विडीमास्तर! (ढिंग टांग)

विडीमास्तर! (ढिंग टांग)

मास्तर, तुम्हाला (आता)
सांगायला हरकत नाही-
आम्हीही ओढतो विडी!

ज्याला पाहून विडी टाकावी,
असं माणूस पुण्यात उरलं नाही,
असं तुम्ही म्हणाला होता,
लोकमान्य मंडालेला गेले तेव्हा...
आठवतंय?

कसं व्हायचं तुमचं, मास्तर?

विड्या ओढणं आरोग्याला किती
अपायकारक आहे, हे कळलं ना 
तुम्हाला आता?

विड्या ओढल्या नसत्या,
तर हे असले काही (बाही)
लिहिले नसते तुम्ही.
ना रंगशारदेच्या दरबारात
तुमचे पान मांडले गेले असते,
ना शब्दशारदेच्या अंगणात
तुमच्या नावाचा पार
उभा राहिला असता.

विडीच्या व्यसनापायी
किती इस्कोट झाला,
पाहिलेत ना मास्तर?

विचारांची लढाई विचारांनीच
लढायला हवी, हे आपल्याला
चाऱ्ही ठाव कबूलच आहे, मास्तर.
पण हा नियम बनवला कोणी?
समजा आम्ही 
एखाद्या अट्टल प्रतिभावंताच्या
कानाखाली सण्णकन...
कुठं बिघडलं?
दिली समजा एक ठेवणीतली
सणसणीत बुटाची लाथ
एखाद्या विचारवंताच्या
पार्श्‍वभागावर
कुठं बिघडलं?

एकानं ढाल पुढं केली, तर
दुज्याने तेगच हाणायची असते ना?
त्यानं पण ढाल हाणली तर
झांजा वाजण्यापलीकडं 
कुठं काय होतंय?

मास्तर, तुम्हालासुद्धा
काही अडलं होतं?
उगा काहीतरी आपलं
गिरबटून ठेवायचं.
मेळ्यातली गाणी-नाटकं, नि
पासरीभर पाळणे लिहिले
की झालं का?

कसली तुमची प्रतिभा?
कसली ती अभिव्यक्‍ती?
कसले ते शब्दांचे भुईनळे?

सगळे विडीचे आविष्कार!!

इतके लिहून ठेवलेत,
इतके लिहून ठेवलेत,
की आम्हाला निष्कारण
तुमचे पुतळे की हो
उभे करावे लागले.

नसती विडी, तर नसता पुतळा!

...तर नवीन व्याकरणानुसार
तुम्ही आता नाहीआत
शेक्‍सपीअर वगैरे.
विड्या ओढत काहीबाही
कागदखराबी करणारा नाटकवाला
मास्तर ह्याउप्पर तुमची
मातब्बरी उरली नाही.
गुनाह कबूल है?

पुतळ्याचं म्हणाल, तर
(विड्या ओढत) तुम्ही घडवलेलं 
मायमराठीचं शब्दशिल्प 
आम्ही कधीच फोडून तोडून 
मोकळे झालो नाही का?
पहा, मायमराठीचा तो चौथरा
आम्ही कधीच रिकामा केला आहे.

तुमच्या पुतळ्याचं काय येवढं?

मास्तर, जरा कान इकडे करा...
अहो, विडी सलामत, 
तो पुतळे पचास!!

खरं की नाही?
लावा आग!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com