वाघ अने सिंह! (ढिंग टांग)

Narendra_Modi_
Narendra_Modi_

स्थळ : नया रायपूर टायगर सफारी. 
वेळ : फोटोग्राफीची. 
काळ : पिंजऱ्यात उभा! 
पात्रे : पिंजऱ्याबाहेर उभी! 


कालपासून शिवाजी नावाच्या टायगरला जरा वेगळेच काहीतरी जाणवत होते. आसपासच्या झाडाझुडपांवर अचानक फुले दिसू लागली होती. पण एका फॉरेस्टवाल्याने त्याच्यासमोर काही रंगीत फुलांचा गुच्छ पिशवीतून काढून झुडपांच्या फांद्यांवर एकेक फूल सेलोटेपने चिकटवले, तेव्हा शिवाजी च्याट पडला. हे काय भलतेच? 
""क्‍यों बेटा रमण? टहनी को फूल चिपकाने की ये क्‍या बात है?'' शिवाजीने फॉरेस्टवाल्याला विचारले. 


""ये सफारी शुरू हो रही है, बखुर्दार! बडे मेहमान आनेवाले है...,'' रमण सिंह फॉरेस्टवाल्याने माहिती दिली. भराभरा फुले लावून तो निघून गेला. टायगर सफारीतील वनराजी रातोरात फुलांनी डवरून निघाली होती. निसर्गालाही फेशियल, फेस मसाज, मेकप असे सगळे लागते तर... शिवाजी बुचकळ्यात पडला. हे कसे शक्‍य आहे? सफारी तर डिसेंबरात सुरू होणार आहे. काल-परवा रागिणी म्याडमबरोबर आपण आलो. रागिणी ही खरीखुरी वाघीण आहे. पण छत्तीसगडला आणताना तिला इंजेक्‍शन देऊन आणावे लागले. (तिला बस लागते!) सोहन अस्वले, श्‍याम हरणे, कृष्णा लांडगे, दीपक मोरे अशी गॅंगसुद्धा एकेक करून दाखल झाली. आपण तर नावाचे शिवाजीराव वाघ!! आपली बडदास्त जोरदार होतीच. राहायला स्पेशल जागा, खायला-प्यायला रेलचेल... पण ज्याप्रमाणे गाढवाला गुळाची चव नसते, माकडाला अद्रकाचा स्वाद ठाऊक नसतो, त्याप्रमाणे वाघाला केळफुलाची रुची नसते. (खुलासा : वाघाला केळफुलाची चव काय? ही म्हण प्रस्तुत लेखकाने तयार केली आहे. आता केळफूलच का? पडवळ का नाही? असला पुणेरी प्रश्‍न छत्तीसगडमध्ये कोणीही विचारीत नाही!! असो.) म्हणजेच, अवघ्या जगात वाघांची संख्या रोडावत असताना आपल्या छत्तीसगडमध्ये टायगर सफारी सुरू होत आहे, ह्याचा शिवाजीला फारसा आनंद नव्हता. तो आपला पिंजऱ्यात पडून राहिला. तेवढ्यात एक फॉरेस्टवाला येऊन त्याला अपमानास्पदरीत्या चुचकारू लागला. 
""कानफटात मारीन...नीट बोल!'' शिवाजी गुरगुरला. लेका वाघ आहे मी! चुचकारायला तुझ्या घरातला बोका का आहे? नॉन्सेन्स!! 
""हॅप्पी दिवाळी म्हणत होतो, धनी! बाकी काही नाही!!'' घाबरून फॉरेस्टवाला म्हणाला. त्याच्या हातात बंदूक होती. त्याच्या नळीत पिसांची शेपूट असलेली गोळी भरलेली होती. तो पुढे म्हणाला, "" धनी...आज तुमचा मेकप करायचा आहे. तुम्हाला बघायला पाहुणे येणार आहेत. सो, बी रेडी!'' 
एवढे बोलून त्याने गोळी झाडली. ती वाघाच्या पार्श्‍वभागावर लागली. थोड्यावेळाने तो झोपी गेला... जागा झाला तेव्हा एक तेज:पुंज, रुबाबदार पर्यटक त्याला चुचकारत होता. 
""जे श्री क्रष्ण. वाघसाहेब. केम छो?'' पर्यटकाने प्रेमाने चौकशी केली. मेलो! नशिबात आलेला पहिलाच पर्यटक गुजराथी निघावा? अर्धवट ग्लानीत शिवाजीने कपाळावर पंजा मारला. सफारी डिसेंबरात सुरू होणार आहे, "पछी आवो' असे सांगावे, असे शिवाजीला वाटले. पण तो नुसताच बरळल्यासारखा गुरगुरला. 
""तमे पिंजडा मां शुं काम रख्ख्या छे? मारा गुजरात मां तो सेर खुल्लंखुल्ला घुमे छे...,'' पिंजऱ्याबाहेर उभे असलेले गुजराथी पर्यटक सांगत होते. शिवाजीचे डोके आधीच भणभणत होते, त्यात समोर गुजराथी टूरिस्ट! तिकडे गीरच्या जंगलात सिंह खुल्यावर हिंडतात, हे त्यानेही ऐकले होते. "पिंजऱ्याबाहेर काढा, किंवा तुम्ही तरी पिंजऱ्यात या' असे शिवाजी सांगणार होता. पण...जाऊ दे. 
""तमे एंडेंजर्ड एनिमल छो, के डेंजरस?'' टूरिस्टाने आणखी एक प्रश्‍न केला. इथे मात्र शिवाजी भडकला. ताडकन उठून उभा राहिला. भरदार पावले टाकत पिंजऱ्याच्या जवळ आला. ते पाहून पर्यटक मुळीच डरला नाही. शांतपणे पिशवीतला क्‍यामेरा काढून तो शिवाजीला म्हणाला : 
""हुं तमारा फोटा पाडू के तमे सेल्फीस्टिक आपूं?'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com