टंग ऑफ स्लिप! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

द्धुअंकलच्या हॉटेलला नाव काय द्यायचं आणि त्याचं उद्‌घाटन कोणी करायचं असे दोन प्रश्‍न होते. ते म्हणाले की तुमच्याच शुभहस्ते हे काम होऊन जाऊ दे! मी म्हटलं, नो प्रॉब्लेम, आणा कात्री!! मग काय...मी फीत कापून आत गेलो. पाच रुपये भरून कुपन घेतलं. एक प्लेट इडली खाल्ली!! झालं उद्‌घाटन!!

बेटा : (नेहमीच्या भन्नाट एण्ट्रीनिशी...) ढॅणटढॅऽऽण....अम्मा, आयॅम बॅक!
मम्मामॅडम : (दचकून हातातला पेपर टाकत) काय म्हणालास? अम्मा?
बेटा : (सावरून घेत) मम्मा, म्हणायचं होतं मला! पण टंग ऑफ स्लिप झालं!!
मम्मामॅडम : (चुकीची दुरुस्ती करत) स्लिप ऑफ टंग म्हणायचं असेल तुला!!
बेटा : (वैतागून) तेच ते!! बोलताना चुकून होतं असं कधी कधी!! मागल्या वेळेला तू नाही का, मौत के सौदागर म्हणायच्याऐवजी...
मम्मामॅडम : (घाईघाईने विषय बदलत) पास्ता करू का भूक लागली असेल तर?
बेटा : (फिल्मी स्टाइलने)...नही मां, मेरा खाना हो चुका है!! हमने बंगळुरु में क्‍काना क्‍काया है!!
मम्मामॅडम : (आश्‍चर्यानं) बंगळुरुमध्ये कशाला गेला होतास?
बेटा : (विजयी मुद्रेने) तिथं मी कॅंटीनचं उद्‌घाटन केलं, मम्मा!! फर्स्ट ऑफ ए काइण्ड इन बेंगलुरु!! पांच रुपये में नाश्‍ता, दस रुपये में थाळी!! हम वो लोग हैं, जो गरीब किसान और मजदूरों की रोजीरोटी के लिए मेहनत करते है, कुछ चुने हुए चुनिंदा उद्योगपतियोंके लिए नहीं!! ये जो सूटबूट की सरकार है, उन्हे सिर्फ उन अमीरोंकी पडी है!! उन्हे बुलेट ट्रेन चाहिए, हमें पराठा चाहिए. उन्हे...
मम्मामॅडम : (मध्येच तोडत) बेटा, तामीळनाडूमध्ये ऑलरेडी अम्मा किचन आहेत! तिथं हेच सगळं पाच रुपयांत मिळतं!! तू बंगळुरुत कशाला गेला होतास?
बेटा : (खुलासा करत) त्याचं काय झालं की परवा ते सिद्धरामय्या अंकल आहेत ना त्यांचा फोन आला. त्यांना म्हटलं, अंकल बहुत दिनसे इडली नहीं खाया!! तर ते म्हणाले, अम भोत दिन से एक रुपिया में चावल बेचता गरीब कू...कुच्च जमता नै. अब्बी एक रुप्ये में कईसा पर्वडेगा? अब्बी अम ओटल क्‍कोला ऐ...आप अमारे यहां आव आऊर उद्‌घाटन करो!! मै इडली, सांबर, रैसप्लेट सोब रेड्डी रखता!! मग काय, गेलो मी तिथं!..
मम्मामॅडम : (थक्‍क होत) राइसप्लेट खायला दिल्लीहून बंगळुरात? कमालच झाली!!
बेटा : (वर्णन करत) तिथं हॉटेल उघडलं होतं. बाहेर पाटी : रैसप्लेट तय्यार है...लंज इज रेड्डी!! मी म्हटलं मला तर इडली हवी आहे, तर त्यांनी चक्‍क पाच रुपये मागितले!! तीन इडल्या आल्या!!
मम्मामॅडम : (काहीही टोटल न लागल्यागत) पण अम्मा कॅंटीन कुठून आलं तिथं?
बेटा : (समजूतदारपणाने) मैं वही आ रहा हूं, मम्मा!! सिद्धुअंकलच्या हॉटेलला नाव काय द्यायचं आणि त्याचं उद्‌घाटन कोणी करायचं असे दोन प्रश्‍न होते. ते म्हणाले की तुमच्याच शुभहस्ते हे काम होऊन जाऊ दे! मी म्हटलं, नो प्रॉब्लेम, आणा कात्री!! मग काय...मी फीत कापून आत गेलो. पाच रुपये भरून कुपन घेतलं. एक प्लेट इडली खाल्ली!! झालं उद्‌घाटन!!
मम्मामॅडम : (काकुळतीला येत) ते नावाचं विचारत होते मी...
बेटा : (किंचित वैतागून) मैं वही आ रहा हूं ना....हॉटेलचं नाव इंदिरा क्‍यांटीन ठेवावं, असं साऱ्यांचं मत पडलं! मी म्हटलं का म्हणून? व्हाय इंदिरा क्‍यांटिन?
मम्मामॅडम : (भक्‍तिभावाने हात जोडत) अरे, ते आपल्या सर्वांचं दैवत आहे!! चांगलं नाव आहे, म्हणावं!!
बेटा : (निषेधाच्या सुरात) मी म्हटलं नोप! नथिंग डुइंग! तामीळनाडूत अम्माज किचनचं मोठ्ठं जाळं आहे, तसं आपल्याला उभं करायचं आहे ना? मग त्याचं नाव वेगळं हवं! मम्माज किचन!! तुझ्या नावावर हॉटेल उघडायचं होतं मला मम्मा!!!
मम्मामॅडम : (प्रेमाने जावळ कुर्वाळत) म्हणून अम्मा क्‍यांटीन म्हणालास तू भाषणात? लोकांना वाटलं की टंग ऑफ स्लिप झाली तुझी!!
बेटा : (निरागसपणे) स्लिप ऑफ टंग म्हणायचंय का तुला, मम्मा?
Web Title: dhing tang article