कवडी आणि चुंबक ! (ढिंग टांग!)

dhing tang
dhing tang

आजची तिथी : हेमलंबीनाम संवत्सरे श्रीशके 1939 फाल्गुन शुद्ध षष्ठी.
आजचा वार : बुधवार... अनिवार !
आजचा सुविचार : जोडोनिया धन। उत्तम वेव्हारे
देव्हारे। त्रिखंडात।।

नमो नम: नमो नम: नमो नम: (108 वेळा लिहिणे.) माझ्या लक्ष जपाची फळे मला दिसू लागली आहेत. अतिशय कृतकृत्य वाटते आहे. मला असे कृतकृत्य वाटू लागले, की आमचे विरोधक आणि आहारतज्ज्ञ चिंताग्रस्त होतात. विरोधकांचे समजू शकते, पण आहारज्ज्ज्ञ नेमके आमच्या बाजूने आहेत की विरोधकांच्या, हे काही कळत नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला डायेटिंगवर ठेवण्याची जबाबदारी म्हंजे त्याला उपाशी ठेवणे असा तर होत नाही ना? कृतकृत्य झाल्यावर एखाद्याने सहज म्हणून सहा साबुदाणे वडे खाल्ले, कुठे बिघडले? पण... जाऊ दे झाले !
"म्याग्नेटिक महाराष्ट्र'चा इव्हेंट सुपरहिट ठरल्याने आमच्या विरोधकांच्या तोंडचे पाणी (एकदाचे) पळाले आहे. (आम्हाला चार साबुदाणेवडे ज्यास्त गेले..!) दोन दिवसांत बारा लाख कोटी आणले !! बारा लाख !! (आता करा हल्लाबोल...करा, करा !!) बसल्या बैठकीला दोन दिवसांत मी शेकडो करार-मदारांवर सह्या केल्या. एवढ्या सह्या करताना एखाद्याला लकवा आला असता ! तात्पर्य एवढेच की आम्ही कृतकृत्य झालो आहो.

बारा लाख कोटींचा आकडा ऐकल्याबरोब्बर (नाही म्हटले तरी) घरीसुद्धा आमचा भाव वधारला आहे. साबुदाणेवडे समोर आले ते काय उगीच? "नवा कुकर घ्यायला झाला आहे, डोशाचा तवाही जुना झाला आहे,' अशा घरच्या मंडळींच्या हिंटा सुरू झाल्या आहेत. जणू काही बारा लाख कोटी आले की मज्जाच मज्जा! मी म्हटले, ""अहो, आत्ता कुठे नुसते करार झाले आहेत, जरा थांबा!''
बाकी "म्याग्नेटिक महाराष्ट्रा'चा इव्हेंट दृष्ट लागण्यासारखा झाला. कवडी कवडी जोडून हे महाराष्ट्राचे चुंबक तयार झाले आहे !! येत्या भविष्यकाळात हेच आधुनिक महाराष्ट्रचुंबक किती धनसंपदा आकर्षित करेल, ह्याचे चित्रच कार्यक्रमात बघायला मिळाले. ते चित्र बघून साक्षात श्रीमान नमोजींनी आमच्या पाठीवर थाप मारून "केम छो' असे विचारले. (अंगावर काटा आला, काटा!!) "इव्हेंट बहु सरस थया' अशी कॉम्प्लिमेंट त्यांनी दिली. एवढा मोठा माणूस आपले चार चौघात कौतुक करतो आहे, हे निश्‍चितच अभिमानास्पद आहे. नमो नम:!!

मॅग्नेटिकच्या मांडवात एक गंमतच घडली. त्याचे झाले असे की ""तमे तो चोक्‍कस मेग्नेट छो, देवेनभाई! एटला इन्वेस्टमेंट एकदम लोखंडच्या माफिक तुम्हाला येऊन चिकटला!!'' असे श्रीनमोजी अचानक म्हणाले. मी एकदम गंभीर झालो. "अरे भई, आ विनोद छे!' असा खुलासा त्यांनी केला. त्यावर आमच्या विनोदवीर तावडेंनी कहर केला. त्यांना वाटले की त्यांनाच हाक मारली. त्यांनी "आलो आलो... हर हर महादेव' अशी आरोळी ठोकत गर्दीत मुसंडीच घेतली. थोड्या वेळाने नमोजींनी केलेला तो विनोद होता, हे कळले. मग मात्र सगळे खो खो हसले.

बाकी, बारा लाख कोटी वगैरे आकडे उच्चारणं हे मराठी माणसाचं लक्षण नव्हे, असे बहुधा आमच्या बांदऱ्याच्या मित्रांचे म्हणणे असावे. बांदऱ्यात राहून गृहस्थ "म्याग्नेटिक महाराष्ट्रा'च्या मांडवाकडे फिरकलासुद्धा नाही. त्यांचे सरदार सुभाषजी देसाई मात्र आवर्जून दोन्ही दिवस उपस्थित होते. देसाईसाहेब खरेच स्वभावाने मृदू माणूस! पहिल्या दिवशी सकाळीच त्यांना मांडवात गाठून "इथून हलू नका' असे बजावले होते. दुसऱ्या दिवशी पुन्हा गेलो, तर गृहस्थ तिथं तसाच्या तसा उभा!! मी सद्‌गदित होऊन त्यांना मिठीच मारली... एक दिवस त्यांना घरी बोलावून साबुदाणेवडे खिलवण्याचा विचार आहे. बघू या!

सारांश, आम्ही गुंतवणुकीचे चुंबक आहोत, आणि आमचे विरोधक (आणि मित्रही!) नुसतेच कवडीचुंबक!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com