डेऱ्याचे पक्‍के चौदा! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

खरे सांगावयाचे तर आम्ही कोणाकडूनच पैका कधी उकळला नाही. हां, कुणी प्रेमाने, आपुलकीने, आग्रहाने काही दिले तर आम्ही अनमान करीत नाही. कशाला उगीच दुसऱ्याच्या भावनेचा अपमान करावयाचा? ह्या धोरणानेच आम्हाला जीवना स्थैर्य मिळवून दिले. अध्यात्माची उघड लैन स्वीकारल्यानंतर वर्षभरातच आम्ही मोटार घेतली, यात सारे काही आले!

अखिल भारतीय आखाडा परिषदेने अखिल भारतीय चौदा भोंदूबाबांची जी यादी जाहीर केली आहे, तिचा आम्ही अखिल भारतीय धिक्‍कार करीत आहो! धिक ताम, धिक ताम, धिक ताम!! ज्यांच्या निव्वळ दर्शनहेळामात्रे मुक्‍ती मिळते, शांती प्राप्त होते व तृप्तीचा भास होतो त्या महापुरुषांची अशी वाणसामानाप्रमाणे यादी करणे सर्वथैव निषेधार्ह होय. आपली सर्व आध्यात्मिक शक्‍ती तन-मन-धन अर्पून भक्‍तांसाठी, अहोरात्र झटणाऱ्या ह्या दैवी व्यक्‍तींचे असे जाहीर निर्दाळण करणे, हे निश्‍चितच कलियुग अवतरल्याचे लक्षण आहे. अर्थात प्रेषितांना नेहमीच अशा अवहेलनेस तोंड द्यावे लागते हे तर खरेच. पण आम्हांस विचाराल तर सदर यादीतील चौदा रत्ने ही वसुंधरेच्या कंठहारातील अनमोल मणीच होय. पण आज त्यांची उकिरड्यावर फेकाफेक होत्ये आहे. अहह!!

सदर चौदा रत्नांची यादी आखाड्यांनी जाहीर केल्या केल्या अमेरिकेत "इरमा' नावाचे भयंकर वादळ आले. पंचमहाभूते भडकल्याचे हे ताजे उदाहरण आहे. मागल्या खेपेला एका अद्वितीय साधूस नको नको त्या आरोपाखाली जेलखान्यात डांबल्यामुळे दुष्काळ आला होता, हेही आपल्याला आठवत असेलच. असो.
गुहेत राहून, भस्मे फासून कोणीही अध्यात्म साधू शकेल. गुहेत दुसरा कोठलाही टैमपासच नसतो. आपले एका पायावर उभे राहावे, ध्यानअर्चना करावी. कंटाळा आल्यास पाय तेवढा बदलावा!! पण जनलोकात राहून सामान्यांस परातत्त्वाचा स्पर्श करण्याची संधी देणे, हे खरे दुर्लभ असे कार्य आहे. आम्ही थोडे "त्यातले' आहो. म्हंजे लहानपणापासूनच आम्हास अध्यात्माचा ओढा होता. एकदा आम्ही हातात काहीही नसताना मुखातून व नांकातून धूर काढून दाखविला होता. तो पाहून विनम्र व्हावयाचे सोडून आमच्या तीर्थरुपांनी आमच्या खिश्‍यातील विडीचे बंडल तपासले. (व ते सांपडल्यामुळे) पुढील पंधरा दिवस विडी ओढणे मुश्‍किल व्हावे, अशी मुखाची अवस्था करून ठेविली. त्याच कोवळ्या वयात आम्ही फडताळात बसून विश्‍वाची चिंता करीत असू. नंतर आमच्यासोबत फडताळात चिंता करण्यास आम्ही आमचे शेजारील कु. चिंगी ईस शिकविले. पण येथेही पाखंडी जगाचा कडवट अनुभव आला. अध्यात्माची बिलकुल चाड नसलेल्या कु. चिंगी ईच्या बापसाने आम्हांला त्याच फडताळात कोंबून बुकलून बुकलून मारले. सदर इसम नरकात जाणार, अशी भविष्यवाणी आम्ही तेव्हाच केली होती. असो.

चमत्काराशिवाय जनलोक नमस्कार करीत नाहीत. वाढत्या वयानिशी आम्ही नानाविध चमत्कार करून दाखविले. हाटेलीत जाऊन इडलीसांभार खाऊन हलकेच सटकणे, समोरील व्यक्‍तीच्या खिश्‍यातील पन्नासाची नोट वळखून ती आपल्या खिश्‍यात येईल, असे पाहाणे, वेळेवर प्रकट होऊन फुकट जेवणाच्या पानावर बसणे, उधारी बाकी असूनही बोल बोल म्हणता पुरभय्याकडून हवे तसे पान बांधून घेणे, आदी किर्कोळ चमत्कार आम्ही डेली बेसिसवर करीत असू.

पुढील काळात आम्ही चेहरे पाहून भविष्य सांगण्याची विद्या अवगत केली. भविष्य सांगण्याचे पैसे घेणे आम्ही गैर समजतो. आम्ही आजवर कधीही ह्या कामासाठी दक्षिणा घेतलेली नाही. खरे सांगावयाचे तर आम्ही कोणाकडूनच पैका कधी उकळला नाही. हां, कुणी प्रेमाने, आपुलकीने, आग्रहाने काही दिले तर आम्ही अनमान करीत नाही. कशाला उगीच दुसऱ्याच्या भावनेचा अपमान करावयाचा? ह्या धोरणानेच आम्हाला जीवना स्थैर्य मिळवून दिले. अध्यात्माची उघड लैन स्वीकारल्यानंतर वर्षभरातच आम्ही मोटार घेतली, यात सारे काही आले! तथापि, आम्हाला आमचा बाप अखेर भेटला. त्याचे असे झाले की-

लोकांचे मनातले अचूक ओळखून, एकाही दमडीची अपेक्षा न बाळगता, एकही दिवसाची सुटी न घेता, अहर्निश लोकांसाठी राबून, मानव कल्याणासाठी सप्तसागरांना वारंवार ओलांडून, समस्त जगास स्वच्छतेचा उपदेश देणाऱ्या एका थोर बुवांमुळे आम्हास अच्छे दिन येणार असल्याचा दृष्टांत झाला. त्यांना शतशत नमन!

पंधरावे रत्न आम्ही की ते? हे आता आम्हांस आध्यात्मिक कोडे पडले आहे. सुटेल, सुटेल!