घरवापसी..! (ढिंग टांग!)

dhing tang
dhing tang
कोणे एकेकाळी वाचलेली ही गोष्ट
मोडीलिपी असल्याने कळत नाही स्पष्ट
एवढं कळतं कुणी एक मोठा राजा होता
सुवर्णाच्या महालात छान रमला होता...

कांचनाच्या भिंती, तिथे रत्नांची दारे
खिडक्‍याच्या वेलबुट्टीत जडवलेले हिरे
महाद्वारी झुलत होते रोज बारा हत्ती
ताजे लोणी जाळत होते रात्री दिवाबत्ती

राजहंसांच्या पिसांचे डोईला उसें
रेशमाच्या रुजाम्यात आख्खे पाऊल धसें
मऊ मुलायम मंचकावर येई राजनिद्रा
मलमलीच्या धाग्यांचा झुळझुळीत सद्रा

वैभवात रमलेला राजा मात्र उदास
भरल्या पोटी महाराजांचं बिनसलं खास
उदास राजा रोज रात्री टक्‍क जागा राही
सुखासुखी राजाला मुळी झोपच येत नाही

वैद्य झाले, हकीम झाले, चिनी दवा झाला
औषधानेच राजा तेव्हा बेजार होऊन गेला
खंगणाऱ्या राजापायी प्रजा गेली गांगरुन
""काय झालं राजाला?- दृष्ट लागली म्हणून?''

गंडेदोरे म्हणू नका, अंगारे नि धुपारे
राजाच्या प्रकृतीसाठी यज्ञयाग करा रे
बोलवा बरे सत्वर आता मांत्रिकाला कोणा,
राजावरती कोणी केला असला जादूटोणा?

तेवढ्यात एक साधू आला महालाच्या दारी
म्हणे, "मीच करीन दूर राजाची बिमारी'
राजाच्या कानामध्ये पुटपुटला मग साधू
""जन्मगावी एकदा तरी जाऊन ये बघू!''

राजा बोले दळ हाले ऐसे ऐसे झाले
राजासंगे सैन्य त्याचे दरमजल निघाले
दूरदेशीचे दूर गाव दिल्लीपासून दूर
गुर्जरभूमीतल्या कुग्रामात सुकाळाचा पूर

जन्मगावीची भाबडी रयत किती खुश झाली
रस्ते धुतले, दिवे लावले, जणू दिवाळी आली!
नवे कपडे, गुढ्या-तोरणे, अंगणात पडले सडे
राजाच्या स्वागताला सजले वाडेहुडे

आला आला, राजा आला, वेशीवरती चला
भाकरतुकडा ओवाळून आत घ्या त्याला!
सनई-चौघडे, ढोल-नगारे, वाजवा रे वाजवा,
संबळ झडू द्या जरा लेको, होऊ दे की हवा!

गाव बघून हरखला की आजारलेला राजा
जुनं घर बघून आपलं हसला की राजा
जुने दिवस आठवून आठवून लाजला की राजा
कपाळाला माती लावून रडला की राजा

"ये धरती मेरी मॉं है' असे म्हणाले स्वामी
गळ्यामधला गहिवर दाबून राजा रडला नामी
माती लावताच कपाळाला झाला चमत्कार
दुर्मुखलेल्या राजाचा पळालाच की आजार!

""मी बरा झालो मित्रों, पुन्हा करीन कल्याण
धरती नमवीन आणि घालीन समुद्राला पालाण
रयतेच्या सुखासाठीच आहे माझा देह
अग्निपरीक्षा देईन कधीही- झाला जरी दाह!

इथे आम्ही खाल्ल्या कैऱ्या, तिथे प्यालो चहा
बैदुलांचे खेळ रंगले ते हे अंगण पहा!
सवंगड्यांच्या संगे येथे मांडले होते डाव
कुग्रामाला आज अचानक सोनियाचा भाव!''

गावभर हिंडत होता राजा दिवसभर
गल्लीबोळे पहात होता राजा डोळाभर
तंबाकू मळत एक म्हातारा तेव्हाच नेमकं बोलला
बोलू नये ते बोलला, म्हातारा, बोलू नये ते बोलला!

म्हाताऱ्याने चंची उघडून तळहाती घेतला चुना
चिमटीभर तंबाकूचा बार मळला पुन्हा
""हिकडून काईच नेलं न्हाई, ते एक ब्येस झालं,
पन दिल्लीवरून कशापायी ह्ये नाटक घेऊन आलं?''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com