केक आणि केसेस! (ढिंग टांग!)

केक आणि केसेस! (ढिंग टांग!)

दुर्मुखनाम संवत्सरे श्रीशके 1938 ज्येष्ठ शुद्ध दशमी. इतिहास कधीही विसरणार नाही, ऐसी तवारीख. गडावर गडबड उडाली होती. धीरोदात्त लयीत राजे उठले. धीरोदात्त लयीत म्हंजे टप्प्याटप्प्याने. आधी डोकीवरील उशी दूर करायची. मग डोक्‍यावर पांघरुण घेतलेल्या अवस्थेतच उठून, काही काळ अंथरुणातच बसून राहावयाचे. ‘चहाऽऽऽऽ‘ असा आदेश पुकारायचा...मग एक पाय मंचकावरोन खालतें सोडावयाचा. मग दुजा! आणखी थोड्या घटिकांनी ‘हर हर महादेव‘ म्हणत पाऊल उचलावयाचे ते थेट...असो! सकाळची सर्व आन्हिके आटोपून राजे शुचिर्भूत मनाने येवोन आसनावर बसले. अजुनी डोळियांत पेंग होतीच. 

पप्याजी फर्जंदाने चहाचा वाफाळ कोप त्यांच्या हाती दिला. दौलतीचे कारभारी श्रीमान बाळाजी नांदगावकर केव्हाचे येवोन थांबले आहेत, अशी वर्दी दिली. कोपऱ्यातच उभे असलेले बाळाजीराव किंचित खाकरले. लक्ष वेधण्यासाठी आणखी थोड्यावेळाने शिंकरून बघावे, ऐसा धोरणी विचार त्यांनी केला. पण निव्वळ खाकऱ्याने राजियांची पेंग डिस्टर्ब जाहाली. 

‘‘कायाय?,‘‘ राजे वसकले. बाळाजीरावांनी सुटकेचा नि:श्‍वास टाकला. सगळे काही नॉर्मल आहे तर!

‘‘जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा, महाराज! महाराष्ट्राचे नवनिर्माण चिरायु होवो!,‘‘ अदबीने पुढे होत कारभारी बाळाजी नांदगावकर खांद्यावरील शेला सावरत म्हणाले, ‘‘बाहेर अभ्यागत तिष्ठताती! आपणांस शुभेच्छा देण्यासाठी धडपडताती! एकवार त्यांस सज्जात येवोन दर्शेन द्यावी, ही विज्ञापना...‘‘ 

त्यावर राजियांनी हात, भिवई आणि गाल एकाचवेळी उडवले. 

‘‘आपल्या कडवट सैनिकांनी आपल्या जन्मदिनाखातर हा ग्रंथ सिद्ध केला आहे. कृपया डोळ्यांखालून घालावा!,‘‘ बाळाजीरावांनी आपले घोडे तस्सेच दामटले. राजियांनी ग्रंथ हाती घेतला. ‘एक नेता, 77 वकील आणि 92 खटले!‘‘ मोठा देखणा ग्रंथ होता. राजियांनी ‘कुणाचं आहे?‘ असे खुणेनेच पृच्छिले. 

‘‘ अर्थात आपणावरच आहे राजे...केवळ मराठी माणसासाठी इतक्‍या केसेस अंगावर घेणारा ह्या पृथ्वीतलावर दुसरा आहे तरी कोण?,‘‘ बाळाजींनी अतिनम्रतेने खुलासा केला. त्यांचे मन आदराने भरोन गेले...किती खरे आहे! मराठी दौलतीच्या नवनिर्माणासाठी राजियांनी जंग जंग पछाडले. ह्या कोर्टापासून त्या कोर्टापर्यंत अफाट दौडी मारिल्या. केवढे हे धैर्य! केवढा हा त्याग! केवढा हा सर्वसंगपरित्याग!! राजांची धन्य आहे. खरोखर ह्याला म्हंटात लाखांचा पोशिंदा!! लाख मरावेत, पण... 

इतक्‍यात दालनाबाहेर येकच कल्लोळ जाहला. 

बाळाजींनी चमकून दरवाज्याकडे पाहियले. बंद होता! सर्रकन तलवार उपसोन गर्रकन मोहरा वळवत झर्रर्रकन ते राजियांस म्हणाले, ‘‘राजे, दगाफटका तर नाही ना? आपण पलंगाखाली शिरावे. हा बाळाजी खिंड लढवील!!‘‘ 

‘‘कॅहित्तरी बोलू नॅका!! दगाफॅटका कसला आलाय? कुणीतरी केकबिक घेऊन आलं असेल. मुकाट्याने केकची डिलिव्हरी घ्या, आणि आपटा दार!,‘‘ राजियांनी तिरसटल्यासारखे सांगितले. 

तलवार म्यान करोन बाळाजीरावांनी दार उघडले. राजियांचे खरे होते. केकचीच डिलिव्हरी होती. द्रोणागिरी उचलून आणल्याप्रमाणे मोठ्या जिकिरीने बाळाजीरावांनी केकपर्वत आणोन समोरील मेजावर ठेविला. 

वाह! जणू स्वित्झर्लंडातील येखादे हिमाच्छादित पठारच जणू! चहू बाजूंनी सरळसोट उतार. वरतें विस्तीर्ण पठार! पण ह्या पठारावर काय दिसते आहे? आँ? हे कुणाचे छायाचित्र? राजियांचे तर नव्हे? छे छे, राजियांनी कधीच दाढी ठेविली नव्हती आणि ठेवणारही नाहीत! मग हा कवण? 

केकच्या शुभ्र पठारावर देखणी आणि स्वादिष्ट आक्षरे होती : ‘मा. साहेब, हॅप्पी बर्थ डे...48!‘ 

केकवरील छायाचित्र कुण्या हैद्राबादी रझाकाराचे होते, हे बाळाजीरावांस आठवले! होय रे होय!! अगदी खासच महाराष्ट्राचा गनीम!! केकमुद्रा पाहताच राजियांची मुद्रा तत्क्षणी लालेलाल जहाली. नजरेत खदिरांगार शिलगला. 

‘‘बाळाजीऽऽऽ...तुमची ती तलवार आणा पाहू?,‘‘ ऐसे म्हणोन राजियांनी हाती आलेल्या तलवारीने त्वेषाने समोरील केकचा तुकडा सफई कापला!.. 

केकची एक मोठीशी खांडोळी उचलोन राजियांनी उंच धरली आणि म्हणाले : ‘‘ह्या खांडोळीत रझाकार ओवेसीच्या दाढीचे आठ केस आहेत. आमच्यावर आधीच 92 केसेस आहेत ना? घ्या, ह्या आठ केसांसकट झाली आमची सेंच्युरी! नवा ग्रंथ काढा!!‘‘ 

इति!

- ब्रिटिश नंदी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com