निर्णय! (ढिंग टांग!)

dhing tang
dhing tang

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान.
वेळ : अगदीच नाजूक.
प्रसंग : दुर्धर.
पात्रे : राजाधिराज उधोजीमहाराज आणि सकल सालंकृत सौभाग्यवती कमळाबाई.

अंत:पुरात कमळाबाई संतापाने फुणफुणत आहेत. हातात गोडाधोडाची वाटी आहे. ""आले की बघत्येच!'' असे पुटपुटत आहेत. एवढ्यात उधोजीराजे प्रवेश करतात. त्यांचा एक हात कमरेच्या तलवारीवरच आहे. सतरंजीकडे बघत सावधपणे उडी मारतात. अब आगे...
उधोजीराजे : (सतरंजीकडे आग ओकत पाहात) दरवेळी आम्ही ह्या घातपातास फसणार नाही!! दरवेळी आम्ही बेसावधपणाने इथं येतो, आणि ह्या सतरंजीत आंगठा अडकून धडपडतो! ह्यापुढे असली फसगत होणे नाही! इनफ इज इनफ!!
कमळाबाई : (नाक मुरडत) इथं कोणी निमंत्रण दिलं नव्हतं तुम्हाला!! यायचं नव्हतं आमच्या महालात!!
उधोजीराजे : (अरेरावीने) मऱ्हाटी दौलतीचे आम्ही तो मुखत्यार! आम्हांस कोण रोखतो? सवें याल तर तुम्हां सवे, आडवे याल तर तुम्हास ओलांडून आम्ही पुढे जाणारच!! आम्ही बळ दिले, म्हणोन तुम्ही बळजोर जाहलात, आम्ही मोठ्या दिलाने मंजुरी दिली, म्हणोन दौलतीचा कारभार तुमच्या हाती आला!! तुमच्यामुळे आम्ही नव्हे, आमच्यामुळे तुम्ही आहात, हे विसरो नका!!
कमळाबाई : (फणकाऱ्याने) फू:!! ऐकेल कुणी!!
उधोजीराजे : (खवळून) आता मात्र हद्‌द जाहली!! अस्तनीत साप बाळगो नका, असे आम्हांस आप्तेष्ट बजावत असताना आम्हीच सर्पाच्या बिळात जावोन बसलो!!
कमळाबाई : (चुकीची दुरुस्ती करत) अस्तनीत निखारा असतो बरं, साप नाही!!
उधोजीराजे : (दुप्पट खवळून) तेच ते!! शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेले तुम्हीच ते सर्प आणि तुम्हीच ते अस्तनीतले निखारे!! माझा शेतकरी अन्नाला मोताद झालेला असताना तुम्ही कारभाराला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या रेवड्या खाताय? लानत है, लानत!!
कमळाबाई : (वाटीभर रेवड्या पुढे करत) खा, तुम्हीही खा रेवड्या!!
उधोजीराजे : (वाटी उधळून लावत) घ्या, खाल्ल्या!!
कमळाबाई : (चिडून) आमची रेवडी खायला तुम्हाला आवडतच नाही का? इतकं होतं तर आमच्याशी गोड बोलून संधान बांधलंत कशाला? आज नाही म्हणायला पंचवीस वर्ष झाली...
उधोजीराजे : (पश्‍चात्तापदग्ध होत) पंचवीस वर्षं सडली आमची!! त्याचं काय? पण आम्ही आता चुकीची दुरुस्ती करणार आहो!! झालं तेवढं बस झालं!! तुमच्याशी नातं जोडलं म्हणून खानदानानं आम्हाला नाही नाही ते बोल लावले! तुमच्या हरेक हट्‌टाला मान तुकवली!! नमतं घेतलं!! म्हटलं- कारभाराचा अनुभव आला की सुधाराल!! पण कुत्र्याचे शेपूट...वाकुडे ते वाकुडेच!! वर्तमानपत्राच्या नळकांडीत कितीही घातले तरी ते सरळ होणार थोडेच?
कमळाबाई : (धोरणीपणानं) अस्सं? मग तुम्ही काडीमोड घेणार तर...
उधोजीराजे : (पोक्‍तपणानं) जुळवून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण परमेश्‍वराच्या इच्छेपुढे आपण कोण? कमळाबाई, यापुढे तुमचा मार्ग वेगळा, आमचा वेगळा!! गोडीगुलाबीनं एकत्र आलो, गोडीगुलाबीनं भांडलो, आता गोडीगुलाबीनंच वेगळं व्हावं, हीच काळाची गरज आहे!!
कमळाबाई : (कमरेचा चाव्यांचा जुडगा काढत देऊ करत) ठीक आहे...तुमचा निर्णय झालाच आहे तर आम्ही तरी काय बोलणार? आमचंच मेलं नशीब फुटकं! संसाराला चांगले दिवस आले म्हणून आम्ही आनंदात राहिलो, पण तुमचंच मन रमत नसेल तर आम्ही तरी काय करावं? घ्या, तुमच्या दौलतीच्या चाव्या!! तुम्हीच बघा कारभार, आणि तुम्हीच सांभाळा तुमची दौलत! आम्ही निघालो...
उधोजीराजे : (गडबडून) कुठं निघालात इतक्‍या तडकाफडकी? तेही चाव्या परत करून?
कमळाबार्ट : (पोलिटिकल आवाजात) चाव्यांची काळजी नको! आमच्याकडे डुप्लिकेट आहेत, म्हटलं! आणि मंत्रिमंडळ विस्ताराची यादी करायची आहे नं? आता आम्हालाच बघावं लागणार सारं!...पदर खोचून कामाला लागलेलं बरं! काय?
उधोजीराजे : (बुचकळ्यात पडत) आँ?
- ब्रिटिश नंदी
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com