वाघ आणि जीएसटी! (ढिंग टांग!)

Dhing Tang
Dhing Tang

कर नाही त्याला डर कशाला? अशी मराठी भाषेत एक म्हण आहे. ज्याला कर नाही, त्याला डर नसते, असा त्याचा सरळ अर्थ आहे. ह्याचाच अर्थ असा की ज्याला डर नसते, त्याला करदेखील नसला पाहिजेल. पण दुर्दैव येवढे, की भलभलते कर मराठी माणसास भरावे लागतात.

कर म्हंजे हात. अशा करांना केराची टोपली दाखवावी, असा आदेश आम्हाला थेट 'मातोश्री'वरून मिळाल्याने आम्ही हात (याने की कर) झटकून मोकळे झालो आहो. पण अन्य चाकरमानी मुंबईकरांसाठी आमचे कर शिवशिवतात. (शिवशिवतात, ह्या शब्दावर कोटी करण्याचा मोह आम्ही आवरला आहे, हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आले असेलच.)

आमचे तारणहार जे की उधोजीसाहेब ह्यांचा जीएसटी-फीएस्टीला कायम विरोध असतो व आहे. त्यांचे मन वळवण्याची मखलाशी साधण्यासाठी कमळ पार्टीने त्यांचे शिलेदार व वनमंत्री रा. सुधीर्जी मानगुंटीवार ह्यांना 'मातोश्री'वर पाठवले. हे कमळवाले कायम 'मातोश्री'वर शिरकाव साधण्यासाठी टपलेलेच असतात. संधी मिळाली की घुसलेच म्हणून समजा!! त्यांना मज्जाव करण्यासाठी मा. उधोजीसाहेबांनी कुत्रेदेखील पाळले, पण तरीही उंहुं!! कमळवाले पोचतातच!!

ह्यावेळी त्यांनी जीएसटीचे निमित्त साधून 'मातोश्री'वर मोर्चा नेला. मा. उधोजीसाहेबांनी काहीही करून (म्हंजे काहीही न करून) जीएसटीला मान्यता द्यावी, असा त्यांचा कट होता. पण आमच्या साहेबांना कुणी असे तसे बनवू शकत नाही. साहेब आपल्या मुद्द्यावर ठाम राहिले. मा. उधोजीसाहेबांस भेटून प्रेझेंटेशन करण्यासाठी मा. मानगुंटीवार हे (ज्याकिटाची वरपर्यंत सर्व बटणे लावून) 'मातोश्री'वरील दरबारात हाजिर नाजिर झाले, तेव्हा आम्ही त्या भेटीस स्वत: उपस्थित होतो. ही घटना (किंवा दुर्घटना) सोमवारी सकाळी अकरा वाजेशी घडली. तेथे झालेले संभाषण आम्ही आमच्या वाचकांसाठी येथे तपशीलात देत आहो. त्याचे झाले असे की... 

...'मातोश्री'च्या दरबारात नेहमीप्रमाणे साक्षात उधोजीसाहेब सिंहासनावर बसले होते. शेजारी फायबरचा जिवंत दिसणारा वाघ उभा होता. उधोजीसाहेबांची नजर मा. मानगुंटीवारसाहेबांवर आणि हात वाघाच्या पाठीवर होता. वाघाच्या पल्याड शिवअर्थमंत्री केसरकरमामा बसले होते. त्यांच्या शेजारी दाढीधारी मंत्री एकनाथभाई शिंदेसाहेब ह्यांना ते 'काल रात्री काळ्या वाटाण्याची उसळ उगीच खाल्ली!'' असे सांगत होते. त्यांच्याही पलीकडे सुभाषकाका देसाई...असे अष्टप्रधान मंडळ. समोरच्या स्टुलावर आजचे प्रमुख पाहुणे मा. मानगुंटीवारसाहेब!!..मानगुंटीवारसाहेब त्या वाघाकडे पाहून ओळखीचे हसले. पण वाघ हसला नाही. लेकाचा ओळख विसरला... 

''हा वाघ आम्हीच दिला आहे नं?'' मा. मानगुंटीवारसाहेब अखेर न राहवून म्हणाले. 

''तो आमच्याकडे आला! कोणी दिला नाही!!... वाघाकडे वाघ येईल नाहीतर काय उंदीर येईल? नॉन्सेन्स!!'' उधोजीसाहेब ओरडले. वाघाच्या पाठीवर त्यांनी एक थाप मारली. वाघ काहीही बोलला नाही. 

''त्याची आयाळ कुठे गेली?'' मा. मानगुंटीवारसाहेब ह्यांचा येळकोट जाता जात नव्हता. हा वाघ आपलाच आहे, ह्याची त्यांना ठाम खात्री होती. 

''वाघाला आयाळ नसते... सिंव्हाला असते!'' मा. उधोजीसाहेब करवादले. ह्या लोकांना जंगलाचे साधे जनरल नॉलेज नाही. तरीही म्हणे वनमंत्री!! मा. उधोजीसाहेबांना रागच आला. पण मध्येच वाघ गुरगुरल्याचा आवाज आल्याने दचकून त्यांनी त्याच्या पाठीवरला हात काढून घेतला. वाघाच्या पलीकडे बसलेले दीपकराव केसरकर तोंडाला रुमाल लावताना त्यांनी बघितले. असू दे. असू दे. 

''ह्याले तं दातसुद्धा दिसून नै ऱ्हायले!,'' मा. मानगुंटीवार निरखून वाघाकडे बघू लागले. आता ह्या वनमंत्र्यास कसे आवरावे? 

''तो पाठमोरा आहे...! दात कसे दिसतील? नॉन्सेन्स!!'' मा. उधोजीसाहेबांनी आता तलवारीलाच हात घालावा की काय, असा क्रुद्ध चेहरा केला. 

''एक तं आमचा जीएसटी पास करा, नाही तं हा वाघ आम्हाले वापस करून द्या, साहेब!'' मा. मानगुंटीवारसाहेबांनी तिढा टाकला. मा. उधोजीसाहेबांनी वाघाच्या पाठीवर पुन्हा हात फिरवला आणि मान डोलावली. 

बास, घडले ते इतकेच. जय महाराष्ट्र.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com