शुक शुक...आवाज कुणाचा? (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

मेट्रोच्या भुयारात गेलो होतो, तेव्हा घातलं होतं! पालिकेचा एक अधिकारी आला आणि म्हणाला, ""साहेब, हे शिरस्त्राण घातल्याशिवाय बोगद्यात जाऊ नका! कुठून डोक्‍यात काय पडेल ते सांगता येत नाही!!

स्थळ : मातोश्री, वांद्रे संस्थान.
वेळ : रात्रीची.
प्रसंग : दिवाळीपूर्वीचा.
पात्रे : दिवाळीपूर्वीचीच.

विक्रमादित्य : (धाडकन बेडरुमध्ये घुसत) बॅब्स...मे आय कम इन?
उधोजीसाहेब : (धाडकन पांघरुणात घुसत) नोप!..
विक्रमादित्य : (कुरकुरत) मला काहीतरी इंपॉर्टंट विचारायचंय!
उधोजीसाहेब : (पांघरुणातून) सगळे माझ्याशी इंपॉर्टंटच बोलतात, आणि मीही जे बोलतो ते इंपॉर्टंटच असतं! आत्ताही मी तुला "झोपायला जा' असं सांगतोय, म्हंजे तेही इंपॉर्टंटटच आहे! ओके? गुड नाइट!
विक्रमादित्य : (दरवाजाच्या चौकटीवर दोन्ही हात ठेवत) उद्या तुम्ही माझ्याबरोबर भेंडीबाजारात याल?
उधोजीसाहेब : (दचकून डोक्‍यावरून पांघरुण काढत) भेंडीबाजारात? बाप रे!!
विक्रमादित्य : (डोळे मिटून) अत्यंत इंपॉर्टंट काम आहे! आपल्या पक्षाचंच आहे! सो, याल ना?
उधोजीसाहेब : (घाईघाईने) हे बघ, उद्याचं उद्या! आज मी खूप दमलोय! इतकी पायपीट तर मी ताडोबाच्या जंगलातसुद्धा केली नव्हती!!
विक्रमादित्य : (हात उडवत) हॅ:...ताडोबाच्या जंगलात आपण बंद जीपमधून तर फिरलो!! मी होतो ना!! तुम्ही खिडकीतून क्‍यामेरा काढून वाघावर रोखलात, तेव्हा त्याने जीभ काढून दाखवली होती!! आठवतंय ना?
उधोजीसाहेब : (शिताफीने विषय बदलत) म...म...मेट्रोची कामं बघून आलोय मी आज! किती खोदून ठेवलंय माहितीये?
विक्रमादित्य : (उजळलेल्या चेहऱ्यानं) काय खोदतायत तिथे?
उधोजीसाहेब : (उठून बसत) मेट्रो रेल्वे प्रकल्प तुला माहीत नाही? भुयारातून रेल्वे जाते ती...लंडनसारखी!!
विक्रमादित्य : (कमरेवर हात ठेवून) हां, हां! आय नो, आय नो! पण त्याच्यासाठी एवढं खोदकाम करण्याची काय गरज आहे?
उधोजीसाहेब : (संयमाने) तू झोपायला जा बरं!!
विक्रमादित्य : (हरखून पाहात) बॅब्स..!
उधोजीसाहेब : (कंटाळून) आता काऽऽऽय?
विक्रमादित्य : (खोखो हसत) तुम्ही हेल्मेट घालून का झोपलाय?
उधोजीसाहेब : (ओशाळून हेल्मेट काढत) मेट्रोच्या भुयारात गेलो होतो, तेव्हा घातलं होतं! पालिकेचा एक अधिकारी आला आणि म्हणाला, ""साहेब, हे शिरस्त्राण घातल्याशिवाय बोगद्यात जाऊ नका! कुठून डोक्‍यात काय पडेल ते सांगता येत नाही!!'' मी म्हटलं, ""हुड, मला काय गरज हेल्मेटची?'' पण...
विक्रमादित्य : (उत्सुकतेनं) काढून ठेवायचं विसरलात ना?
उधोजीसाहेब : (चुळबुळत) तसं नाही...पण स्वप्नात काही पडलं डोक्‍यात, तर काय घ्या! सुरक्षितततेचा उपाय म्हणून हेल्मेट घालूनच झोपलेलं बरं!
विक्रमादित्य : (चौकशी करत) मेट्रोचं काम बरं चाललंय ना पण?
उधोजीसाहेब : (नकारार्थी मान हलवत) मी समाधानी नाही...कारशेडचा प्रश्‍न अजूनही मार्गी लागलेला नाही! (भानावर येत) पण मी तुला का सांगतोय हे? तू जा बरं झोपायला!!
विक्रमादित्य : (मुद्द्यावर येत) एका अटीवर जातो....उद्या माझ्याबरोबर भेंडीबाजारात येईन, असं प्रॉमिस करा!!
उधोजीसाहेब : (करवादून) काय आहे भेंडीबाजारात?
विक्रमादित्य : (गालात जीभ फिरवत) आहे आमची एक गंमत!!
उधोजीसाहेब : (पुन्हा पांघरुणात शिरण्याच्या इराद्यात) कसली डोंबलाची तुझी गंमत!! इथे त्या मेट्रोच्या खोदाईकामाच्या आवाजाने कान किटले आहेत! डोकं भणभणतंय! झोपू दे की मला!!
विक्रमादित्य : (छाती काढून) मला फटाके आणायचेत!! भेंडीबाजारात चांगले मिळतात!!
उधोजीसाहेब : (खवळून) फटाके? फ-टा-के?...फटाक्‍यांवर बंदी आहे हे माहीत नाही का तुला? फटाक्‍यांनी प्रदूषण होतं! कान किटतात!! यंदाची दिवाळी शांत दिवाळी आहे...कळलं? आता पंचांग फाडा, सगळेच सणवार बंद करा! दिवाळी-बिवाळी कुछ नहीं! उद्या हे चकली नि चिवड्यावर बंदी आणतील!! कठीण आहे!!
विक्रमादित्य : (आयडिया सुचवत) आपण या फटाकेबंदीचा निषेध म्हणूनच फटाके आणू या!!
उधोजीसाहेब : (खोल आवाजात) आणले असते रे! पण नकोच!!...मला त्या सुतळी बॉम्बचा फार त्रास होतो! जा आता...जय महाराष्ट्र.

Web Title: dhing tang article