निकालपत्र! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
शनिवार, 20 मे 2017

ह्या साऱ्या मसल्याचा आणि
इन्सानियतचा संबंध तरी काय?
मुळात इन्सानियत आणि
आमचा संबंध तरी काय?

माय लॉर्ड, सदर आरोपी
हा सीधासाधा इन्सान नसून
पराये मुल्क का खुंखार जासूस आहे,
आमच्या पाक मुल्कात शिरून
अवाममध्ये दंगाफसाद आणि
खूनखराबा घडवून आणण्याच्या
निहायत दुष्ट कामगिरीवर
तो वेषांतर करून आला...
पडोसी मुल्कात बेकायदा घुसून
तिथे बमबाजी करणे, पत्थरबाजी करणे,
तिथल्या सैन्यतळांवर हमले करणे,
तिथली सर्वसामान्य जिंदगी
हराम करणे ही जंगच आहे, माय लॉर्ड!
त्याच्यावरील सारे इल्जामात
साबित झाले असून
तमाम सबूत-औ-बयानात को
मद्दे नजर रखते हुए,
हमारी अदालत इस नतीजेपर
पहुंची है के, यह जालीम शै
सजा-ए-मौत के ही काबिल है...
आपल्या मेहरबान महाअदालतीने
आमच्या ह्या निवाड्यावर
शिक्‍कामोर्तब करावे, ही दरख्वास्त आहे...

फिर्यादी पक्षाचे आरोप आणि
साक्षीपुरावे पाहाता सदर आरोपी
गुप्तहेर आहे की नाही, हे
अजून सिद्ध झालेले नाही.
तो गुप्तहेर आहे की नाही,
हे ठरण्याआधी सर्वप्रथम
तो इन्सान आहे की नाही,
हे फिर्यादी पक्षास ठरवणे भाग असून,
तो इन्सान असल्याचे सिद्ध झाल्यास
माणुसकीचे नियम अमलात आणणे,
फिर्यादी पक्षास बंधनकारक राहील.
अंतिम निवाडा देईपर्यंत सदर आरोपी
हा इन्सानच आहे, असे गृहीत
धरण्यात येत आहे...
यासंदर्भात सदर अदालत
असे फर्मावते की,
फिर्यादी मुल्काने फिर्यादीच्या
फाशीच्या सजेचा अंमल
तूर्त स्थगित ठेवावा, तसेच
जल्द-अज-जल्द त्याच्या
महफुजीची हमी द्यावी...

माय लॉर्ड, यह तो गहजब हुआ,
ह्याला इन्साफ कसे मानणार?
ह्या मसलतीवर निवाडा देणारी
आपल्या अदालतीची अहमियत काय?
ह्या साऱ्या मसल्याचा आणि
इन्सानियतचा संबंध तरी काय?
मुळात इन्सानियत आणि
आमचा संबंध तरी काय?

Web Title: dhing tang article

टॅग्स