आर्टिफिशियल इंटेलिजन्स! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

नॉर्वेत जाऊन लोक तिथले फियॉर्डस बघतात, नॉर्दन लाइट्‌स बघायला जातात, पण मी गरिबांसाठी गेलो! तिथल्या लोकांशी गरिबीशी दोन हात कसे करता येतील, ह्याची चर्चा केली! विचारांचं आदान-प्रदान केलं!! मी पीएम झालो की मला सोपं जाईल ना मग!!

बेटा : (भरलेल्या ब्यागेसह धडाक्‍यात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण...मम्मा आयॅम बॅक! मम्मा, आयॅम गोइंग!
मम्मामॅडम : (चरकून) क...क...कुठे? कुठे निघालास आता? आत्ता तर तू इटलीला गेला होतास ना?
बेटा : (खुलासा करत) नोप...ते गेल्या महिन्यात! आज्जीकडे गेलो होतो! तुला माहीत आहेच...(आठवणीत रमत) आहा! तसा पास्ता पुन्हा कधी खाल्ला नाही!!
मम्मामॅडम : (संशयानं) कालपरवा तर गेला होतास कुठे तरी...इंग्लंड-बिंग्लंडला!
बेटा : (मान जोराजोराने हलवत) इंग्लंडला मी त्याच्याही आधी गेलो होतो...आत्ता नाही! आणि बिंग्लंड नावाचा देश नकाशावर नाही! असता तर आपले पीएमअंकल तिथं एव्हाना जाऊन आले असते! नाही का? वेल, मी गेल्या आठवड्यात नॉर्वेला गेलो होतो!!
मम्मामॅडम : (करवादून) तेच ते!
बेटा : (शांतपणे) तेच ते नाही! नॉर्वे अमेरिकेत नाही! ते दूर आर्क्‍टिक सर्कलच्या थोडं जवळ आहे!
मम्मामॅडम : (ठसक्‍यात) ते माहितीये मला! पण ऊठसूट फॉरेनचे दौरे काढायला तू काय...कमळ पार्टीत आहेस का?
बेटा : (खिजवत) घे, घे! नाव घे ना!! तुला पीएम अंकलचं नावसुद्धा घ्यायचं नसतं!
मम्मामॅडम : (फणकाऱ्यानं) अडलंय माझं खेटर! मी कशाला ती अपवित्र नावं घेऊ? पण ते जाऊ दे. आता तू कुठंही जायचं नाहीस! इथं मला तोंड द्यावं लागतं सगळ्यांना! दर दोन-तीन महिन्यांनी तुझा सुटीचा अर्ज येतोच सहीला! असं कसं चालेल?
बेटा : (गंभीर चेहऱ्यानं) पक्षासाठी एवढं करावंच लागतं मम्मा! देखिए, यही फर्क है उनमें और हम लोगों में...वो सूटबूट की सरकार चलाते है, और हम गरीब, किसान, मजदूरोंके लिए लडते हैं!! उनका यही इरादा है, की हमारी आवाज बंद हो! लेकिन हम बोलना नही छोडेंगे!...
मम्मामॅडम : (हताश होऊन) न्यूयॉर्कपेक्षा आपलं नांदेड बरं!!
बेटा : (अत्यंत बुद्धिमान चेहरा करत) नॉर्वेत जाऊन लोक तिथले फियॉर्डस बघतात, नॉर्दन लाइट्‌स बघायला जातात, पण मी गरिबांसाठी गेलो! तिथल्या लोकांशी गरिबीशी दोन हात कसे करता येतील, ह्याची चर्चा केली! विचारांचं आदान-प्रदान केलं!! मी पीएम झालो की मला सोपं जाईल ना मग!!
मम्मामॅडम : (खचून जात) नॉर्वेकरांनी तुला भारतातली गरिबी कशी हटवावी, ह्याच्या आयडिया दिल्या?
बेटा : (हात झटकत) छे, मी त्यांना दिल्या!!
मम्मामॅडम : (सुटकेचा निःश्‍वास सोडत) मग ठीक आहे!
बेटा : (घाईघाईने) हा माझा सुटीचा अर्ज!
मम्मामॅडम : (अर्ज स्वीकारत) अमेरिकेत कशासाठी जायचंय तुला?
बेटा : (अभ्यासू मुलाच्या आविर्भावात) तिथं मी सिलिकॉन व्हॅलीत जाणाराय! सिलिकॉन व्हॅली माहितीये ना तुला? ते जगाचं सॉफ्टवेअर हब आहे!! कंप्युटरची काशी म्हणणार होतो, पण...
मम्मामॅडम : (विषय गुंडाळत) असू दे, पुढे सांग!
बेटा : (इंटेलिजण्ट सुरात)...तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हेच जगाचं भविष्य आहे! सिलिकॉन व्हॅलीत त्यावर चिक्‍कार संशोधन चालू आहे!! येत्या काही वर्षातच जगात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावरच सगळी कामं होणार आहेत. डू यू नो?
मम्मामॅडम : (कौतुकानं) माय गॉड! किती हुशार झालाय माझा बेटा!! जा, बाळा, सिलिकॉन व्हॅलीला जा, आणि शिकून ये हो आर्टिफिशियल इंटेलिजन्स!!
बेटा : (चमकून)...तुझा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय! मी तिथे शिकवायला चाललोय...ओके?
Web Title: dhing tang article