साकडे! (ढिंग टांग!)

Dhing Tang
Dhing Tang

आजची तिथी : आषाढ शुक्‍ल एकादशी श्रीशके 1939. 
आजचा वार : ट्यूसडे विथ पांडुरंग. 
आजचा सुविचार : देवाचिये द्वारी। बसावे पळभरी। 
............................... 

नमो नम: नमो नम: नमो नम: (पहाटे उठून 105 वेळा लिहिले. लक्ष लौकरच पुरा होईल असे दिसते. वह्या संपत आल्या...) पांडुरंगा हरि विठ्‌ठला...अतिशय प्रसन्न वाटते आहे. आषाढी एकादशीच्या आदल्या रात्री जग जरी शांत झोपलेले असले तरी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जागा असतो. नुसता जागा नव्हे, तर पंढरपुरात असतो. पंढरीरायाची यथासांग पूजा पार पडली. खूप शांत आणि प्रसन्न वाटले. तसे मध्यरात्रीपासूनच शुचिर्भूत आणि स्वच्छ वाटत होते. एरवी कुठला नागपूरचा माणूस मध्यरात्री उठून अंघोळ करतो? काहीही असो, मला पंढरीत विलक्षण अनुभव आला. तो शब्दात व्यक्‍त करणे कठीण आहे. जाहीर व्यक्‍त करणे तर बाजूलाच राहिले. तो इथे डायरीत लिहिलेलाच बरा! 

...यथासांग पूजा पार पडल्यानंतर पुजाऱ्याने हातावर पळीभर तीर्थ टेकवून 'आता घटकाभर 'देवाचिये द्वारी नुसतेच बसा, आणि चिंतन करा,' असे बजावले. तीर्थ डोळ्या-टाळूला लावून मंडपातल्या एका दगडी खांबाला टेकून शांत बसलो. डोळे मिटले... 
अचानक डोळ्यांसमोर रत्नप्रभा उजळली. उजेडाचे झाड पेटले. अनंगरंगी रंगांचे नृत्य सुरू झाले. मनाची हुरहुर झाली. इतक्‍यात गूढ गाभाऱ्यातून यावा, तसा घनगंभीर स्वर कानांवर पडला. सोबत बासरीचे मंगल सूर होते... 

''झालं जेवण?'' 

''हं,'' कसेबसे मी म्हटले. साक्षात पंढरीचा राणा मला मायेने विचारतो आहे. झालं जेवण? मला गदगदून आले. गेल्या कित्येक वर्षांत मला कोणीही हा प्रश्‍न विचारलेला नाही!! जेवायला पाटावर बसावे तर 'हे काय पुन्हा?' असा सवाल ऐकू येतो. मुंबईत सहकुटुंब आल्यावर तर प्रश्‍नच मिटला. 'साहेब डायटिंगवर आहेत', ही अफवा ज्याने कोणी उठवली, त्याला पोत्यात घालून टकमक टोकावरून ढकलून देण्याचा वटहुकूम काढणार आहे. 'डायटिंग' म्हटले की कोणी आग्रह करीत नाही. आणि आपल्यालाही कसनुसे हसण्यापलीकडे काही करता येत नाही. जाऊ दे. 'झालं जेवण?' ह्या प्रश्‍नाचे खरे उत्तर 'संध्याकाळी मूठभर चिरमुरे आणि दोन-तीन बत्तासे खाल्ले आहेत,' असे देणार होतो; पण गप्प राहिलो. नुसतीच मान हलवली. 

'' माझ्याही पोटात काही नाही...आता उपवास सुरू झाला. कठीणच आहे सगळं...,'' गूढ गंभीर आवाजात एक खंत डोकावली. अखिल विश्‍वाचा धनी उपाशी? देव भावाचा भुकेला आहे, हे खरे; पण खराखुरा भुकेला? छे, छे! माझ्या महाराष्ट्रात हे काय चालले आहे? 

''काही हवंय?,'' पुन्हा तोच मंजुळ आवाज. 

''माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्‍त कर...बाकी मला काही नको!!'' भावनेने ओतप्रोत आवाजात मी म्हटले. 'पाऊस पडू दे. शेतं पिकू देत...' ही तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची पंढरपुरी ऍन्युअल डिमांड असते. म्हटले काहीतरी वेगळे मागितले पाहिजे. 

''अरे, काय लावलंय काय तुम्ही? ते राजू शेट्‌टी तेच मागतायत. तुमचे मित्र उधोजीसाहेबसुद्धा तेच मागतायत...,'' पुन्हा त्रासिक आवाज घुमला. 

''देवा, तुम्हाला नाही तर कुणाला साकडं घालायचं?,'' मी म्हणालो. 

''हो, पण ते शेट्टी, उधोजी कर्जमुक्‍ती तुमच्याकडे मागतायत! माझ्याकडे नाही!! तुम्ही आम्हाला काय सांगता? मुळात ही ड्यूटी तुमची. मी कशी काय करणार?,'' त्या मंजुळ आवाजाचे रूपांतर अचानक उद्वेगात कां झाले बरे? मी गडबडून डोळे उघडले. टक्‍क जागा झालो...पाहतो तो काय! 

...शेजारी आमचे कृषिमंत्री पांडुरंगराव फुंडकर हातात चिरमुऱ्यांची पुडी घेऊन रोखून बघत होते. म्हणाले, ''घ्या!...कर्जमुक्‍ती होईल तेव्हा होईल, साबुदाण्याची खिचडी व्हायला वेळ आहे अजून...घ्या!!'' 
- ब्रिटिश नंदी

ढिंग टांग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com