क्रिकेटपत्रे! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 20 जून 2017

नंतर "अरे यार, दरवाजा खोल ना' असा सचिनपाजीचा आवाज काढून कोणीतरी बोलले. मी ताबडतोब खुर्ची दाराला तटवून ठेवली आहे. डोण्ट वरी. तुम्ही बाहेर पडण्यापूर्वी इशारा करा. (सूचना : इशाऱ्यासाठी "आऊट' असे फक्‍त म्हणू नका! आपले लोक आताशा औट म्हटले की लपतात!)

सर्व संघ सहकाऱ्यांस,
चांपियन ट्रॉफीच्या कालच्या लढतीनंतर (आपण राहातो,) त्या हॉटेलच्या बाहेरील गर्दीत वाढ झाली आहे. मी बाहेर एक चक्‍कर टाकून आलो. मला (हल्ली) कोणी ओळखत नाही. ओळखले तरी ओळख देत नाहीत! नेहमीप्रमाणे विराट आणि धोनीच्या चाहत्यांची ही गर्दी असणार असे मला प्रारंभी वाटले. दोघा-चौघांनी मला हटकलेदेखील. मला अडवून एक जण घोगऱ्या आवाजात म्हणाला की ""टीम इंडिया ह्याच हॉटेलात राहाते ना?'' मी म्हटले "हो!' तर तो म्हणाला,'"विराट कू बुलाव!'' मी विचारले की ""स्वाक्षरी घ्यायची आहे का? तसे असेल तर सकाळी या!'' त्यावर तो म्हणाला, ""स्वाक्षरी घ्यायची नसून द्यायची आहे!!'' पुढे त्याने नेमकी कुठे स्वाक्षरी द्यायची आहे, त्या अवयवाचे नाव उच्चारल्यावर त्याच प्रकारच्या अवयवाला पाय लावून मी पळालो!! असो.

पुढील सूचना मिळेपर्यंत खोलीबाहेर न पडावे, हा इशारा. दरम्यान, दिल्लीला फोन लावण्याचा प्रयत्न करीत आहे. कळावे. आपला. संघशिक्षक अ. कु.
* * *
प्रिय अकुसर,
परदेशात अडकलेल्या भारतीयांना सोडवून आणण्यात हल्ली सुश्री सुषमादिदी स्वराज ह्यांचे नाव झाले आहे. भारतीय माणूस क़ुठेही अडकला की लागलीच त्या संपर्क साधून ट्विटरवर टाकतात. त्यांना कां कळवत नाही? त्या नक्‍की आपली टीम सोडवून नेतील. अफगाणिस्तानातल्या एका माणसाला त्यांनी असेच मध्यंतरी सोडवून आणले होते. पण दुर्दैवाने त्याला इंग्लंडला जायचे होते, चुकून त्याला (उचलून) भारतात आणल्याने तो रांचीच्या रस्त्यात भटकत होता. पण अशी खूप माणसे त्यांनी जोडली आहेत, असे ऐकले आहे. कळावे. आपला धोनी.
ता. क. : माझा सिनेमा बघितला का? "सचिन'पेक्षा बरा आहे, असं लोकांचं म्हणणं आहे. बघून घ्या.
* * *
प्रिय कुंबळेमास्तर,
माझ्या दारावर कोणीतरी टकटक करुन गेले. मी दार उघडले नाही. नंतर "अरे यार, दरवाजा खोल ना' असा सचिनपाजीचा आवाज काढून कोणीतरी बोलले. मी ताबडतोब खुर्ची दाराला तटवून ठेवली आहे. डोण्ट वरी. तुम्ही बाहेर पडण्यापूर्वी इशारा करा. (सूचना : इशाऱ्यासाठी "आऊट' असे फक्‍त म्हणू नका! आपले लोक आताशा औट म्हटले की लपतात!) काल रात्री आम्ही आश्‍विनच्या खोलीत रमी खेळत बसलो होतो. मला हॅंडरमी लागली. मनात म्हटले, "हेच ओव्हलवर घडलं असतं तर काय बिघडलं असतं?' झिरोत गेलो!! असो. मी पुन्हा झोपतो. तुमचा. रो. शर्मा.
* * * डिअर सर,
अत्यंत अवघड परिस्थितीत पत्र लिहीत आहे. एका छोट्याशा खोलीत अंधारात दडून बसलो आहे. खोलीत पाण्याचे दोन-तीन नळ आहेत आणि आंघोळीचीही सोय आहे!! पाणी मुबलक असल्याने दोन-चार दिवस इथे काढता येतील. पण असे किती काळ लपून राहणार? मी वेषांतर करायला तयार आहे. अनुष्काकडून एखादा बुरखा घेऊन ठेवायला हवा होता. चुकलेच! असो.
दोन शंका : 1. धोनीवर सिनेमा आला, सचिनवर आला. माझ्यावर आता सिनेमा कोण काढेल? 2. अनुष्कावर विनोद नको, हे नम्रपणे नेमके कसे सांगू? कळावे. आपला आज्ञाधारक. विराट.
* * *
डिअर कुंबळेसर,
टूथपेस्ट संपली आहे आणि मी एकट्याने 76 धावा केल्या आहेत. मला बाहेर पडता येईल का ? कळवावे. आपला. हार्दिक पंड्या.
वि. सू. : "हमें तो अपनों ने लूटा, गैरो में कहां दम था' हे मी ट्विट करुन नंतर डिलीट केले. कारण शब्द उलटसुलट झाले आहेत, असे विराटने लक्षात आणून दिले! सॉरी!!