सप्तमुक्‍तीचा सिद्धांत! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

राज्याला आणि देशाला बलशाली करण्यासाठी दुष्काळमुक्‍ती, कर्जमुक्‍ती, प्रदूषणमुक्‍ती, भ्रष्टाचारमुक्‍ती, करजंजाळमुक्‍ती, अस्वच्छतामुक्‍ती, बिल्डरमुक्‍ती अशा सात टाइपच्या मुक्‍त्या मिळवणे अत्यंत गरजेचे आहे. (बाय द वे, मुक्‍तीचे अनेकवचन काय? मुक्‍त्याच ना? विचारले पाहिजे!!

आजची तिथी : हेमलंबीनाम संवत्सरे श्रीशके 1939, श्रावण कृष्ण अष्टमी.
आजचा वार : ढाक्‍कुमाकुमवार!
आजचा सुविचार : नमोजींचा जप। करा दिनरात।
तेणे मुक्‍ती सात। भेटियेल्या।।

नमो नम: नमो नम: नमो नम: (108 वेळा जप लिहिणे.) आज झेंडावंदन!! स्वातंत्र्यदिनी, का कुणास ठाऊक, माझ्यात एक विलक्षण ऊर्जा निर्माण होते. छातीचे बंद तटातटा तुटतात. नवीकोरी नमोज्याकिटे खांद्याला अडू लागतात. नमोकुर्त्यांचे कापड आटल्यासारखे वाटू लागते. कापड आटलेला नमोकुर्ता स्वातंत्र्यदिनी फार अडचणीचा ठरू शकतो. खांद्या-बगलेशी अडणारा कुर्ता आता कुठल्याही क्षणी टरकावला जाणार, असे भय मनात घर करते. त्यात झेंडावंदन केल्यावर सलाम करावा लागतो!! आटलेल्या कुर्त्यात कोण शहाणा माणूस असले धाडस करील? पण मी केले!! त्याला कारण माझ्यात निर्माण होणारी ऊर्जा होय!! ही अनामिक ऊर्जा का निर्माण होते? आणि ती दिवसभरापुरतीच का टिकते, हे मला न उलगडणारे कोडे आहे...

...."हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे...आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे' हे जुने गीत गुणगुणतच उठलो. अंघोळ (दाढी) उरकताना आवाज जरा चढाच लागला असावा. कारण आमच्या पीएने न्हाणीघराच्या दारावर टकटक करून टावेल पुढे केला! शुचिर्भूत होऊन चहाबिहाचे काही बघावे, म्हणून "बलसागर भारत होवो, विश्‍वात शोभूनी राहो' हे बाबूजींचे अजरामर गीत गुणगुणत सैपाकघरात शिरलो. ह्या गाण्यात फार आर्त आलापी आहे. कपबशीच्या फडताळाला टेकून एक रीतसर तानही घेऊन पाहिली. जमली!! पण कुटुंब आमच्याकडे दचकून पाहू लागले. मी म्हटले, ""काय बघताय?'' त्या म्हणाल्या, ""छे, कुठे काय?'" मी एक भिवई वर चढवून (अनामिक ऊर्जा माणसाकडून काय काय चमत्कार घडवील, कुणी सांगावे?) विचारले, ""मग बघताय काय अशा?''

""बघायचं काय त्यात? ऐकतेय!!'' त्या फणकाऱ्याने म्हणाल्या. अंगात अनामिक ऊर्जा असूनही मी काही बोललो नाही. त्यांच्या हातात सांडशी होती!! मी गुणगुणणेही थांबवले. चहाबिहा पिऊन तडक बाहेर पडलो.

मंत्रालयाच्या आवारात झेंडावंदन केल्यावर मी जोरदार भाषण ठोकले. तिथे मी पहिल्यांदा सप्तमुक्‍तीचा सिद्धांत मांडला. मी म्हणालो : राज्याला आणि देशाला बलशाली करण्यासाठी दुष्काळमुक्‍ती, कर्जमुक्‍ती, प्रदूषणमुक्‍ती, भ्रष्टाचारमुक्‍ती, करजंजाळमुक्‍ती, अस्वच्छतामुक्‍ती, बिल्डरमुक्‍ती अशा सात टाइपच्या मुक्‍त्या मिळवणे अत्यंत गरजेचे आहे. (बाय द वे, मुक्‍तीचे अनेकवचन काय? मुक्‍त्याच ना? विचारले पाहिजे!!) मी हा सप्तमुक्‍तीचा सिद्धांत मांडत असताना समोरचे शासकीय अधिकारी भराभरा बोटे मोडत होते. एकेका मुक्‍तीची घोषणा मी करीत होतो आणि हे बोटे मोडत गेले. पाच मुक्‍त्यांचा हिशेब झाल्यावर उरलेल्या दोन मुक्‍त्यांसाठी दुसऱ्या हातावर ट्रान्स्फर होणे, गरजेचे पडले.

""आणखी तीन मुक्‍त्या डिक्‍लेर करा, साहेब! दोन्ही हात कामाला येतील, हिशेबाला सोपे जाईल!!,'' असे पीएने कानात सांगितले. मी म्हटले, ""नोप! सप्तसूर, सप्तपाताळ, सप्तस्वर्ग...ह्या चालीवर सप्तमुक्‍तीच योग्य!!'' ते निघून गेले. भाषण संपल्यावर टाळ्या पडल्या नाहीत. कारण सर्व उपस्थितांचे दोन्ही पंजे (पाच अधिक दोन बोटे दाखवत) वरच्या वर!! टाळ्या कशा वाजवणार? पीएंची सूचना चुकीची नव्हती तर!!

खरे सांगायचे, तर आणखी तीन मुक्‍त्यांचे काय ऍडिशन करायचे हे मला ऐनवेळी सुचले नव्हते. सात मुक्‍त्या सुचल्या हे काय कमी आहे? पण म्हटले ना, ह्या विशिष्ट दिवशी देहात अनामिक ऊर्जा भरणे ही अजब चीज आहे. विचारमग्न अवस्थेत घरी परतेपर्यंत मला उरलेल्या तीन मुक्‍त्या आठवल्याच.- कॉंग्रेसमुक्‍ती, शिवसेनामुक्‍ती आणि...आणि...अभ्यासमुक्‍ती!!

...पुढल्या झेंडावंदनाला लक्षात ठेवले पाहिजे! गोविंदा रे गोपाळा!!