करड्या रंगाची एक छटा! (ढिंग टांग)

करड्या रंगाची एक छटा! (ढिंग टांग)

दूरवर पसरलेल्या तंबूमधले
मिणमिणते दिवे आणि
अवतीभवतीचे अग्निपोत
एकटक पाहात द्रौपदीने
आवरले स्वत:चे मन...

पार्थ नुकताच परतला होता
तिच्या निवासातून.
‘‘उद्या युद्धाचा सतरावा आणि
त्या नतद्रष्ट कर्णाचा शेवटचा दिवस.
तुझ्यापाशी असलेले दुर्मिळातले
दुर्मिळ मद्य उद्यासाठी राखून
ठेव, प्रिये!’’
एवढे बोलून निघून गेला
तो धनुर्धर ताडताड पावले टाकीत.

तेव्हापासून द्रौपदीच्या मनात
कर्ण सारखा डोकावतो आहे...
तसा तो अनेकदा डोकावला आहे.
युधिष्ठिराचा चीड आणणारा
गुळमुळीतपणा निमूटपणे गिळताना.
यथेच्छ जेवल्यानंतर बलभीम 
शेजारीच प्रचंड घोरत असताना...
उद्दिपित झालेल्या पार्थाने 
घट्ट पकडलेले मनगट सोडवताना...
निष्कारण लाड करू पाहणाऱ्या
नकुलाचा सहवास सहन करताना.
‘नको’ म्हटले तर चक्‍क ‘बरं’
असे म्हणून गप्प राहणाऱ्या
आग्रहशून्य सहदेवाला स्वीकारताना.
हरेक मनस्वी क्षण अपेक्षाभंगांच्या
प्रस्फोटांनी राखेसारखा विखुरताना
तिच्या मनात कर्ण येत होताच...
तसे तिने एकदा युगंधराकडे
मन केले होते उघड.
‘‘ पाच-पाच पती असलेल्या
एखादीच्या मनात सहावा असेल,
तर त्याला व्यभिचार म्हणायचे
की निसर्ग, योगेश्‍वरा?’’ 

‘‘अंहं...त्याला नियती म्हणतात!,’’
एका मंद स्मितानिशी योगेश्‍वराने
दिले होते उत्तर.

आज मात्र तिच्या डोळ्यांपुढून 
तेजस्वी कवचकुंडलांनी
झळाळणाऱ्या राधेयाचे
रुप हटत नव्हते अजिबात.

ताठ, रुंद खांदे. विशाल पाठ.
तटतटलेल्या शिरा. निरोगी स्नायू.
निमुळत्या कटीवरले विचूकतेने 
परिधान केलेले रेशमी वस्त्र.
डोहासारखे निळेकाळे डोळे. 
शिष्टसंमत दांभिकतेने विनटलेली 
(कदाचित) लटकी विनम्रता.
सूर्यनमस्कारांनी पुष्ट वीरोचित छाती.
अशीच छाती हवी असते ना
एखादीला...डोकं टेकवायला?
असेच खांदे हवे असतात ना
एखादीला...अश्रू गाळायला?
अशीच विनम्रता घायाळ करते ना
एखादीला...एखाद्या अलवार क्षणी?
असेच डोळे हवे असतात ना
एखादीला...ज्याचा कधीही न लागावा थांग?

उत्तररात्री तारकांनी खच्च भरलेले 
तारांगण शून्यमनस्कतेने 
पाहात असतानाच
युगंधराची लागली चाहूल.
उपरणे सावरत तो म्हणाला :
द्रौपदी, ऐक...
तुझा पदोपदी अपमान करणारा
मयसभेत खदाखदा हसणारा
तुझ्या कुंकवाचा एकमेव शत्रू
उद्या नष्ट होईल, हीसुद्धा
एक नियतीच आहे...
उरेल तो फक्‍त एक 
लोभस, अजातशत्रू विकारी आभास.

तो मात्र अमर आहे...तुझ्यासारखाच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com