Dhing Tang
Dhing Tang

कार्टुन नेटवर्क! (ढिंग टांग!)

आजची तिथी : दुर्मुखनाम संवत्सरे मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी श्रीशके 1938 
आजचा वार : सोमनाथ मंडेवार!..हे वऱ्हाडी नाव कुठून आले?.. आय मीन सोमवार. 
आजचा सुविचार : 
जंगल जंगल बात चली है, 
जंगल जंगल पता चला है, 
चड्डी पहन के फूल खिला है, 
खिला है.... 
.............. 

नमा नम: नमो नम: नमो नम:..सध्या नागपुरात आहे! जिवाला फार्फार बरे वाटते आहे!! नागपूरला आले की कोणालाही बरेच वाटते, असे प्रत्येक नागपूरकराला वाटतेच. अधिवेशनाच्या तयारीची देखरेख करून आलो. दहा-पंधरा दिवस बरे जातील अशी चिन्हे आहेत. सगळ्या विरोधी नेत्यांना स्वत: जाऊन चहापानाचे निमंत्रण देऊन आलो.

विखेसाहेबांच्या बंगल्याची बेल वाजवली. दार लोटून बघितले तर साहेब पोगो च्यानल पाहात खळखळून हसत बसले होते. त्यांच्या शेजारी धन्यजय मुंडेजी!! होय, त्यांना मी धन्यजय मुंडे असेच म्हणतो. मी म्हटले, ''संध्याकाळी चहापानाला या, आमच्या घरी!'' 

...तेवढ्यात टीव्हीतल्या एका गोलमटोल कार्टून व्यक्‍तिरेखेने पोटातल्या पिशवीतून एक हेलिकॉप्टर काढले. त्यात बसून तो उडालासुद्धा!! विखे-मुंडेजी दोघेही गडाबडा लोळत होते. मी विचारले- हे काय? तर विखेसाहेब म्हणाले, की ''हे तुम्हीच!!'' 

...विखेसाहेबांनी मला चक्‍क डोरेमॉन म्हटले. मला संतापच आला. होय, मी दोनदा जपानला जाऊन आलो. पण म्हणून मी जपानी कार्टुन झालो का? डोरेमॉनचे कार्टुन मी अनेकदा पाहिले आहे. आमची लेक दिविशा लहानपणी हे कार्टुन फार बघत असे. 'बाबा, तू असा दिसतोस' असे तिने एकदा चारचौघांत म्हटल्यावर तिला आतल्या खोलीत घाईघाईने न्यावे लागले होते, असे अंधूक अंधूक आठवते. असो.

नोबिता नावाच्या एका नापास मुलाचे ते कार्टुन आहे. डोरेमॉन नावाचा एक गोलमटोल रोबोका (रोबो + बोका = रोबोका) आपल्या पोतडीतून भारी भारी गॅजेट्‌स काढून नोबिताचे प्रॉब्लेम्स सोडवतो, अशी ती कार्टुन मालिका आहे. 

''अजूनही तुमच्या पक्षात पोगो च्यानल बघतात? कमालच आहे!,'' मी म्हणालो. 

''अजूनही म्हंजे? आमच्याकडे कंपल्सरी आहे ते!!,'' विखेसाहेबांनी उत्तर दिले. 

''आमच्याकडे क्रिकेट बघायची चाल होती...पण सध्या केबल कापली आहे आमची!,'' धन्यजयजींनी पडक्‍या चेहऱ्याने खुलासा केला. 

''हा डोरेमॉन तुमच्यासारखा आहे. पोतडीतून काहीतरी आयडिया काढून बिचाऱ्या नोबिताला गंडवत ऱ्हायचं! मज्जा!! तुम्हीही जनतारूपी नोबिताला असंच छळता!,'' विखेसाहेब म्हणाले. 

''मी डोरेमॉन? मी आता गोलमटोल राहिलेलो नाही. मुंबईत येऊन माझे राजकीय वजन भरपूर वाढले असले, तरी शारीरिक वजन घटले आहे!!,'' विनम्रपणे मी त्यांचा आरोप नाकारला. पण दोघेही अगदी ऐक्‍कत नव्हते. 

''मी डोरेमॉन असेन, तर तुम्ही मोगली आहात!,'' असे अखेर संतापाने सुनावून मी तडक निघून आलो आणि चहावाल्याची ऑर्डरच क्‍यान्सल करून टाकली. नोटाबंदीच्या काळात हा नस्ता खर्च कोणी सांगितला आहे? शिवाय चहावाला क्‍याश मागत होता. मी म्हटले,''लेका, मी काय डोरेमॉन आहे, पोतडीतून वाट्टेल ते काढून द्यायला? ठेंगा!! क्‍याशबिश काहीही मिळणार नाही!'' 

उपमा चुकलीच! पण वेळ निघून गेली होती. खरे तर जंगली म्हणायचे होते. मोगल आणि जंगल एकत्र झाले आणि तोंडातून चुकून मोगली निघून गेले. घरी आलो तर गडकरीवाड्यावरून एका ओळीची गोपनीय चिठ्ठी आली होती.- ''सकाळी शिनचॅन रेशीमबागेत मिकी माउसला भेटला. सावध राहा! पोकेमॉन.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com