देशप्रेमी! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

सांगावयाचा मुद्दा एवढाच, की आम्ही कमालीचे कडवट आणि धगधगीत असे राष्ट्रप्रेमी आहो. फार्फार पूर्वीपासून आम्ही समोर येणाऱ्या व्यक्‍तीचे स्वागत "जय महाराष्ट्र' ह्या घोषणेने करीत असू. परंतु तीन वर्षांपूर्वीपासून आम्ही लैन बदलून "वंदे मातरम' म्हणू लागलो आहो

तसे पाहू गेल्यास आम्ही अत्यंत ज्वलज्जहाल टाइपचे देशप्रेमी आहो. मातृभूमी म्हटले की आमच्या देहावर रोमांच उभे राहतात. टाचा आपोआप जुळून उजवा हात (उजवा हं!) ऑटोम्याटिकली सलामाची पोझिशन घेतो. मुखातून "वंदे मातरम' अशी आरोळी उत्स्फूर्तपणे बाहेर पडते. त्या डर्काळीने सरहद्दीवर दडून बसलेला शत्रूदेखील (किरंगळी दाखवून) टाइमप्लीज घेईल. आमचे ह्या भूमीवर नितांत प्रेम आहे. ह्या भूमीची अवहेलना करणाऱ्याची आम्ही गय करणे अशक्‍यच. (ऐन वेळी सहा केळी खाऊनही) केवळ वजन कमी पडल्याने आम्ही देशाच्या लष्करात भर्ती होऊ शकलो नाही. देश एका भयंकर शूर शिपायाला मुकला. अन्यथा, आज सरहद्दीवर त्याने भारतीय लष्करासाठी सवलतीच्या दरात बिर्याणीचे स्टॉल टाकले असते! कराचीचे फेमस पान बांधून आणून दिले असते. असो.

आमच्या अंगातच शूर देशप्रेमी रक्‍त दौडते. आमच्या चाळीतील कित्येक कुटुंबे केवळ आमच्यामुळे निर्धास्तपणे घोरतात. मध्यंतरी आमच्या चाळीमध्ये फार भुरट्या चोऱ्या होत असत. त्या काळी रात्रीचे सुमारास गस्त घालण्याचा संकल्प आम्ही सोडला व हाती दांडके घेऊन चाळीच्या कानाकोपऱ्यात दैत्यासारखे हिंडू लागलो. रात्री अपरात्री कोणीही आला की आम्ही त्यास दांडके रोखून विचारीत असू : ""शत्रू की मित्र?'' "मित्र' असे उत्तर आले की मगच आमचे दांडके खाली होत असे. अन्यथा, समोरच्याचे टाळके सडकणे हा आमचा धर्मच होता. एकदा देशद्रोही गजू चाळके (बारा नंबरची खोली) क्‍लबातील तीन पत्तीचा डाव संपवून अपरात्री घरी येत असताना आमच्या तावडीत सांपडला. त्याने आम्हास पाहून ""काय रे ***...उद्योग नाही का दुसरा?'' एवंगुणविशिष्ट वाक्‍ताडने केली. आम्ही त्यास ठेवणीतील प्रश्‍न विचारला. : ""शत्रू की मित्र?'' त्याने कंबरेवर हात ठेवून "शत्रू' असे उत्तर दिले. तो मस्करी करत होता, हे उघड होते. परिणामी, आम्ही संयम राखून त्यास "मग हरकत नाही...जा' असे सांगितले. आम्ही गस्ती बंद केल्यानंतर चोऱ्या थांबल्याची अफवा त्यानेच उठवली होती. पण ते जाऊ दे.

चित्रपटगृहात राष्ट्रगीत लागते, हे आम्हांस फार उशिरा कळले. कां की आम्ही कायम उशिरा अंधारात धडपडत आमची शीट गाठीत असू. तोवर राष्ट्रगीत होऊन जात असे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रारंभीच्या काळात रांगेत बसलेल्यांच्या शिव्याशाप खाणे, हाच अनिवार्य कार्यक्रम आम्हास वाटत असे. तथापि, एकदा टायमिंग चुकून आम्ही प्रारंभालाच गेलो. तेथे एका गृहस्थास आम्ही राष्ट्रगीतास उभे राहण्यास फर्माविले. तर तो म्हणाला ""मी उभाच आहे की!!'' योगायोग असा की तो गृहस्थ म्हंजे दुसरे तिसरे कोणीही नसून देशद्रोही गजू चाळकेच होता. पण तेही एक असो.
मध्यंतरी गोरक्षणाचे व्रत आम्ही हाती घेतले होते. तेव्हा आमच्या चाळीतील एकाच्या (काळ्या) पिशवीत मटणाचा अभक्ष्य प्रकार असल्याचा आम्हांस संशय आला. आम्ही दांडके हापटून त्यास हटकले : ""ह्यात काय आहे?'' तो गृहस्थ काहीतरी संशयास्पद पुटपुटला. आम्ही पिशवीत डोकावलो तर त्यात मटार होते. योगायोगाचा भाग असा की हे गृहस्थ म्हंजे दुसरे तिसरे कोणीही नसून देशद्रोही गजू चाळकेच होता. पुन्हा जाऊ दे.

सांगावयाचा मुद्दा एवढाच, की आम्ही कमालीचे कडवट आणि धगधगीत असे राष्ट्रप्रेमी आहो. फार्फार पूर्वीपासून आम्ही समोर येणाऱ्या व्यक्‍तीचे स्वागत "जय महाराष्ट्र' ह्या घोषणेने करीत असू. परंतु तीन वर्षांपूर्वीपासून आम्ही लैन बदलून "वंदे मातरम' म्हणू लागलो आहो. एवढ धडधडीत जाज्वल्य देशप्रेम आमच्या अंगी असताना हल्ली उजळ माथ्याने "वंदे मातरम' म्हणणे अवघड झाले आहे. अहह! कालचीच गोष्ट...

देशद्रोही गजू चाळके समोरून टिंगत चालत असताना आम्ही शिरस्त्याने त्यास "वंदे मातरम' म्हटले. तर आमची यथेच्छ हेटाळणी करून तो म्हणाला :

""हॅ:...पचापच तंबाकूच्या पिचकाऱ्या टाकतोस, "वंदे मातरम' म्हणण्याचा तुला अधिकार काय?''

ऑटॉ ह्यॉवर कॉय बोब्वणार?

Web Title: dhing tang article