...कुठे निघाला वाघ? (ढिंग टांग)

Dhing Tang
Dhing Tang

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान. 
वेळ : नाजूक! 
प्रसंग : भयंकर नाजूक. 
पात्रे : नाजूकच... 


(राजाधिराज उधोजीराजे प्रवासाची ब्याग भरत आहेत. तलवार ब्यागेत नेमकी कशी ठेवावी, हे कोडे उकलेनासे झाले आहे. तेवढ्यात सालंकृत सौभाग्यवती कमळाबाई अवतरतात. प्रवासाची तयारी पाहून दोन्ही हात कमरेवर ठेवून रागाने बघतात. अब आगे...) 

कमळाबाई : (थंड संतप्त स्वरात) हे काय बघतेय मी? 
उधोजीराजे : (ब्याग भरण्याच्या तंद्रीत) तुम्हाला हल्ली धुरकट दिसतं का? मलाही रात्री घड्याळ बघताना त्रास होतो! परवा पहाटेचे सहा वाजले म्हणून घाईघाईने उठून आवरून बसलो! पण...पण...मध्यरात्रीचे साडेबारा झाले आहेत, हे मागाहून लक्षात आले! नंबर बदलला असावाऽऽऽ.. 
कमळाबाई : (धारदार सुरीप्रमाणे) हे तुमचं काय चाल्लंय म्हंटे मी!! 
उधोजीराजे : (निरागसपणाने खुलासा करत) ही शिंची तलवार ब्यागेत कशी ठेवावी समजत नाहीए! तिरकी ठेवली तर, हे दाढीचं सामान बाहेर राहातं! उभी ठेवली तर भाल्यासारखं टोक बाहेर येतं...आडवी ठेवली तर वाकते!! काय करावे बरे? 
कमळाबाई : (पदर ओढत) वाकली तर वाकली!! 
उधोजीराजे : (सर्द होत) तो काय कंगवा आहे, वाकवायला? तलवार आहे ती धारदार!! 
कमळाबाई : (टोमणा मारत) जातीच्या मर्दाला तलवार शोभते, पण ती कमरेला बरं का!! तलवार ठेवावी, तर म्यानेत ठेवावी, ब्यागेत नव्हे!! 
उधोजीराजे : (तळहातावर मूठ आपटत) अलौड नाही नाऽऽ...विमानात तलवार नेता येत नाही, बाईसाहेब! म्हणून ब्यागेत टाकतोय! एरवी आम्ही तलवार हातात घेऊनच हिंडत असतो की!! 
कमळाबाई : (नाक वर करून) आमच्या गुजरातेत जाताय म्हणे?..तलवार घेऊन!! 
उधोजीराजे : (बुचकळ्यात पडत) तुमच्या गुजरातेत आम्ही कशाला जाऊ? तिथं जाऊन तलवारीनं काय ढोकळ्याच्या वड्या पाडायच्या आहेत? हाहा!! 
कमळाबाई : (फुरंगटून) होच्च मुळी! आम्हाला न सांगता तुम्ही गुजरात मोहिमेवर निघाला आहात! तिथं आमच्याच विरोधात मोहीम राबवायचं चाल्लंय तुमचं! आमच्या बहिर्जी नाईकानं दिली हो आम्हाला बातमी!! उगीच नाही आलो, इथं हातातली कामं सोडून!! 
उधोजीराजे : (गडबडून) काही तरी गैरसमज होतोय, बाईसाहेब! आम्ही गुजरातेत पाऊलदेखील ठेवणार नाही!! गुजरातेत जाण्याची आम्हाला आता गरज नाही!! 
कमळाबाई : (पदर खोचून तावातावाने) ऍहॅहॅ...तुमचे सरदार तिकडे पोहोचून कारस्थानांना लागलेसुद्धा! तिथल्या फंदफितुरांना साथीला घेऊन तुम्ही आम्हालाच शह द्यायला निघालात! शोभतं का तुम्हाला असं वागणं? आम्ही म्हणून हे सगळं सहन करतो!! दुसरी कुणी असती तर आज...आज...(डोळ्याला पदर लावतात.) 
उधोजीराजे : (गोंधळून) अहो, नाही हो! आम्ही गुजरातेत मागे जाऊन आलोय! गीरच्या अभयारण्यात! पुन्हा तिथं जाण्यात काही हशील नाही!..आणि वाघासमोर सिंहाची काय येवढी मिजास? गुजरात ही सिंहाची भूमी आहे, तर आम्ही सह्याद्रीचे ढाण्या वाघ आहोत! 
कमळाबाई : (कुत्सितपणाने) मग एवढ्या तलवारी घेऊन कुठे निघाली आहे स्वारी? 
उधोजीराजे : (उत्साहाने) आम्ही निघालोय राजस्थानात! 
कमळाबाई : (चमकून) तिथंही काहीतरी राजकारणाचं कुभांड रचायचं असणार तुम्हाला!! 
उधोजीराजे : (अजीजीने) अहो, तिथं रणथंबोरच्या अभयारण्यात वाघाचे फोटो काढायला जातोय हो!! आमची फोटोग्राफी हेसुद्धा तुम्हाला कुभांड वाटतं का? जगदंब जगदंब!! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com