ठुल्ला! (ढिंग टांग!)

British Nandi
बुधवार, 10 ऑगस्ट 2016

अत्यंत गहन आणि गुंतागुंतीच्या विषयाला हात घालतो आहे. दिल्लीचे पंतप्रधान श्रीमान स्वामी अरविंद ह्यांना कोर्टाने ‘ठुल्ला‘ ह्या शब्दाचा अर्थ समजावून सांगण्यास फर्माविले आहे. आम आदमीस साह्य करणे, हे आमचे परमकर्तव्यच होय. काही महिन्यांपूर्वी स्वामी अरविंद ह्यांनी दिल्लीच्या पोलिसदादांस उद्देशून ‘ठुल्ला‘ असा शब्दप्रयोग केला होता. एका हवालदारास त्याचा भयंकर राग आला. वास्तविक ठुल्ला ह्या शब्दात जुळणारी यमके अधिक संतापजनक आहेत. पण ठुल्ला ह्या मूळ शब्दास वेगळाच वास आल्याने, त्याने कोर्टात तक्रार गुदरल्याने प्रकरण न्यायप्रविष्ट झाले. तथापि, असंख्य शब्दकोश धुंडाळूनदेखील मा.

अत्यंत गहन आणि गुंतागुंतीच्या विषयाला हात घालतो आहे. दिल्लीचे पंतप्रधान श्रीमान स्वामी अरविंद ह्यांना कोर्टाने ‘ठुल्ला‘ ह्या शब्दाचा अर्थ समजावून सांगण्यास फर्माविले आहे. आम आदमीस साह्य करणे, हे आमचे परमकर्तव्यच होय. काही महिन्यांपूर्वी स्वामी अरविंद ह्यांनी दिल्लीच्या पोलिसदादांस उद्देशून ‘ठुल्ला‘ असा शब्दप्रयोग केला होता. एका हवालदारास त्याचा भयंकर राग आला. वास्तविक ठुल्ला ह्या शब्दात जुळणारी यमके अधिक संतापजनक आहेत. पण ठुल्ला ह्या मूळ शब्दास वेगळाच वास आल्याने, त्याने कोर्टात तक्रार गुदरल्याने प्रकरण न्यायप्रविष्ट झाले. तथापि, असंख्य शब्दकोश धुंडाळूनदेखील मा. कोर्टास ठुल्ला ह्या शब्दाचा अर्थ न लागल्याने त्यांनी स्वामी अरविंद ह्यांनाच अर्थ फोड करून सांगण्याची आज्ञा केली आहे. ठुल्ला ह्या शब्दार्थाचा चोवीस तासांत छडा लावण्याची उपआज्ञा स्वामीजींनी आम्हाला केल्याने आम्ही कामाला लागलो आहो. असो. 

सर्वप्रथम आपण ठुल्ला ह्या शब्दाची व्युत्पत्ती पाहू. 

पूरबी भाषांमध्ये गोणपाटाच्या पोत्यास ठुल्ला असे म्हणतात. त्या भागात घायपात फार उगवत्ये. घायपाताच्या वाखट्यांपासून धागे काढले जातात. त्या धाग्यांयोगे गोणपाट बनवले जाते. आता गोणपाट कोणाला माहीत नाही? धान्याच्या साठवणुकीपासून एखाद्यास गुंडाळून हाणण्यापर्यंत गोणपाटाचे असंख्य उपयोग आहेत. पैकी गोणपाटात गुंडाळून बेमुदत हाणण्यासंदर्भातील एक दुखरा अनुभव प्रस्तुत लेखकाच्या पोतडीत जमा आहे. परंतु, त्याबद्दल पुन्हा कधीतरी. गोणपाटात एकेक पाय घालून लिंबू-चमचा शर्यत खेळण्याचाही एक उपयोग इतिहास-दफ्तरी आढळतो. प्रस्तुत लेखकाने ह्या शर्यतीत धावताना पुढील दोन दांत गमावल्याची आणखी एक दुखरी आठवण आहे; पण त्याबद्दलही पुन्हा कधीतरी! 

