शिवार भांडण यात्रा! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
बुधवार, 31 मे 2017

आपले सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. त्यांनी (उगीचच) मंत्रालयाच्या समोर येऊन उभे राहू नये, म्हणून आपणच त्यांच्या शिवारात बांधावर जाऊन उभे राहावे, ह्या कल्पनेतून सदर यात्रेचा जन्म झाला. ही यात्रा सुफळ संपूर्ण व्हावी यासाठी काही मौलिक सूचना करीत आहे.

सर्व पक्ष सहकाऱ्यांसाठी-

आपल्या सरकारने सुरू केलेली शिवार संवाद यात्रा संकटात सापडल्याचे निदर्शनास आले असून, शिवाराशिवारांत संवादाऐवजी भांडणेच होऊ लागली आहेत. परिस्थितीने नाडलेल्या शेतकऱ्यांशी गुजगोष्टी करून त्यास आमदारांनी शांत करावे, असा उदात्त हेतू या यात्रेपाठीमागे आहे. परंतु आमदार शिवारात पोचताच भलताच पेचप्रसंग उभा राहत असल्याचे दिसून येते.

आपणांस हे विदित असेलच, की विरोधकांनी एसी बसमधून संघर्ष यात्रा काढली. त्यानंतर चिक्‍कार यात्रा कंपन्यांचे पेव फुटले. पर्यटनाच्या सीझनमध्ये असे होते हे खरे आहे, पण इतक्‍या यात्रा कंपन्यांमुळेच घोटाळा झाला आहे. बांधावर येऊन उभे राहिलेले लोक हे अपोझिशनचे आहेत की पॉवरवाले हेच कळेनासे झाले आहे. आपले सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. त्यांनी (उगीचच) मंत्रालयाच्या समोर येऊन उभे राहू नये, म्हणून आपणच त्यांच्या शिवारात बांधावर जाऊन उभे राहावे, ह्या कल्पनेतून सदर यात्रेचा जन्म झाला. ही यात्रा सुफळ संपूर्ण व्हावी यासाठी काही मौलिक सूचना करीत आहे.

सूचना येणेप्रमाणे :

  1. एखाद्या माणसाने कानसुलीत मारली तर दुसरा गाल पुढे करावा, अशी आपल्याला शिकवण आहे. ती अंगी बाणवावी. उगीच हमरीतुमरीवर येऊ नये. विशेषत: बांधावर अशी खुमखुमी जास्त येते, हे लक्षात घ्यावे.
  2. शेताच्या बांधावर चालताना क्‍यानव्हासचे जोडे योग्य ठरतात. तसेच ते धूम ठोकण्यासाठीही चांगले असतात. ते वापरावेत.
  3. विरोधी पक्षाचे काही थोर पुढारी बांधावर जाण्याची भाषा करीत आहेत. त्यांच्या आधी आपण पोचावे व बांध रिझर्व करावेत. हळूहळू बांधावर जागाच राहणार नाही, अशी व्यवस्था करावी.
  4. क्‍यानव्हासचे जोडे, पाण्याची बाटली, जेवणाचा डबा, दातकोरणे आणि कानात घालायची काडी आदी सामान स्वत:च न्यावे. शेतकरी बांधवांस डबा आणायला सांगू नये.
  5. शेतकरी बांधवांशी सौहार्दाने बोलावे. "कसं काय हरिभाऊ, बरं आहे ना?' किंवा "रामभाऊ, थोडी कळ काढा!' किंवा "तात्या, आता थोडंच राहिलं, हत्ती गेला, शेपूट राहिलं! वाईच थांबा!' अशा गोल गोल शब्दांत जमतील तितकी आश्‍वासने द्यावीत. पण कर्जमाफीचा उल्लेख झाला, की कानात काडी घालावी किंवा दातकोरण्याचा अवलंब करावा.
  6. आपले सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार आहे, हे ठासून सांगावे. लोक हसतील!! पण तरीही सांगावे. "अच्छे दिन आनेवाले है' हे अजूनही आपण लोकांना सांगतोच की नाही?
  7. शेतकरी बांधवांना फक्‍त "कर्जमाफी कधी देणार?' ह्या प्रश्‍नाच्या उत्तरातच इंटरेस्ट असतो. बाकी भाषण कसेही असले तरी त्यांना चालते. कुणी अगदीच हेका धरला तर "अभ्यास चालू आहे' हेच सांगावे.
  8. "अभ्यास चालू आहे', हे वाक्‍य एक आख्खे शैक्षणिक वर्ष खेचता येते. हे वाक्‍य फेकल्याने विद्यार्थी अभ्यासू आहे अशी इमेज तयार होते. पण जास्त काळ हे वाक्‍य ऐकवल्यास सदर विद्यार्थी एकाच यत्तेत वाऱ्या करणारा असावा, असे प्राय: मानले जाते.
  9. एखादा खडूस शेतकरी "अभ्यास कुटवर आला तुजा पोरा?' असं इच्यारील. त्याला म्हणावे : फार्मग्रोअर्सची ही डिपेंडन्सी आहे, तिचं रूट कॉज काय आहे, ह्याचा स्टडी करणं सर्वांत प्रायॉरिटीचं आहे. इरिगेशन आणि अदर इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रोव्हाइड केल्यानंतर ही स्टेट राहणार नाही. ह्याचा अर्थ इतकाच, की ही टेंपररी फेज असू शकते. पण पर क्रॉप यील्ड, फार्मर्सच्या बेसिक नीड्‌स आणि मार्केटची डिमांड ह्यांचा मेळ घालता आला तर दोन वर्षांत तुमचं उत्पन्न दुप्पट आरामात होईल...' काही कळले?
  10. शिवार भांडण यात्रेमध्ये प्रकरण निकराला आले, की मुख्यमंत्र्यावर बिल फाडण्याची प्रथा पडू पाहात आहे. हे उचित नव्हे!! एका माणसाने किती म्हणून भोगायचे, ह्याला काही लिमिट?

...उपरोक्‍त दहा कलमांचा नीट अभ्यास करून, त्याचा अवलंब करून आमदारांनी आपापले अहवाल त्वरित पाठवावेत ही विनंती. आपला.