देवाक काळजी! (अर्थात डायरीतील एक पान)

ब्रिटिश नंदी
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

आजची तिथी : हेमलंबीनाम संवत्सर श्रीशके १९३९ श्रावण कृष्ण षष्ठी.
आजचा वार : संडेवार!
आजचा सुविचार : मोरया मोरया मी बाळतान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अ प्राधमाझे कोट्यानुकोऽऽटी
मोरेश्‍वरा बा तूघा लपोटी!

नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे.) गेले दोन-तीन दिवस गडबडीत गेले. सवडीने बसून एकवीसेक मोदक खावेत, अशी संधीच मिळाली नाही. शेवटी वेळात वेळ काढून रात्री डायरी लिहावयास घेतली आहे. गणपतीचे दिवस नेहमीच धकाधकीचे जातात. लोकांना वाटते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिवसरात्र उकडीचे मोदक खात असेल! पण तसे नाही. गणेश चतुर्थीला सकाळी उठून बंगल्यावरच बाप्पाची प्रतिष्ठापना केली. महाराष्ट्रातल्या जनतेला सुख लाभो, पाऊस चांगला होऊन पीक पाणी चांगले होवो, शेतकरीराजाला बरकत येवो, असे मनापासून साकडे घातले. अर्थात, हे असे साकडे दरसाल उभ्या महाराष्ट्राने विविध मुख्यमंत्र्यांच्या मुखातून ऐकले आहे. पंढरीची विठुमाउली आणि हा दरसाल येणारा बाप्पा ह्यांच्याकडे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची दुसरी कुठलीच डिमांड नसते. पण ते जाऊ दे. गणपतीच्या दिवसांत चार आप्तेष्टांच्या घरी जाऊन येणे आवश्‍यक राहते. लहानपणी आम्ही दिवसभरात एकवीस गणपती करीत असू!! हल्ली तेवढे होत नाहीत, पण जमेल तितके करतो...

गणेश चतुर्थीला घरची आरती आटोपून लागलीच गाडीत बसलो, आणि जुहूला तडक नारोबादादा राणेसाहेबांकडे गेलो. निघताना मी टोपी आणि गॉगल असा जामानिमा केला होता. उगीच आकाशाकडे नजर जायची आणि नेमका चंद्र कडमडायचा!! गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र बघितला तर चोरीचा आळ येतो म्हंटात!! मी आख्खा माणूस कुटुंबासहित चोरला, असा आरोप व्हायचा!! पण सुदैवाने पाऊस पडत होता व ढगांमुळे चंद्र दिसत नव्हता. वाचलो!!

...नारोबादादा दिवसभर मखराशी वाट पाहत उभे आहेत, असे सारखे फोन येत होते. म्हटले, गेलेले बरे!! मी गेल्या गेल्या त्यांनी आरतीची तयारी केली. चि. नीतेशरावांनी माझ्या हातात टाळ आणून दिले. दोन त्यांच्याही हातात होते. मीसुद्धा मनापासून आरत्या म्हटल्या. नमस्कार करताना नारोबादादांनी कोपराने मला ढोसकले. मी भुवई उडवून ‘काय?’ असे विचारले. त्यांनी गोड हसत माझ्या हातात दोन पेढ्याचे मोदक ठेवले. ‘‘तुका दो-दोन दिलंय हां!’’ असे माझ्या कानात कुजबुजले. ‘गणपती दरवर्षी वेगवेगळ्या रूपात फळ देतो, यंदा बघू या’ असे ते पत्रकारांना एकीकडे सांगत होते. मग माझ्याकडे वळून एकदम म्हणाले, ‘‘माजा काम कदी करतंस? आता बार उडंय...’’ मी दोन्ही हात पसरून म्हटले : ‘‘देवाक काळजी!!’’

...तिथून तडक निघालो, आणि गाडी थेट मालाडला काढली. मालाडला आमचे जुने मित्र राहतात. त्यांचे नाव मिलिंद्राव नार्वेकर!! त्यांच्या घरी मी नेहमी गणपतीला जातोच. गेल्या वर्षीही गेलो होतो. खरे तर ते मला आदल्या दिवशी ‘आरास करायला येता का?’ असेच आमंत्रण करतात. गेलोही असतो, पण वेळेअभावी जमत नाही. ह्या जुन्या मित्राकडे वेळात वेळ काढून जावेच लागते. किंबहुना, ह्या मित्राकडे जाताना नारोबादादांचे नवे घर ऑन द वे पडते, म्हणून गेलो. ह्या मित्राच्या घरी जाणे आमचे कर्तव्यच होते. अतिशय हुश्‍शार माणूस!! गेल्या गेल्या मित्राने आमचा हात हातात धरला. म्हणाले : ‘‘लक्ष असू द्या!’’ मी हसून म्हटले, ‘‘मित्रा, हे मला नाही, ह्या विघ्नहर्त्याला सांगायचे!’’ त्याने हात जोडले. मग मी विचारले, ‘‘तुमचे साहेब काय म्हणतायत?’’ तर त्यांनी श्रींच्या मूर्तीसमोर पुन्हा हात जोडले, आणि म्हणाले : ‘‘देवाक काळजी!’’

असो. आज रविवारी (तरी) उकडीच्या मोदकांवर ताव मारण्याचा बेत आहे. बघूया जमते का!