बसीरहाट! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
सोमवार, 10 जुलै 2017

उध्वस्त आसमंतातील किडुकमिडुक
डोळ्यात तेल घालून राखणाऱ्या
बंदोबस्ताच्या पहारेकऱ्यांच्या गराड्यात
जळक्‍या फळकुटांची राख सावडताना
ओजोय पाल शोधत राहिला उगीचच...

चुन्याचं लोटकं, कत्थ्याची पतीली,
जुन्या बरण्यांच्या अस्थी,
पितळी हाथा,
किवामच्या चेपलेल्या डब्या,
उधळलेल्या गुटख्याच्या पुड्या,
इतस्तत: पडलेली पानं,
...आणि बरंच काही.

परवा झालेल्या जातीय दंगलीत
त्रिमोहिनी नाक्‍यावरची
त्याची दरिद्री पानटपरीसुद्धा संपली.
चिल्लरीचा धंदा चिल्लरीत गेला...

उध्वस्त आसमंतातील किडुकमिडुक
डोळ्यात तेल घालून राखणाऱ्या
बंदोबस्ताच्या पहारेकऱ्यांच्या गराड्यात
जळक्‍या फळकुटांची राख सावडताना
ओजोय पाल शोधत राहिला उगीचच...

चुन्याचं लोटकं, कत्थ्याची पतीली,
जुन्या बरण्यांच्या अस्थी,
पितळी हाथा,
किवामच्या चेपलेल्या डब्या,
उधळलेल्या गुटख्याच्या पुड्या,
इतस्तत: पडलेली पानं,
...आणि बरंच काही.

परवा झालेल्या जातीय दंगलीत
त्रिमोहिनी नाक्‍यावरची
त्याची दरिद्री पानटपरीसुद्धा संपली.
चिल्लरीचा धंदा चिल्लरीत गेला...

""आमी चिल्लर, आमी चिल्लर...''
ढसाढसा रडत ओजोयबाबू
बसला नुसताच उकिडवा
आपल्या जळून गेलेल्या
प्राक्‍तनाच्या परिस्थितीजन्य पुराव्यात.

आपले नेमके चुकले काय?
हे त्याला अजूनही नाही कळलेले.
इतकेच नाही तर
त्या मूर्खाला साध्या प्रश्‍नाचे
उत्तरही देता नाही आले...

एवढेच आठवते त्याला की-
पेट्रोलबॉंबच्या बाटल्या नाचवत
अभद्र आरोळ्यांच्या दणदणाटात
गल्लीच्या तोंडाशी आलेल्या
झुंडीने घेतला घास त्याच्या
अस्तित्त्वाचा, तेव्हा-
कुणीतरी ओढले त्याचे बखोट
आणि खेचले बाजूला...

उरलेल्या प्रारब्धाची राख
सावडताना उरले नव्हते भान
ओजोयबाबूला, दिसलेही नव्हते
दूर क्षितिजावर उगवणारे
लाल दिवाधिष्ठित सांत्वन किंवा
पांढऱ्याशुभ्र पोशाखातील
सहानुभूतीचे कळप
आणि तितक्‍यात निरर्गलतेने
दांडका समोर धरून विचारला
जाणारा अनुत्तरित सवाल :
""अब आपको कैसा लग रहा है?''

पण ओजोय पालला आठवते नक्‍की की-
त्याच्या त्या उद्‌ध्वस्तावर
पाय रोवत आलेल्या कुण्या
मुहम्मद नूर इस्लाम गाझीने
मात्र ठेवला त्याच्या खांद्यावर हात.

""ओजोयबाबू, जे झालं ते झालं.
की कोरबे? दुनिया जोल गई,
लेकिन हम नाई जॉला.
थोडं खाऊन घे, आणि पुन्हा
शुरुआत कर बरं!''

असे म्हणून गाझीने घातला
खमीसाच्या खिशात हात,
ओजोयबाबूच्या मुठीत
पुरचुंडी कोंबून म्हणाला :
एवढे पुरणार नाहीत,
खबर आहे मला...पण तरीही
दुई हाज्जार आहेत.

कोळसे सावडून काळवंडलेल्या
हाताने ओजोय पाल बघत राहिला,
त्या पुरचुंडीकडे बराच वेळ.

गाझी पाठोपाठ-

एका पक्षाचा नेता आला.
म्हणाला : ही त्या नतद्रष्टांची करणी.
दुसऱ्या पक्षाचा नेता आला.
म्हणाला : हे त्या नालायकांचं राजकारण.
त्यांचे किती मेले?
आपले किती गेले?
पहिला दगड कुणी उचलला?
पहिली शिवी कुणी दिली?
पहिला खून कुणी केला?
ओजोय पालच्या जळक्‍या प्राक्‍तनाचा
रीतसर पंचनामा झाला असून
चौकशीनंतरच कारवाई होईल, सर.

पण तूर्त साऱ्यांचे म्हणणे एवढेच की,
धार्मिक तेढीचा हा मामला
निषेधार्ह असून असल्या घटना
पुन्हा घडल्या तर खपवून घेणार नाही.
सबब, विरोधकांनी खबरदार राहावे.
मुर्दाबाद. मुर्दाबाद. मुर्दाबाद.
कागदी दंगलीचे लोण
शहरगावात पसरले असून
ओजोय पालच्या जळक्‍या प्राक्‍तनाचे
काय करायचे, हे फास्ट ट्रॅक
न्यायालयातच ठरेल, असे
सर्वानुमते ठरले आहे...

कायद्याचे राज्य आहे,
थोडा वेळ लागणारच.

पण प्रश्‍न आहे तो
ओजोय पालला उभे करणाऱ्या
मुहम्मद नूर इस्लाम गाझीचे
आता काय करायचे? हा!
त्याला कुठे शोधावे?