ऍनिमल प्लॅनेट! (ढिंग टांग!)

Dhing Tang
Dhing Tang

टु श्री. सुधीर्जी मुनगंटीवारजी, 
(किंग ऑफ चंद्रपूर) फॉरेस्ट मिनिस्टर, 
स्टेट ऑफ महाराष्ट्रा, बॉम्बे. 

डिअर अंकल, 

साष्टांग नमस्कार आणि अनेक उत्तम आशीर्वाद व जय महाराष्ट्र. पत्र लिहिण्यास कारण की आम्ही बॉम्बेच्या भायखळा एरियात न्यू ब्रॅंड झू बांधतो आहोत. त्यासाठी नवीन ऍनिमल्स आणावे लागणार असून ते तुम्हीच सप्लाय करू शकाल, असे बाबा (जय महाराष्ट्र) म्हणाले. म्हणून हे पत्र लिहीत आहे. पत्र मिळताच डिलिव्हरीची व्यवस्था करावी, ही रिक्‍वेस्ट आहे. 

आमचे भायखळ्याचे झू हे ओपन झू आहे. ओपन जिम असते ना, तसेच ओपन झू!! म्हंजे बाजूने रस्त्यावरून सारखा झू झू ट्रॅफिक जात-येत असतो. त्याला लागूनच हे ओपन झू आहे. वनमंत्री अझूनही तुम्ही अझून एकदाही बघायला आला का नाहीत? नुकतेच तिथे पेंग्विंन आणून ठेवले आहेत, हे तुम्हाला माहीत असेलच. पेंग्विंन बघायला खूप माणसे येतात. त्यांच्यासाठी (माणसांसाठी नव्हे, पेंग्विंनसाठी!!) तिथे खूप बर्फ आणून ठेवला आहे. पण बर्फ जास्त झाल्यामुळे मध्यंतरी दोन पेंग्विनना सर्दी झाली व ते ऍडमिट झाले. (तेव्हा आम्ही काळे कोट घालून दोन मावळे त्यांच्याजागी उभे केले होते. लोकांना काहीही कळले नाही!! पण त्यांनाही नंतर बर्फ जास्ती झाला असावा!! असो.) मुद्‌दा नवीन ऍनिमल्स रिक्रूट करण्याचा आहे. 'मुनगंटीवारजी अंकल कुठलाही ऍनिमल ट्‌वेटिफोर आवर्समधे आणून देऊ शकतात', असे बाबांनी (छातीठोकपणे) सांगितले म्हणून आपल्याला हे पत्र लिहीत आहे. 

त्यांना 'नक्‍की ना?' असे दोनदोनदा विचारून घेतले. त्यांनी दोनदोनदा 'बहुतेक नक्‍की' असे ठामपणे उत्तर दिले. तुम्ही दिलेले दोन वाघ आमच्या बांदऱ्याच्या घरी मजेत आहेत. मी दोघांनाही रोज दूध प्यायला देतो. पण ते पीत नाहीत. 

आमच्या जिजामाता उद्यानाच्या झूमध्ये सध्या प्राण्यांसाठी पिंजरे बांधण्याचे वर्क चालले असून मोस्ट ऑफ द वर्क कंप्लीट झाले आहे. इन अदर वर्डस, पिंजरे उभे आहेत, पण त्या पिंजऱ्यांना अजून कड्या लावलेल्या नाहीत. 'दरवाजा बंद करा, दरवाजा बंद' हे श्री अमिताभ बच्चन अंकल यांचे सुप्रसिद्ध गाणे तेवढे वाजत असते. ह्या पिंजऱ्यांमध्ये ठेवायला काही ऍनिमल्स हवे आहेत. ते कृपया पाठवावेत. ऍनिमल्सची

यादी अशी : 
1. सिंव्ह (सायंटिफिक नेम : पॅंथेरा लिओ पर्सिका) दोन नग. (टिप : नौरा-नौरी पाठवावेत.) : आमच्याकडे सिंव्ह नाही, याचे मला खूप दु:ख होते. मीच माझे नाव बदलून विक्रमादित्य सिंह असे करणार होतो. पण बाबा नाही म्हणाले. गुजरातमध्ये चिक्‍कार सिंव्ह झाले असून ते रस्त्यात गाईगुरांसारखे फिरू लागल्याची व्हाट्‌सऍप क्‍लिप मी पाहिली होती. गाईप्रमाणेच गुजरातमध्ये सिंव्हाना संरक्षण आहे. तेव्हा तुमची ओळख वापरून तिथले दोन लायन्स कृपया इथे पाठवावेत. 

2. वाघ (सायंटिफिक नेम : पॅंथेरा टायग्रिस टायग्रिस) दोन नग. (टीप : नौरा-नौरी नकोत!) : ऍक्‍चुअली तुम्ही बाबांना दिलेले दोन वाघ तूर्त भायखळ्याला नेऊन ठेवण्याचा विचार चालू आहे. त्यापैकी एका वाघाच्या पाठीवर बसता येते, आणि दुसऱ्या वाघाला पाठीवर घेता येते!! (तो छोटा आहे ना!) बाबा म्हणाले की आपण त्यांना वाघ मागणे वाईट दिसते. पण तरीही आम्हाला हवाच आहे. प्लीज पाठवा. 

3. बिबटे (सायंटिफिक नेम : पॅंथेरा पार्डुस फुस्का) चार नग : खरे तर मुंबईत (आणि महाराष्ट्रातच) मांजरासारखे बिबटे झाले आहेत असे कळते. हौसिंग सोसायट्यांमध्ये घुसतात किंवा विहिरीत पडण्याचा त्यांना छंद लागला आहे, असे दिसते. तरी दोन जोड्या पोत्यात घालून पाठवाव्यात. (टीप : फायबरचे नकोत.) 

4. रान मांजरे (सायंटिफिक नेम : फेलिस सिल्वेस्ट्रिस) दोन नग. : रान मांजरे न मिळाल्यास साधी मांजरे चालतील! इथे कोणाला फरक कळतो? 
पार्सलची वाट पाहात आहे. कळावे. आपला. विक्रमादित्य. (बांद्रे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com