घरवापसी-रिलोडेड! (अर्थात सदू आणि दादू...) (ढिंग टांग!)

dhing tang
dhing tang
सदू : (फोनमध्ये) म्यांव म्यांव!
दादू : (गोंधळून) कोण चावटपणा करतोय? महागात पडेल!!
सदू : (आवाज बदलून) साहेब मी किनई नुकताच आपल्या पक्षात आलोय!!
दादू : (सावध होत) कुठून बोलताय आपण?
सदू : (हसू आवरत) हितून बांदऱ्यातूनच बोलतोय साहेब!
दादू : (आणखी चौकश्‍या करत) कुठून आलात?
सदू : (एक पॉज घेत) शिवाजी पार्कावरून!
दादू : (भुवई उंचावत) तरीच...मांजराचे आवाज काढताय!! इथं वाघाच्या डरकाळ्या हव्यात, वाघाच्या डरकाळ्या!!
सदू : (बदललेल्या आवाजातच) जुनी सवय जात नाय हो साहेब! सॉरी!!
दादू : (ठणकावून) आणि हे बघा...आमच्या पक्षात मावळ्यांनी डायरेक्‍ट आम्हाला फोन करायचा नसतो, हे कोणी सांगितलं नाही का तुम्हाला? नवे आहात, म्हणून आत्ता माफ करतो! पुन्हा हा गुन्हा नको!! कळलं?
सदू : (खजील आवाजात) हो साहेब!!
दादू : (करारी आवाजात) फोन का केला होतात?
सदू : (खोट्या अजीजीने) काय करू साहेब! घरची फार सय येतीये!! मी परत जाऊ का?
दादू : (गडबडून) म्हंजे? आमच्या पक्षात आल्यापासून तुम्ही घरीसुद्धा गेलेला नाही? कमाल झाली!!
सदू : (खोटं खोटं विव्हळत) कसा जाणार? आमच्यावर पहारा आहे ना!!
दादू : (दिलदारपणाने)...मी सांगतो आमच्या मावळ्यांना पहारा हटवायला!! दिवाळी तुम्ही अशी रस्त्यावर काढलीत हे बरं नाही झालं!! जा, घरी जाऊन या हं!! पण आता फराळही संपला असणार घरचा!! आमच्या घरी या, आणि फराळाचं पाकीट घेऊन जा!! ठीकंय?
सदू : (हसू कसेबसे आवरत) पहारा मावळ्यांचा नाही होऽऽ...मनसैनिकांचा आहे!!
दादू : (हादरून) अरे बाप रे! मग आता?
सदू : (मुद्‌दाम काडी टाकत) मी असं म्हणतोय साहेब की आम्ही सहा जण तुमच्या पक्षात आलो होतो ना, तसेच परत जातो! नाहीतरी ते लोक आमच्यासाठी गळ टाकून बसलेच आहेत!! इथं आमचं काय काम? आम्ही पुन्हा नवनिर्माणाच्याच कामाला लागतो! तेही शेवटी आपल्या घरचंच काम आहे ना!!!
दादू : (खवळून) निमक हराम! अवसान घातकी!! कपटी!! केसाने गळा कापणारे!! तोंड काळं करून परत जायचं होतं, तर आलातच कशाला आमच्याकडे, अं? तुमच्यासाठी आम्ही इतकं केलं, त्याचे हे असे पांग फेडता? आम्ही दिलदारी दाखवली म्हणून तुमची घरवापसी झाली!! विसरलात वाटतं!!
सदू : (आणखी डिवचत) तुम्हाला गरज होती म्हणून तुम्ही आम्हाला घेतलंत साहेब!! त्या कमळवाल्या सोमय्या गोमय्यानं धमकी दिली, म्हणून तुम्ही आम्हाला फोडलंत!!..दिलदारी कसली ह्यात? राजकारणात "दोन घेतले, दोन दिले' चालतंच!! तुम्ही एकदम बंपर दिवाळी सेल लागल्यासारखे अर्धाडझन घेतलेत, एवढंच!! तुमच्यापेक्षा आमचे नवनिर्माणाचे साहेब चांगले होते!! जातोच आम्ही परत स्वगृही!!
दादू : (गडबडून) अरे अरे अरे!! असं करू नका!! प्रॉब्लेम होईल सगळा!! तिथं काय ठेवलंय शिवाजी पार्कात? काहीही नाही...तुम्ही इथं बांदऱ्याला आमच्या घरी या! आमचा फराळ बराच उरला आहे यंदा!! हवं तर फराळ दोनदा करा! मी...मी...पुन्हा चकल्या-करंजी करायला लावीन आमच्या लोकांना!!
सदू : (साळसूदपणाने) खरंच फराळ उरलाय?
दादू : (तोंडभरून आश्‍वासन देत) हो हो!! अगदी बेलाशक या!! चिवडा, चकली, करंजी सगळं मिळेल!!
सदू : (गुप्त आवाज काढत) आमच्या शिवाजी पार्कवाल्या जुन्या साहेबांना पण आणू का? त्यांना फराळ कमी पडला यंदा!!
दादू : (बुचकळ्यात पडत) आँ?
सदू : (हास्याचा स्फोट करत कबुली देत) हाहाहा!! दादुमिया...कस्ला घाबरलास!! मी सदू बोलतोय!!
दादू : (दुप्पट खवळून) सद्याऽऽ...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com