एक दुधाळ योग! (ढिंग टांग!)

Dhing Tang
Dhing Tang

आजची तिथी : दुर्मुखनाम संवत्सरे श्रीशके 1938, कार्तिक कृष्ण चतुर्थी.
आजचा वार : योगगुरुवार!
आजचा सुविचार : सकाळी उठोनी पाहुनि गाय।
नमस्करोनी म्हणतील हाय।
तयांच्या घरी वाढत्ये सौख्यवल्ली।
म्हणे सूत्र सत्यार्थ ही पतंजल्ली।।
(योगगुरू बाबा बामदेव ह्यांच्या आगामी "दुग्धकोशा'तून साभार)
.......................................

नमोनम: नमोनम: नमोनम: (108 वेळा लिहिणे.) महाराष्ट्राच्या राजकारणात पुढाऱ्यांना काय काय ड्यूट्या कराव्या लागतात, हे लोकांना कधीही कळणार नाही. निम्मा दिवस ह्या ड्यूट्या पार पाडण्यात जातो, उरलेला असल्या ड्यूट्या हुकवण्यात! मला आमचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि पशुदुग्धविकास मंत्री महादेवराव जानकर ह्यांची विलक्षण दया येत आहे. त्यांचे हे हाल...महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचे तर काही विचारायची सोय नाही. ह्या असल्या ड्यूट्यांपेक्षा ब्यांकेत चार तास उभे राहाणे पर्वडले असते! पत्नी ब्यांकेतच सर्विसला असल्याने मला इतरांसारखे ब्यांकेत खेटे मारण्याची ड्यूटी करावी लागली नाही. घरबसल्या दोन-चार हजाराच्या नोटा बदलून मिळाल्या. अर्थात ब्यांकेत पत्नी नोकरीला असली, की माणसाला वाटेल तेवढ्या नोटा बदलून मिळतात, असेही नाही. नेमके चारच हजार मिळतात! पण मुख्यमंत्र्याइतका क्‍याशलेस माणूस पृथ्वीतलावर नसेल, हे मी खात्रीने सांगू शकतो. वास्तविक मला पंधरावीस टीव्ही क्‍यामेऱ्यांसामोर "एटीएम'च्या रांगेत उभे राहून बाईट द्यायला आवडले असते; पण नाही जमले! जाऊ दे. हे नोटाबंदीचे राजकारण सुरू असतानाच अचानक आमचे पीए आले. म्हणाले, ""साहेब, उद्या नेवाश्‍याला जावं लागणार. बाबाजी बामदेव ह्यांच्या दूध डेअरीचं उद्‌घाटन तुम्हाला करायचं आहे...''

हादरूनच गेलो. हे बाबाजी उद्‌घाटनाच्या नावाखाली गाईपुढे कासंडी घेऊन बसवतील, ह्या भीतीने दूध आठवले! दूध काढणे हे येरागबाळ्याचे काम नोहे! उकिडवे बसून पायात कासंडी धरून गाईला दोहणे हे सिनेमात बरे दिसते; पण प्रत्यक्षात घाम निघतो. मुदलात उकिडवे बसण्याची अटच इतकी भयानक आहे, की त्यामुळेच पोटात गोळा येतो. ""मी दूध वगैरे काहीही काढणार नाही हां...सांगून ठेवतोय!'' असे मी पुन्हा पुन्हा बजावत नेवाश्‍याला गेलो...

नेवासे! जेथे ज्ञानोबा माउलींनी ज्ञानेश्‍वरी रचिली, त्या पवित्र भूमीत बुधवारी पहाटे दोन प्रचंड आरोळ्या उमटल्या. एक सदाभाऊ खोत ह्यांची, दुसरी महादेवराव जानकरांची. चूक त्यांची नव्हती. डेअरीच्या उद्‌घाटनासाठी नेवाश्‍यात आलेल्या ह्या नव्याकोऱ्या मंत्र्यांना बाबाजींनी योगाच्या चटईवर आणून बसवले, आणि योगासने करायला लावली! बाबाजींनी त्यांची फेवरिट कपालभाति करण्यास फर्माविले आणि खोत-जानकरांचे हालहाल झाले!! बाबाजींची पोटाची खोळ रिकाम्या झोळीसारखी फडफडत्ये. पण आमच्या सदाभाऊ आणि जानकरभाऊंचे काय होणार? कल्पना करा! अस्सल मऱ्हाटी आहारावर पोसलेले हे पिंड...खड्‌डे ओलांडत भरधाव निघालेल्या आटोरिक्षातल्या असहाय प्रवाश्‍यासारखे दोघांचे चेहरे विदीर्ण झाले होते. योगासनांच्या नावाखाली ह्या दोन्ही सरकारी देहांच्या यथेच्छ घड्या घालून झाल्यावर बाबाजींनी उद्‌घाटनाकडे मोर्चा वळवला. गेल्या खेपेला ह्या बाबाजींना नागपुरातली संत्री हवी होती, आता मराठवाड्यातल्या गाई हव्या आहेत. देशी वाणाच्या गाईंचे दूध विकण्याचा सपाटा आता ते लावतील. तसा मनोदय त्यांनी व्यक्‍त केला. मी म्हटले,"" यू आर ए नाइस गाय!'' त्यावर ते एका डोळ्याने कपालभाती केल्यासारखे नुसतेच हसले.

गाय पिळण्याच्या कटकटीतून वाचल्याच्या आनंदात मी एक दुधाळ भाषण ठोकले. दरम्यान, कार्यक्रम संपल्यावर सदाभाऊ आणि जानकरभाऊंना शोधत निघालो, तर ते कुठे भेटावेत? -पतंजलीच्या औषधांच्या दुकानी!! "अंगदुखीवर कुठल्या तेलाने मालिश करावे?' अशी चौकशी हळू आवाजात करत होते. म्हणून म्हटले : राजकारणात कुठल्या ड्यूट्या कराव्या लागतील, सांगता येत नाही. असो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com