मुठेचे पाणी! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

सहस्रावधी होन येथेचि गेले
मुठेलाहि येथेच घाटात नेले
अता काय तेथे म्हशींना न धुणे
ऐसेचि साहेब पुन्हा न होणे

राजांचे केस वाऱ्यावर भुरभुरत होते. नदीच्या काठाशी उभे राहून आसमंत न्याहळताना राजांच्या व्हटांवर अचानक शीळ अवतरली. "नदीकिनारी, नदीकिनारी, नदीकिनारी गंऽऽऽ...' शेजारी उपरणें सावरत उभे असलेले बापटशास्त्री चपापले. काय हे भलतेंच!

""शास्त्रीबोआ, तुम्ही पुनवडीचे कारभारी... पुण्याचा हा स्वर्ग आम्ही तुमच्या हाती सोपवतो!,'' किंचित हंसत राजे म्हणाले. शास्त्रीबोआ ओशाळले. त्यांना कोणीही कारभारी म्हटले की ते असेच ओशाळतात. नाशकाचे नॅशव्हिल करून झाल्यावर राजांनी पुण्याचे प्यारिस करावयाचे मनावर घेतले, पण राजांनी मनावर घेतले म्हणोन पुण्याचा कायापालट झाला, हे तर सत्य होते.

मुठेच्या पात्रात डोलणाऱ्या कमलिनींना हुकवत पोहत राहिलेल्या राजहंसांच्या जथ्याकडे राजे टक लावून पाहत राहिले. पूर्वी ह्या काठावर कावळ्यांना पाव घालायास माणसे येत असत. पाव! म्हात्रे पुलावरून अचूक निर्माल्य फेकणारा एक इसम तर पुढे गोळाफेकीचा वर्ल्ड चांपियन झाला!

नदीपात्रात एक बदकांची ग्यांग क्‍वॅकध्वनी करीत पोहत होती. त्यातील एक पिलू कुरूप होते. वेडेही असावे!! पण त्यांच्याकडे पाहत राजांचे देहभान हरपले.
""थेट मानससरोवरातून उडत येतात बरं! पुण्याचे पाहुणे आहेत हे राजहंस..,'' राजियांनी जनरल नालेज पुरविले. मुठेत राजहंस? उद्या शनिपारावर पाणघोडा आलाय म्हणाल!!

"" छे छे, पाहुणे कुठले? तो तीन नंबरचा राजहंस बघा, तो ह्या पुलाखाली तर जन्मलाय. अस्सल पुणेकर आहेत म्हटलें हे राजहंस... सुट्टीला मानससरोवरात जाऊन येतात!'' बापटशास्त्रींचा पुणेरी अभिमान जागा झाला. राजे काहीं बोलले नाहीत. सदऱ्याच्या खिश्‍यातून मोत्याचे कणीस काढत राजांनी ते तळहातावर हुर्ड्याप्रमाणे रगडले. मोत्याचे मोकळे दाणे (मोकळ्या मनाने) राजहंसांकडे फेकले. हे राजहंस फक्‍त मोतीच खातात लेकाचे! महाचोर जात! परवा सरदार लक्ष्मीधर चितळेंनी चरवीभर दूध पाठवलेन, तर त्यात चोच घालून ही पाखरे फक्‍त दूध तेवढी प्यायली, पाणी तस्सेच! नीरक्षीरविवेक का काय म्हंटात तो ह्या राजहंसांना फार! परंतु, त्यामुळे मुठेच्या पाण्याचे शुद्धीकरण होते. मुठेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी राजांनी खास हजारभर राजहंसांची एक पोल्ट्री (अंडी उबवणी केंद्रासह) उभी केली आहे. ते रोज मुठेचे पाणी शुद्ध करीत असतात. पुन्हा असो.

कोपऱ्यावर "बालगंधर्व एनेक्‍स-2'ची भव्य वास्तू दिसत होती. राजांचे डोळे अभिमानाने भरून आले. एक मोठे काम हातून झाले - नाट्यगृहांचे मल्टिप्लेक्‍स!! एकाच्या जागी पाच-पाच थेटरे. पुण्यनगरीत बारमाही कला महोत्सवाची सोय राजांनी करून ठेविली होती.

""इथल्या कलाकारांना आता मुंबईत धाव घ्यायला नको! नाहीतरी ऊठसूट मुंबईस पळत होते!'' राजे स्वत:शीच म्हणाले.

""कुठले? अजून कांदिवली आणि मढ आयलंड चालूच आहे!! ह्यांचा पाय पुण्यात टिकेल तर शपथ!!,'' शास्त्रीबोआंनी उपरणें झटकत उद्वेग प्रकट केला. पुण्यातल्या कलावंतांना हडपसरपेक्षा, ठाण्याचे घोडबंदर बरे वाटते, ह्याचा विषाद त्यांना गेली कैक वर्षे वाटतो आहे; पण ते एक असोच.

"" नाटके फुल्ल जातात ना?'' राजांनी प्रेमाने चौकशी केली.
""कुठली? पाचपैकी तीन ठिकाणी बारी लावलीये!'' शास्त्रीबोआंनी नाक मुरडत माहिती दिली. राजांना उत्तरात अजिबात इंटरेस नव्हता.

नाट्यगृहांचे मल्टिप्लेक्‍स. कारंजांची धूम... पाहावे तेथ हिर्वळच हिर्वळ... जागोजाग फूलबागा... त्यावर भ्रमर आणि किंगफिशर पक्ष्यांचा गुंजारव... नदीचा पदर धरून लुटुलुटु चालणारी चिमुकली पायवाट... त्यावरील चिमुकले पूल... नदीत नौकानयन... हाश्‍यविनोद करीत वल्ही मारणारे पुणेरी तरुण... वल्ही मारताना त्यांच्या तोंडून येणाऱ्या त्या शाब्दिक ठिणग्या... रस्त्यालगत टुमदार हाटेले, त्यात मिळणारी गर्मागर्म मिसळ आणि शॅंपलपाव... सारेच वातावरण गारुड करणारे!! जगदंब जगदंब!!

शास्त्रीबोआंच्या मुखातून अचानक शिळोक बाहेर पडला -

जसा सूर्य पूर्वेस तो ऊगवावा
जसा नाचरा मोर पुढोनि पहावा
सुपरहिट व्हावे, पुण्यातील गाणे
ऐसेचि साहेब पुन्हा न होणे

सहस्रावधी होन येथेचि गेले
मुठेलाहि येथेच घाटात नेले
अता काय तेथे म्हशींना न धुणे
ऐसेचि साहेब पुन्हा न होणे

Web Title: dhing tang article