खान-पान! (ढिंग टांग!)

dhing tang
dhing tang

ज्येष्ठ कृष्ण पंचमी श्रीशके 1939. अत्यंत तांतडीचे आणि महत्त्वाचे. फक्‍त मोठ्या साहेबांच्या हाती पडेल, असे पाहावे. अन्य कुणाच्या हाती पडल्यास लेखक जबाबदार असणार नाही, ह्याची नोंद घ्यावी. मोठ्या साहेबांना वेळीच सावध करावे म्हणून सदर खलिता पाठवत असून अर्जंट आहे असे सांगूनच त्यांच्या हाती द्यावा.

।।श्रीचावुंडरायसुत्त प्रसन्न।।
महाराष्ट्रधर्म पाळक कमलासुर निर्दाळक शेतकरी तारणहारक सह्याद्रीव्याघ्र श्रीमद गदगद श्रीमान श्रीश्रीश्री उधोजीमहाराज यांचे चरणी बालके बहिर्जीचे लाख लाख दंडवत. साहेबकामी कळविणेत येते की...
गुन्जन करी तू भ्रमरा
जलक्रीडा करि अप्सरा
राहिले फिरत गरगरा
तव पायी जैं भवरा
चाहूल ही कानी ये सैन्यचालीची...
सदाहरित वनराई
रक्‍तवर्ण पळसाई
दारुण रण पेटलई
रदन रगड करकराल चाल दाढीची...
निसदिन तुम्हि चिंतागत
घात धरुनी गनिमागत
लागते सतत वाट
आत्मतेज तुमचे गा आणते रुची...
हेच सत्य मानुनी सोडवाच गोची...
कठीण शब्दांचे अर्थ : भ्रमर : भुंगा. रदन : दात. रगड : नोटाबंदीच्या आधीची स्टेज. निसदिन : रोज. आत्मतेज : एक प्रकारचे तेज. रुची : कोळंबीच्या तिखल्यास असते ती.
क्‍लू : वरील काव्यसंदेश गोपनीय असून वाचल्यावर त्वरित फाडून टाकावा. कवितेला चाल लावत बसू नये, तसेच सदर कवितेत दडलेला अर्थ सोडवत बसू नये. सांपडणार नाही! तथापि, हरेक ओळीच्या सुरवातीचे अक्षर वाचत गेल्यास गुप्त संदेश उलगडेल.
...आणखी काय लिहू? वर सारे काही लिहिले आहे!! आपला आज्ञाधारक. बहिर्जी. (तूर्त टोपणनाव घेतले आहे. पण सदर गुप्तहेर जेम्स बॉंडइतकाच सुप्रसिद्ध आहे. असो.)
* * *

सर्व मर्द मावळ्यांसाठी-
तांतडीचे आणि महत्त्वाचे...
आमचा खलिता मिळताच असाल तसे टांकोटाक निघोन मातोश्रीगडावर येणे. हयगय होता उपेगाचे नाही. गर्दन मारली जाईल. दौलतीचे कामी हयगय म्हंजे प्रत्यक्ष परमेश्‍वर अर्चनेची हेळसांड होय. तेव्हा जेवत असाल तर हात धुवावयास मातोश्रीवर येणे. काहीही धूत असाल, तर अर्धवट टाकोन येणे!! आमच्या नामचीन नामजाद गुप्तहेराने आम्हाला अर्जंट खबर दिली असोन "गुजरातचा सरदार निघाला आहे' असा सांगावा बेमालूमपणे धाडला आहे. ज्येष्ठ कृष्ण नवमीच्या मुहूर्तावर म्हंजेच येत्या आईतवारी सकाळच्या प्रहरी अकरा वाजता खासा खान आमच्या भेटीसाठी जातीने गडावर पधारतो आहे. त्याची बहु खातिरदारी करणे. त्यास बेसावध ठेवणे. कलानगराचे वेशीपाशी त्याचेसाठी आलिशान तंबू उभारून तो यथेच्छ सजविणे. त्यास होता होईतो खाऊ घालणे. मुदपाकखान्यास फर्मावण्यात येते की आईतवार असला तरी त्यादिशी सामिष भोजन न पकवावे. (नाहीतरी सध्या मच्छी भयंकर महाग जाहली आहेच. दीड हजाराचे पापलेट? ह्यांच्या *** ठेवलंय..असो.) ढोकळा अने फाफडा आदी गुर्जर पक्‍वान्ने पकवावीत. ह्यात कुचराई केल्यास आई शप्पत...** ***** ***!!! असो.
खानास खान म्हटले की तो मान धरतो, चवताळतो, ऐसे ऐकिले आहे. परंतु, खान एकदा कलला की कलंडायला वेळ लागत नाही, ऐसा इतिहासाचा धडा आहे. तेव्हा कोणीही त्यास खान म्हणो नये. त्यांचे अल्पोपाहारप्रसंगी "खान-पान' असेही म्हणो नये. ह्यात कुचराई केल्यास वरीलप्रमाणे कारवाई केली जाईल. जगदंब जगदंब.
विशेष सूचना : खानाची स्वारी गडापाशी येत्ये आहे, हे कळल्यापास्नं आम्ही वाघनखे शोधून राहिलो आहोत. शिंची गेली कुठे? ज्याने कोणी घेतली त्याच्या *** ** * हे बरे जाणून असा.
...माझ्या मर्द मावळ्यांनो, रात्र वैऱ्याची आहे आणि दिवस शत्रूचा. प्रत्येकाने आपले मोर्चे सांभाळावेत. बाकी येश देण्यास श्रीसह्याद्री समर्थ आहे. हर हर हर हर महादेव.
उधोजीराजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com