ठुल्ल्यात धान्य भरून ते गोदामात सडवणे हा एक अर्वाचीन उद्योग आहे. ‘साठेबाजी : काल, आज आणि उद्या‘ ह्या प्राचीन ग्रंथात त्याचा उल्लेख आढळतो. सदर ग्रंथ आम्हीच लिहिला आहे. वास्तविक त्याचे टायटल आम्ही ‘ठुल्लेबाजी : काल, आज आणि उद्या‘ असे मारले होते; पण प्रकरण ठुल्ल्याशी येईल, असे प्रकाशकांस वाटल्याने ते बदलले. त्याबद्दलपण पुन्हा कधीतरी! 

ठुल्ला हा शब्द ‘मुल्ला‘ असा लिहिण्याची पद्धत असली तरी त्याचा उच्चार ‘ठुला‘ असा आहे. ‘दहा किलो चावल ठुल्यात भर‘ असे सांगण्याची पद्धत आहे. एखाद्याला ‘चालता हो‘ असे सांगावयाचे असेल, तर ‘ठुल्यात जा‘ असेही सांगतात. हे सर्वसाधारणपणे मराठी भाषेसारखेच आहे; पण आम्ही मराठी उदाहरणे पाठीमागे टाकून पुढे जाऊ! 

आता आपण मूळ समस्येकडे येऊ. स्वामी अरविंद ह्यांनी हवालदारास ठुल्ला म्हटले, त्याचा सदर हवालदारास राग का आला? 

वाचकहो, त्याचे मूळ दृष्टिभ्रमात आहे. ठुल्ल्यात अर्धेअधिक धान्य भरले असता व ते लांबून पाहिले असता डिट्टो हवालदारासारखे दिसते, असा अनेक जनसामान्यांचा अनुभव आहे. पण हा दृष्टिभ्रम असावा!! गोणपाटाचा रंग निसर्गत: खाकी असतो. अर्धेअधिक धान्य भरलेला ठुल्ला हा खुर्चीवर (पेंगत) बसलेल्या हवालदाराप्रमाणे दिसतो, हे खरे आहे. दाभण अथवा आकडा मारल्याशिवाय हा ठुल्ला उचलणार नाही, असे त्याकडे पाहून उगीचच वाटते. त्यात तथ्यदेखील आहे. स्वत:चे स्वत: पाय फुटल्याप्रमाणे पोते कसे बरे हालचाल करील? तात्पर्य येवढेच की स्वामी अरविंद ह्यांस अशा प्रकारचा भास ह्यापूर्वी कधीतरी झाला असणार! असो. 

वाचकहो, ठुल्ला म्हंजे गोणपाट हे आपण सोदाहरण पाहिले. ह्यावरून काय सिद्ध होते? तर हवालदारास ठुल्ला म्हटल्याने त्याचा कोठलाही अपमान अथवा उपमर्द होत नाही हेच!! मुळात ठुल्ला ह्या शब्दाचा अर्थ शब्दकोशातच नसल्याने त्याने कोणाचा ना सत्कार होतो, ना अपमान, हे त्रिवार सत्य आहे. 

आपणांस ठुल्ला म्हटलेले चालेल काय? असे आम्ही कोपऱ्यावरील बबन सखाराम फुलपगार (बक्‍कल लंबर 1212) ह्यांस विचारले असता त्यांनी आम्हास हातातील दाभण दाखवली व ओठ उसवल्याप्रमाणे हिंस्त्र हालचाल केली. पुढे काय घडले, ते पुन्हा कधीतरी!

संपादकिय

देशात राजकीय आणि आर्थिक पातळीवर अनेक चढउतार आणि उलथापालथी होत असल्या तरी...

01.15 AM

भारतीय जनता पक्षाचा घोडा अश्‍वमेधाच्या वारूप्रमाणे देशभरात दौडत असताना, तो...

01.15 AM

व्यक्तीच्या किंवा देशाच्या आयुष्यात एक टप्पा असा येतो, की तिला भेडसावणाऱ्या...

01.15 AM