मीटिंगसारखे वाटत आहे,’ असे मागल्या बाजूला बसलेल्या पतंग्राव कदमसाहेबांनी बोलूनही दाखवले. ‘‘इथून सरळ गेलं की आमचं ताडोबा! मध्यात असोलमेंध्याला चांगले माशे मिळतात! पुढे महाकालिमातेचं दर्शन घिऊ आणि यिऊ परत!!’ असे ते कोणाला तरी सांगत होते. आपण आता वनमंत्री नाही, हे त्यांच्याही बऱ्याचदा लक्षात येत नाही. बसमध्ये शांतता होती. 

‘‘बऱ्याच्च दिव्सांनी तुम्चं दर्शन झ्झालं म्हणायचं!’’ दादाजींनी आपल्या पद्धतीने बाबाजींचे स्वागत केले आणि सर्वात पहिले शांतता भंग केली. दादाजींची ही जुनीच सवय. प्राचीन काळी क्‍याबिनेट मीटिंगमध्येही... जाऊ दे. नको त्या आठवणी!!  त्यांच्या चौकशीने बाबाजी मात्र काचकन दचकले.

‘‘तुम्ही होय... मला वाटलं कोण बसलंय... हहह!!’’ आमचे बाबाजी कोल्हापूरच्या सूर्यकांत मांडऱ्यांसारखे आणि हसतातदेखील. (आठवा : एक मानूस आमच्यावर रुसलंय जणू... हहह!!) बाबाजींच्या प्रतिक्रियेने बसमधील प्रवाश्‍यांमध्ये चुळबूळ झाली.

‘‘नेमका कारेक्रम काय आहे, हे कळलं तर बरं हुईल,’’ दादाजींनी पाठीमागे वळून म्हटले. ते जे काही बोलतात, ते आपल्यालाच उद्देशून असते, अशा समजात आख्खे करिअर काढणारे ठाण्याचे बंटीराव आव्हाड उठून उभे राहिले.

‘‘कर्जबाजारी शेतकऱ्यांना भेटून त्यांना आपण आश्‍वस्त करायचं आहे. आम्ही तुमच्यासोबत आहोत, हे त्यांना सांगायचं आहे. त्यांच्याच घरी जेवायचं आहे. कोणीही कोंबडीचं जेवण मागू नये. मिळेल ते खावं असं ठरलं आहे.’’ आव्हाडसाहेब आचारसंहिता सांगू लागले.

‘‘त्याचं असं आहे, दादाजी... शेतकऱ्यांना आधार आणि आपल्याला जनाधार, अशा दुहेरी हेतूने ही संघर्षयात्रा काढण्यात येत आहे,’’ मा. अशोक्रावांनी कल्पना आणखी स्पष्ट केली.

‘‘त्याच्यासाठी इतक्‍या लांब उन्हातान्हाचं कशापायी यायला लावलं? ही कामं इतकी वर्षं बारामतीतूनच होतात की!’’ पू. दादाजींनी फटकळपणे सुनावले. ते आणखी बोलणार होते तेवढ्यात, शेजारी बसलेल्या पू. बाबाजींनी फेसबुकमध्ये डोके घातले.... आणि मग मात्र चंद्रपूरपर्यंत शांतता पसरली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com