आली समीप घटिका..! (ढिंग टांग!)

dhing tang
dhing tang
बेटा : (उत्साहाने एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽऽण...मम्मा, आय ऍम बॅक! हूं पाछा आव्या!!
मम्मामॅडम : (चमकून पाहत) ओह...तुझीच वाट पाहत होते!..
बेटा : (विचारात पडत) मारी वाट शा माटे जोए छे, मम्मा?
मम्मामॅडम : (कळवळून) मला कळेल अशा भाषेत जरा बोलशील का, प्लीज?
बेटा : (खुश होत) ओके...आय विल ट्रान्सलेट...आज लोक माझी इतकी वाट कां पाहत आहेत बरं?
मम्मामॅडम : (डोळे मिचकावत) आजचा दिवस स्पेशल आहे ना...म्हणून!
बेटा : (आश्‍चर्यानं)...तरीच मघाशी मी आलो, तर लोकांनी दणादण सलाम केले! घराबाहेर केवढी गर्दी जमली आहे बघितलीस का?
मम्मामॅडम : (समाधानाने) गेल्या साडेतीन वर्षांत मी एवढी माणसं एकदम बघितलीच नव्हती रे कधी!!
बेटा : (भयंकर खुशीत) ज्यां हूं जाऊं छूं, त्यां भीड जाये छे! गुजरातमध्येही तेच, इथंही तेच!! मघाशी मी इथे आलो तर "आले, आले' अशी हाकाटी उठली! अहमद अंकल घाईघाईने उठून फोन फिरवायला लागले! कार्यकर्त्यांनी जल्लोष केला!! टाळ्याबिळ्या वाजवल्या!
मम्मामॅडम : (कौतुकाने) बेटा, आपल्या पक्षासाठी आजचा दिवस खूप इंपॉर्टंट आहे! म्हणून वाजवल्या टाळ्या! कळलं?
बेटा : (बुचकळ्यात पडत) गुजरातपेक्षा इंपॉर्टंट काय असू शकतं सध्या? टेल मी!!
मम्मामॅडम : (समजूत घालत) गुजरातचं एवढं काही मनावर घेऊ नकोस! बेभरवशी आहेत तिथले लोक!! त्यांचं सोड! आपण आपली दिल्ली सांभाळावी!!
बेटा : (गंभीरपणे) नाय नो नेव्हर!! मी शब्द दिलाय मम्मा!!
मम्मामॅडम : (घाबरून) कोणाला शब्द दिलास बाबा आता तू?
बेटा : (डोळे मिटून) गुजरातच्या जनतेला!!
मम्मामॅडम : (सुस्कारा टाकत) मग हरकत नाही! गुजरातच्या जनतेला कोरड्या प्रॉमिसांचा अनुभव गेली बावीस वर्ष येतोय! त्यात तुझी भर! काऽऽही बिघडत नाही!!
बेटा : (दुर्लक्ष करत)...हूं मारी सदसदविवेक बुद्धीना स्मरण करीने कहूं छूं के...तन-मन अने धन ओतून मी गुजरातचा कारभार सुधारीन ! तिथल्या वेड्या विकासला शहाणा करीन! गुजरातमधल्या गरीब आणि युवकांना नोकरी देईन!..माझं जीवन आता मी गुजरातला वाहिलं आहे, मम्मा! अब मुझे दिल्ली रास नहीं आती!!
मम्मामॅडम : (गडबडून) मोठ्यांदा बोलू नकोस असं! सगळं मुसळ केरात जाईल!!
बेटा : (परखडपणे) खरंच मला अहमदाबाद, बडोदा, सुरत वगैरे जाम आवडतं हल्ली! तिथले लोक म्हणाले, की बेटाभाय तमे ह्यांज रेहजो! इथंच सेटल झालात की काही प्रॉब्लेमच नाही!!...मी गंभीरपणे विचार करतोय!
मम्मामॅडम : (पोटात गोळा येऊन) बरा आहेस ना बेटा? की पुन्हा सुटीवर जाण्याचे वेध लागलेत तुला? असं काही आता करू नकोस हं, सांगून ठेवते तुला!! तुझ्यासाठी मी किती खटाटोप केला आहे, हे माझं मला माहीत!! आता अगदी हातातोंडाशी घास आल्यावर तुझी ही भाषा? ओह माय गॉड!
बेटा : (निरागसपणाने) आज काय स्पेशल आहे म्हणालीस?
मम्मामॅडम : (जावळ कुर्वाळत) आजच्या शुभमुहूर्तावर तुझ्या राज्याभिषेकाचे मंगलविधी सुरू होणार आहेत! म्हणून म्हटलं, जरा आंघोळबिंघोळ करून तयार राहा!!
बेटा : (चक्रावून जात) त्यात विधी कसले? जाऊन नुसतं सिंहासनावर तर बसायचंय!!
मम्मामॅडम : (सीरिअसली) छे, छे! आपल्या पार्टीत सगळे निर्णय लोकशाही पद्धतीनं घेतले जातात! ती एक मोठी प्रक्रिया असते!!
बेटा : (गोंधळून) प्लीज एक्‍सप्लेन! आमच्या गुजरातमध्ये एकच माणूस सगळे निर्णय घेतो...अजून तरी!!
मम्मामॅडम : (नाक मुरडून) ते भांडवलदारांचे हस्तक आहेत! बेटा, आपल्या लोकशाहीवादी पक्षात सगळी लोकशाही प्रक्रिया पूर्ण करून मगच निर्णय घेतला जातो!
बेटा : (दुप्पट गोंधळून) निर्णय कोण घेतं?
मम्मामॅडम : (एक पॉज घेत) अर्थात मीच!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com