dhing tang
dhing tang

लिफ्ट! (ढिंग टांग!)

राष्ट्रवादी नेते चिकटगावकर- पाटलांकडील घरचे कार्य सिद्धीस नेण्यासाठी धाकले धनी ऊर्फ दादासाहेब आणि मा. मु. फडणवीस नानासाहेब ह्या दोघांनी एकत्र विमानाने औरंगाबाद गाठले. तेथील विमानतळावरून एकाच गाडीने पुढे मांडवदेखील गाठला. इतकेच नव्हे, तर एकत्रच जिलेबीचा आस्वाद घेऊन, परतीचा प्रवासदेखील जोडीने केला. ह्या घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हादरला असून, घड्याळाचे काटे थबकले. उलटे फिरावे की पुढे जावे, अशी नववधूसारखी त्याची अवस्था झाली. (संदर्भ : नववधू प्रिया मी बावरत्ये... लाजते, पुढे सरते, फिरते... हे गीत!) कमळाच्या पाकळ्या ताठच्या ताठ झाल्या, आणि मलबार हिलवाल्या दमाणियाबाईंचा पापड मोडला!!
यापुढे फडणवीस नानांसोबत एकाही स्टेजवर चढणार नाही, ही दादासाहेबांची भीष्मप्रतिज्ञा आठ दिवसांत मोडली. दोघेही स्टेजवर नव्हे, पण बोहोल्यावर चढून (नवविवाहितांना शुभाशीर्वाद देऊन) खाली उतरले!! वास्तविक ह्यामध्ये राजकारण शोधण्याचे काहीही कारण नाही. कां की ह्याच प्रवासात त्यांचा हरकामी गडी म्हणून आम्ही उपस्थित होतो. विमानात झालेले उभयतांचे संभाषण आम्ही येथे देत आहो. त्यात राजकारण कुठे आहे, ते वाचकांनी शोधावे... वाचा!! :
दादासाहेब : (कानाशी लागत) तुमच्या विमान्नाला एसी नाही क्‍का?
नानासाहेब : (फर्मान सोडत) कोण आहे रे तिकडे? एसी चालू करा!!
दादासाहेब : (कान न सोडता) खानपान सेवापण बंद केली क्‍का?
नानासाहेब : (पेडगावचे सोंग आणून) ती बंदच आहे धाकले धनी!! गेली तीन वर्षं आम्ही खानपान सेवा बंद ठेवली आहे! न खाऊंगा, न खाने दूंगा!! पाणी मिळेल!! (फर्मान सोडत) बाटली आणा रे पाण्याची!!
दादासाहेब : (घाईघाईने) पाण्याच्या बाटलीचं नावच काढू नका, नानासाहेब!
नानासाहेब : (चपळाईने सावरून घेत) बरं बरं ऱ्हायलं! बाकी तुमचा सहवास मिळाला हे आमचं भाग्यच!
दादासाहेब : (हात चोळत) काय करणार? तुमची पॉवर सेक्‍टरची मीटिंग लांबली, आमचं विमान चुकलं! तुम्ही आज लिफ्ट दिली नसती, तर औरंगाबाद ट्रिप क्‍यान्सल करावी लागली असती आम्हाला!
नानासाहेब : (साळसूदपणाने) अहो, लिफ्ट म्हंजे अक्षरशः लिफ्ट दिली म्हणा की! गाडीची लिफ्ट काय कोणीही देतं! आम्ही विमानाची दिली!! हाहा!!
दादासाहेब : (कसनुसं हसत) भलतेच विनोदी बुवा तुम्ही! आमची भाषणं ऐकायला या एकदा... (एकदम गंभीर होत) पण आम्ही हल्ली विनोदी भाषणं करायचं सोडलंय! नसत्या गोष्टी अंगलट येतात!!
नानासाहेब : (विषय बदलत) ते जाऊ दे! मला चिंता वेगळीच लागून राहिली आहे... तुम्हाला लिफ्ट देण्याचं खरं कारण तेच आहे!!
दादासाहेब : (समजून उमजून) कश्‍शाला काळजी करता इतकी! आम्ही आहोत ना!! कमी तिथे आम्ही, येवढं फक्‍त ध्यानी ठेवा!! तुमची चिंता आमच्यावर सोपवा, आमच्या चिंता तुम्ही डोक्‍यावर घ्या!! सगळं बैजवार होईल!! काय?
नानासाहेब : (आभारदर्शक हसून) तुमच्यासारखा जाणता मित्र भेटला, हेच आमचं भाग्य!
दादासाहेब : (आश्‍वासन देत) आमच्या भाषणांवर उगीच जाऊ नका! विरोधक म्हटलं की असं काहीतरी बोलावंच लागतं! त्यामुळे राजकारण थोडंच बदलतंय? तुम्ही काहीही काळजी करू नका! तुम्ही तुमची टर्म पूर्ण करणार ही जबाबदारी आमची! ठीक आहे? काय उगीच त्या मावळ्यांच्या नादी लागता!!
नानासाहेब : (ठामपणाने) आम्ही ही टर्म पूर्ण करणारच! इतकंच नव्हे, तर येतं इलेक्‍शनही जिंकणार! त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हंजे आम्ही हिवाळी अधिवेशनही जोरात पार पाडणार!! ती आमची चिंताच नाही!!
दादासाहेब : (बुचकळ्यात पडत) मग तुमची चिंता कुठली नानासाहेब? आम्हाला वाटलं की...
नानासाहेब : (कुजबुजत्या स्वरात) जरा कान इकडे करा!!... विवाहकार्याला चाललो आहोत! आम्ही आहेर आणलेला नाही!! तुमच्याच आहेरावर आमचं नावही लिहाल का? तेवढं सांभाळून घेतलंत तरी बास झालं!!.. कसं?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com