ढिंग टांग : विनूची सेल्फी- छडी!

ढिंग टांग : विनूची सेल्फी- छडी!

प्रार्थना झाली होती. वर्गात मुले आपापल्या बाकांवर गोंधळ घालत होती. अजून बोरटाके मास्तर वर्गात आले नव्हते. विनू सोडला, तर बाकी सगळ्या मुलांना जणू मोकळे रान मिळाले होते; पण विनू आज्ञाधारक मुलगा आहे. अत्तिशय अभ्यासू आणि नम्र. सदोदित पुस्तकात रमलेला; पण पुस्तकी कीडा नव्हे, मैदानी खेळातही त्याला किडे होते....आय मीन, चमचा लिंबू शर्यतीत तो नेहमी पहिला असे. पोत्यात पाय घालून पळण्याच्या शर्यतीत तर त्याचा पाय धरणारा आख्ख्या गावात कोणीही नाही! विनू पूर्वी अर्ध्या चड्‌डीत गोंडस दिसे; पण हल्ली हल्ली फुल प्यांट घालू लागला आहे. तरीही छॉन दिसतो. "मी आता मोठ्‌ठा झालोय!' असे तो ओठांचा चंबू करुन सांगतो, तेव्हा तर खूपच्च छॉन दिसतो. बोरटाके मास्तरांचा तो लाडका विद्यार्थी आहे. त्याला किनई आणखी मोठ्‌ठे, म्हंजे खूप मोठ्‌ठे व्हायचे आहे...
बोरटाके मास्तर वर्गात येईपर्यंत तो हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून गप्प बसून राहिला. तेवढ्यात डुलत डुलत बोरटाके मास्तर वर्गात आले. त्यांच्या हातात छडी होती. दुसऱ्या हातात डष्टर-खडू होते. छडी टेबलावर ठेवण्यापूर्वी त्यांनी खुर्चीला खडू घासून ठेवलेला नाही ना, हे निरखून पाहिले. प्यांटीला पाठीमागच्या बाजूला खुर्चीची जाळी उमटली, की ह्या पोरट्यांचा (त्यांच्या *** ला ***!) आनंदाला पारावार राहात नाही. नालायक कार्टी आहेत. मागल्या खेपेला जांभळाच्या सीझनमध्ये...नुसत्या आठवणीने मास्तरांचे टाळके सटकले.
"एकसाथ नमस्ते सर!,'' मुले नेहमीप्रमाणे ओरडली. मास्तर नेहमीप्रमाणे दचकले. पोरटी केवळ दचकवण्यासाठी ओरडतात. एकेकाच्या...जाऊ दे.
""कित्ती जोरात वरडता रे चांडाळांनो!'' बोरटाके मास्तर कुरकुरले. रातभराच्या जाग्रणाने आधीच ते कावलेले होते. मुलांना गणिते घालून खुर्चीत बसल्या बसल्या एक डुल्लक काढावी, एवढ्या माफक हेतूने ते वर्गावर आले होते; पण पोरट्यांनी उच्छाद मांडला होता. मास्तरांचा मूड आज अजय देवगणसारखा आहे, असे मत फफ्या गालगुंडेने व्यक्‍त केले. ते अत्यंत चिंत्य असे होते. अजय देवगण जशी हाडे मोडतो, तशीच बोरटाके मास्तर मोडतात, हे फफ्या अनुभवाने सांगू शकतो. विनूचा फफ्याशी अबोला आहे. फफ्यासारख्या वाईट संगतीत विनू कध्दीच मिसळत नाही. विनू चांगला मुलगा आहे.
"विनोबा,आज काय वार?'' मास्तरांनी विचारले.
"आज सोमवार कार्तिक शुद्ध सप्तमी शके 1938...सर!'' विनूने उभे राहून तत्काळ उत्तर दिले.
"हिते फळ्यावर कोण लिहिणार?'' बो. मा.
"मी सर!'' विनू.
"मग काय मुहूर्त बघतो?'' बो. मा.
"नाही सर! खडू हवा होता...'' विनू.
"हा घे...सुभाषित पण लिही!'' बोरटाके मास्तरांनी खडू त्याच्या अंगावर फेकला. विनू तात्काळ उठला. फळ्यावर त्याने तिथी लिहून काढली. सुभाषितही लिहिले-
प्रभाते मनी रोज सेल्फी काढावा।
पुढे वैखरी आधी अपलोड व्हावा।
सदाचार हा थोर सांडू नये तो।
जनी तोचि तो मानवी धन्य होतो।।
..."काढा वह्या!'' असे फर्मावून मास्तर फळ्याकडे वळले. फळ्यावरील सुभाषित पाहून आधी थिजले. मग घामाने भिजले. सदऱ्याच्या खिश्‍यातून थरथरत्या हाताने रुमाल काढत मास्तरांनी मानेवरला घाम पुसला. दुसऱ्या खिश्‍यातून मोबाइल फोन काढला. मेजावरची छडी उचलून ती पोरांसमोर उगारत मास्तर म्हणाले, तेव्हा त्यांच्या सुरात शंभर चिडक्‍या मास्तरांचा विखार होता...
"चला, पोराहो, हजेरी घेऊ या! ही सेल्फीष्टिक आहे... काय आहे?'' बो. मा.
"शेल्फीष्टिक!'' विनूसकट सारी पोरे ओरडली.
"धा धाच्या ग्रुपनी पुढे या. फोटो काढा आणि मग जा कुटं उकिरडं फुंकायला! पण कुणीही खिच्यात हात घालून मोबाइल काहाडला, तर हीच शेल्फीष्टिक...कळलं का कार्ट्यांनो!'' बोरटाके मास्तरांनी दम भरला.
...पोरे हसत होती. विनू गंभीर होता. पहिल्या रांगेत डावीकडून तिसरा म्हंजे आमचा विनू! कळले?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com