नवा सदू, नवा दादू! (ढिंग टांग)

नवा सदू, नवा दादू! (ढिंग टांग)

सदू : (फोनमध्ये सांकेतिक भाषेत) बरं का...काव काव!
दादू : (उत्साहात प्रतिसाद देत) म्यांव म्यांव!...कोण बोल्तंय?
सदू : (कावळ्याचा आवाज रिपीट करत) काव काव..क्रॉ क्रॉ!!
दादू : (वैतागून) नाशिकचे कावळे ओरडायला लागलेत फार! छुत छुत...हडी हडी!! म्यांव म्यांव!! फिस्स्स...
सदू : (सुप्रसिद्ध खर्जात) अरे दादूराया, मी आहे, सदू!! एवढं ओळखत नाहीस? 
दादू : (सुटकेचा निःश्‍वास टाकत) तू होय!! मला वाटलं खरंच कावळे काव काव करतायत!! 
सदू : (चिडून)...कधीतरी वाघाची डरकाळी मार रे दादूराया! दरवेळी मांजराचे कसले आवाज काढतोस!!
दादू : (डोळे मिटून) मी वाघ असलो तरी तो माझा रिंगटोन आहे! तुला कळणार नाही, त्याला गनिमीकावा म्हंटात!! त्या रिंगटोननंतर वाघाची खरी डरकाळी ऐकू येते...आय मीन माझा आवाज येतो! पण तू का कावळ्याचा आवाज काढतोस?
सदू : (कपाळाला आठ्या घालत) हे काय विचारणं झालं? तो माझा रिंगटोन आहे!!
दादू : (खूश होत) तुझा काव काव, माझा म्यांव म्यांव! छान आहे!! फोन का केला होतास ते सांग आधी!!
सदू : (सडेतोडपणाने) ते ‘कमळ’वाले तुम्हाला इतकं वाईट वागवतात, तरी तुम्ही त्यांच्याशी दोस्त्या कसल्या करता? काही स्वाभिमान आहे की नाही तुम्हाला, अं?
दादू : (थंडपणाने) ते आम्हाला वाईट वागवतात की आम्ही त्यांना, हे अजून ठरायचं आहे!!
सदू : (युक्‍तिवाद करत) त्या कमळवाल्यांनी तुमच्या नाकावर टिच्चून मुंबई बदलायची भाषा केलीन!! मी असतो, तर भर नागपुरात त्यांच्या धंतोलीवर-
दादू : (दुप्पट थंडपणानं) मुंबई बदलणं म्हंजे धोतर बदलण्याइतकं सोपं नाही!!
सदू : (खर्जात भेदकपणे) तुला धोतर बदलता येतं?
दादू : (धोरणीपणाने) नाही, पण मी प्यांट फार फास्ट बदलू शकतो! सुरवार बदलणं खरं अवघड असतं!! पण ते जाऊ दे!! पण तू काय ठरवलंयस?
सदू : (झाकली मूठ घट्ट करत...) काहीही नाही! त्यात काय ठरवायचंय?
दादू : (खट्याळपणाने) सध्या तू म्हणे चित्रपट काढतो आहेस- ‘ते सध्या काय करतात?’ नावाचा!! हाहा!! म्हंजे असं गॉसिप आहे हं!!
सदू : (पुन्हा खसकेल सुरात) हुं:!! गॉसिपमध्ये मला इंटरेस्ट नाही!! (अभिमानानं) मी पुणं बदलायला घेतलंय सध्या! 
दादू : (कुतूहलानं) नाशकातली कामं संपली?
सदू : (खाकरत) एकावेळी एकच काम करतो मी!! कालपरवापर्यंत नाशिक कंप्लिट करत आणलं. आता पुणं...पुण्यात आणखी दोन-तीन वस्तुसंग्रहालयं उभी केली की झालं!!
दादू : (थिजलेल्या आवाजात) आख्खं पुणं हेच एक वस्तुसंग्रहालय आहे, असं नाही तुला वाटत?
सदू : (विषयाला हात घालत) माझं जाऊ दे! तुमच्या नाकावर टिच्चून तो नागपूरचा माणूस मुंबई हडप करायला निघालाय! आणि तुम्ही इथं म्यांव म्यांव करत बसलाय!! ह्याला काय अर्थय? काल मुंबई मुन्शिपाल्टीत तो माणूस हातात चांगला गावला होता, पण तू मात्र स्तुतिसुमनं उधळलीस!! म्हणे- तुम्ही साथीला नसता, तर मुंबईत इतकी कामं उभी राहिली नसती!! हॅ:!!
दादू : (कानात काडी घालत) त्यालाच आम्ही गनिमीकावा म्हणतो सद्या! तुला कधी कळणार हे राजकारण?
सदू : (उडवून लावत) तुमचं राजकारण तुम्हालाच लखलाभ होवो!! आम्हाला तुमचा गनिमीकावा मान्य नाही! एक घाव, दोन तुकडे हा आमचा खाक्‍या आहे!! पण जरा तरी अस्मिता सांभाळा!!
दादू : (गंभीर होत) बाबा रे! तू फोन का केला होतास, ते तरी सांग!!
सदू : (एक डेडली पॉज घेत) एक विचारायचं होतं...यंदा तरी टाळी वाजवायची का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com