प्लास्टिकमुक्‍त महाराष्ट्र! (ढिंग टांग! )

Dhing Tang
Dhing Tang

ढिंग टांग! 
प्लास्टिकमुक्‍त महाराष्ट्र! 
मु. नाना फडणवीस, 
ह्यांच्या दफ्तरामधून, 
हिल, बॉम्बे.
 

प्रिय मित्रवर्य मा. श्री. उधोजीसाहेब, बांद्रे (बुद्रुक), बॉम्बे ह्यांस, शतप्रतिशत प्रणाम. गेल्या फारा दिवसात आपली गाठभेट नाही. पत्रापत्री नाही की फोनाफोनी नाही. चुकचुकल्यासारखे वाटते आहे. महाराष्ट्राचा (आपण आमच्या हाती दिलेला) कारभार हांकता हांकता दमछाक होत्ये. त्यात लोकसंपर्क कमी होतो. परंतु, आपले नाते इतके लेचेपेचे नाही, ह्याची खात्री आहे. एक अत्यंत महत्त्वाचा विषय हाती घेत असून त्यासंदर्भात आपले पाठबळ गृहित धरतो आहे. कृपया (नेहमीप्रमाणे) पाठीशी उभे राहावे, ही विनंती. 

आपणांस हे विदित आहेच की प्लास्टिकच्या भस्मासुराने जगभर थैमान घातले असून महाराष्ट्राच्या पर्यावरणाची विशेष हानी झाली आहे. सबब येत्या सहा महिन्यात संपूर्ण महाराष्ट्र प्लास्टिकमुक्‍त करण्याचा दृढ संकल्प महाराष्ट्र सरकारने केला असून त्याची कार्यवाही सुरू झाली आहे. 

ह्या उपक्रमाचे पहिले पाऊल म्हणून मंत्रालयात यापुढे प्लास्टिक आणू नये, हा आग्रह आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने महाराष्ट्र प्लास्टिकमुक्‍त करण्याची योजना आहे. 
संपूर्ण महाराष्ट्र प्लास्टिकमुक्‍त करण्याच्या कामी मराठी रयतेने (म्हंजे आपण बरं का!!) सरकारच्या पाठीशी उभे राहावे ही विनंती. रयतेचा सहभाग नसेल, तर महाराष्ट्र प्लास्टिक मुक्‍त होणे केवळ अशक्‍य होईल. जरा गैरसोय झाली की लोक उगीचच कोर्टात धाव घेतात आणि स्थगिती, तारीख पे तारीख, आंदोलने, राजकारणे अशी साखळी सुरू होते. ह्यात विकास रखडतो. विकास रखडला की कोट्यवधींचे नुकसान होते. प्लास्टिकने आजवर महाराष्ट्राचे किती नुकसान केले आहे, ते आधी ध्यानात घ्यावे! महाराष्ट्र चारशे वर्ष मागे गेला!! प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे विकास गुदमरतो. ह्यावर कुणी म्हणेल विकास वेडा झाला असून प्लास्टिकच्या पिशवीत डोके घातले की माणूस गुदमरणारच. पण तसे नाही. विकास शहाणा आहे. तेव्हा महाराष्ट्र प्लास्टिकमुक्‍त करण्यासाठी सर्वांनी कंबर कसावी, ही विनंती. आपला. फडणवीसनाना. 

ता. क. : वरील पत्रात "प्लास्टिक' ह्या शब्दाच्या जागी "कांग्रेस' हाच शब्द वापरून वाचून बघावे!! कळावे. नाना. 

* * * 
नानासाहेब- 
जय महाराष्ट्र! तुमचे पत्र मिळाले. वाचून आधी (नेहमीप्रमाणे) संताप आला. वास्तविक पर्यावरण खाते आमच्या पक्षाकडे आहे, आणि आमचे रामदासभाई कदम त्याचे मंत्री आहेत. आमच्या खात्यात तुमची लुडबूड कशाला? "प्लास्टिक बंदी जाहीर करू का?' असे विचारायला रामदासभाई मध्यंतरी बंगल्यावर येऊन गेले होते. त्यांना मी विचारले, ""तुमच्याकडे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड आहे का?'' तर त्यांनी ओशाळून ""नाही'' असे म्हटले. मी लागलीच म्हणालो की, द्या टाळी! माझ्याकडे पण नाही! खुशाल करा प्लास्टिक बंदी!!'' 

त्यांनी प्लास्टिकच्या पिशव्या आणि बाटल्या बंद करण्याची बातमी माध्यमांना दिली. एवढे झाल्यानंतर तुमचे पत्र मिळाले!! तुम्ही तर प्लास्टिकमुक्‍तीचीच भाषा केली आहे. टप्प्याटप्प्याने प्लास्टिकमुक्‍ती म्हंजे काय? तो काय प्लास्टिकचा चेंडू आहे का? काहीतरीच तुमचे!! प्लास्टिक हे लहान बाळापासून मोठ्या माणसापर्यंत सर्वांना उपयोगाला येते. त्यावर इतकी कडक बंदी लादण्याचे कारण नाही. त्यामुळे ह्या उपक्रमाला आमचे पाठबळ गृहित धरण्याचे कारण नाही. 

बंदीच घालायची तर फायबरवर घालावी!! तुमचे काही लोक (वनमंत्री सुधीर्जी मुनगंटीवार समाविष्ट.) फायबरचे वाघ बनवून आम्हाला भेट देत असतात. घरात वावरायची चोरी झाली आहे, इतके वाघ सध्या घरात आहेत! कळावे. जय महाराष्ट्र. आपला. उधोजी. 

ता. क. : तुमचा ताजा कलम वाचून जीव भांड्यात पडला! एरव्ही "प्लास्टिक'च्या जागी तुम्ही आमच्या पक्षाचे नाव घालत नाही, तोवर आमचे पाठबळ चालू राहील. पुन्हा जय महाराष्ट्र आणि थॅंक्‍यू!! उ. ठा. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com