पाडवा पहाट! (ढिंग टांग!)

dhing tang
dhing tang
स्थळ : अंत:पुर, मातोश्री महाल, वांद्रे संस्थान.
वेळ : अंत:पुर सांगितले ना?
काळ : आतुर!
प्रसंग : दिवाळी पाडवा!
पात्रे : इश्‍श..!

नखशिखांत अलंकारांनी मढलेल्या सौभाग्यवती कमळाबाई गवाक्षात उभ्या आहेत. कुणाची तरी वाट पाहात आहेत. तेवढ्यात उधोजी महाराजांची स्वारी घाईघाईने येते. सतरंजीवर जपून पाऊल टाकते. हुश्‍श करते. अब आगे...
उधोजीराजे : (सुस्कारा सोडत) ह्या निमकहराम जाजमात आमचा हमखास पायींचा अंगठा अडकतो आणि आम्ही अडखळतो. आज प्रसंगावधान राखोन आम्ही जपून पाऊल टाकून कटवाल्यांचा मनोदय धुळीस मिळवला!! (अचानक लक्ष जाऊन)...आम्ही तुमच्याशी बोलत आहोत कमळाबाई! ह्या महालाच्या भिंतींशी नव्हे!!हहह!!
कमळाबाई : (गवाक्षाकडे निश्‍चलपणे पाहात) हं!
उधोजीराजे : (पडेल धोरण स्वीकारत) आम्ही खास निमित्ताने आलो आहोत म्हटलं!! हहह!!
कमळाबाई : (निश्‍चलपणे) हं!
उधोजीराजे : (हळुवारपणे) हॅप्पी दिवाळी पाडवा!! आज आपला दोघांचाच सण आहे म्हटलं!! हहह!!
कमळाबाई : (निर्विकारपणे) हं!
उधोजीराजे : (समजूत काढत) एक माणूस रागावलंय वाटतं आमच्यावर! हहह!!!
कमळाबाई : (संतापून वेडावत) हहह!! कित्ती वेळा सांगितलं, मेलं ते जुन्या मराठी नटासारखं खोटं खोटं हसू नका म्हणून! पण आमचं मेलं ऐकतंय कोण? आधीच आमची परिस्थिती ही अशी करुण! आपलं माणूस आपलं म्हणत नाही, नि दुसरं माणूस हिंग लावून विचारत नाही!!
उधोजीराजे : (दिलासा देत) आम्ही आहोत ना... अजून तरी!!
कमळाबाई : (नाक फेंदारून) तुमचा मेला काय भरवसा? आज आहात, उद्या नाही?? आज तरी आहात की नाही कुणास ठाऊक!
उधोजीराजे : (अजीजीनं) अहो, दिवाळी पाडव्याला तरी नको आपल्यात भांडण! नाही म्हटलं तरी पंचवीस वर्षांची साथसोबत आपली!! जनलोक काय म्हणतील?
कमळाबाई : (हुंदका आवरत) आमच्याशी गनिमासारखं वागताना कुठे जाते ही आठवण? अं?
उधोजीराजे : (सबुरीचा सल्ला देत) बाप रे!! भलतीच बिघडलेली दिसतेय मनःस्थिती!! अहो, राजकारणात दोन दिले, दोन घेतले, हे चालतंच! एवढं काय मनाला लावून घ्यायचं?
कमळाबाई : (हिणवून) दोन दिले, दोन घेतले हे ठीक आहे! पण एकदम अर्धा डझन घेणं बरं का? तुम्ही हे असे वागता? आणि तिथे नांदेडात तर...(स्फुंदून स्फुंदून रडू लागतात.) तीन वर्ष झपाटून काम करून आम्ही इतका मोठा पल्ला मारला! भारतभर आमचं नाव दुमदुमतंय! पण स्वत:च्या महाराष्ट्रात मात्र...
उधोजीराजे : (सहजच गुणगुणत) असुनि खास मालक घरचा... म्हणती चोर त्याला... परवशतां पाश दैवे ज्याच्या गळां लागला...
कमळाबाई : (नाक मुरडत) कळतात बरं हे टोमणे! छे बाई, आज आमचा काही मूड चांगला नाही! तुम्ही आपल्या महालीं जा कसे!!
उधोजीराजे : (मिश्‍किलपणे) वा रे व्वा! असे कसे जाऊ? आणि आमच्या हातातली भेटवस्तू पाहून एका माणसाची कळी खुलेल म्हटलं!!
कमळाबाई : (नकारात्मक पवित्र्यात) हुं:!!
उधोजीराजे : (हातातला खोका पुढे करत) घ्या, राणीसाहेब! हा खास आमचा मराठमोळा फराळ आणि... ही खास आपल्यासाठी येवल्याची पैठणी!!
कमळाबाई : (पाठमोऱ्या अवस्थेतच) ठेवा तिथं मेजावर...!
उधोजीराजे : (चमकून) आम्ही पाडव्याची भेट म्हणून तुमच्यासाठी महागातली पैठणी घेऊन आलो! पैठणीवर हल्ली "जीएसटी' किती बसतो माहीत आहे का तुम्हाला? आम्ही तुमच्यासाठी येवढं करतो तरीही... तरीही तुमचं समाधान नाही? फराळ तरी घ्या..!!
कमळाबाई : (पदरानं डोळे पुसत) जोवर आम्हाला आमच्या निर्भेळ विजयाची खातरी होत नाही, आम्हाला काही फराळ गोड लागणार नाही!! पैठणीही नकोच आम्हाला!!
उधोजीराजे : (खजील आवाजात) अहो, निर्भेळ विजयाची खात्री इथं आता उरलीये कोणाला? त्या कांग्रेसवाल्यांनाही नाही, आम्हालाही नाही नि आता तुम्हालाही नाही!! मग चिंता कशाला? घ्या, उचला ती पैठणी आणि म्हणा, हॅप्पी पाडवा!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com